रत्नागिरीतील युवा उद्योजक गौरांग आगाशे ठरले ‘न्यू जेन आयकॉन’

मुंबई : रत्नागिरीतील प्रयोगशील युवा उद्योजक गौरांग अनंत आगाशे यांना टॅली एमएसएमई पुरस्कार सोहळ्यात ‘न्यू जेन आयकॉन’ अर्थात नव्या पिढीचे आदर्श हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असलेल्या सहारा स्टार या पंचतारांकित हॉटेलमध्ये नुकत्याच झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार गौरांग आगाशे यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी वीस हजार अर्जांमधून पाच जणांची निवड केली जाते. त्यात गौरांग आगाशे यांचा समावेश असून, त्यांच्या या यशामुळे रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी)

एमएसएमईचे सरकारी पोर्टल आणि टॅली सोल्युशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू जेन आयकॉन, बिझनेस माइस्ट्रो, वंडर वूमन, टेक ट्रान्स्फॉर्मर आणि चॅम्पियन ऑफ कॉझ असे हे पाच पुरस्कार दिले जातात. पुरस्कारांचे यंदा पाचवे वर्ष आहे. बाजारपेठेची गरज नेमकी ओळखून नावीन्यपूर्ण उपाय शोधून त्यांची अंमलबजावणी करणाऱ्या तरुण उद्योजकाची ‘न्यू जेन आयकॉन’ या पुरस्कारासाठी निवड केली जाते. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग अर्थात एमएसएमई क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी नव्या पिढीतील आदर्श म्हणून गौरांग यांना गौरवण्यात आले. आगाशे यांनी पाच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या अनबॉक्स युवर डिझायर या स्टार्टअप उद्योगाद्वारे घरपोच फूड डिलिव्हरीसोबतच प्लास्टिक कचरा संकलनासारखे अनेक अभिनव उपक्रम रत्नागिरीत राबवले जात आहेत.
या पुरस्काराविषयी ‘कोकण मीडिया’ला माहिती देताना गौरांग आगाशे म्हणाले, ‘तरुण उद्योजकातर्फे चालवल्या जाणाऱ्या स्टार्टअप उद्योगाच्या माध्यमातून बाजारात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करणे, सामाजिक भान जपणे, स्थानिक भागाच्या आर्थिक विकासासाठी हातभार लावणे अशा विविध पैलूंचा विचार या पुरस्कारासाठी निवड करताना केला जातो. अनबॉक्स युवर डिझायर या कंपनीतर्फे आम्ही फार्मा हा बिझनेस टू बिझनेस (बी टू बी) प्रकारचा, फूड डिलिव्हरी हा बिझनेस टू कस्टमर (बी टू सी) प्रकारचा उद्योग चालवतो. तसेच, आता सेवा क्षेत्रातही आम्ही पदार्पण केले असून, कमिशन न घेता विविध सेवा उपलब्ध करून देतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.’
या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करतानाच या यशामध्ये हातभार असलेल्या सर्वांप्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, नवनवे उपक्रम राबवणार असल्याचेही सांगितले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply