पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती, दैनिक केसरीचे विश्वस्त संपादक आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू डॉ. दीपक जयंत टिळक यांचे आज (१६ जुलै २०२५) पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव सकाळी आठ ते ११ या वेळेत पुण्यातील नारायण पेठेतील केसरीवाड्यात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. दीपक टिळक यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
लोकमान्य टिळकांचे पणतू असलेले डॉ. दीपक टिळक हे शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि सांस्कृतिक या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे वडील जयंतराव टिळक यांनी गोवा मुक्ती आंदोलन आणि संयुक्त महाराष्ट्र समितीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. जयंतराव १२ वर्षे खासदार होते, तर १६ वर्षे विधान परिषदेचे अध्यक्ष होते. डॉ. दीपक यांच्या मातोश्री इंदुताई टिळक सेवासदन आणि हुजूरपागा यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत होत्या. या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे त्यांच्यावर लहानपणापासूनच समाजकार्याचे संस्कार झाले.
डॉ. दीपक टिळक यांनी पुणे विद्यापीठातून व्यवस्थापन विषयात पीएचडी प्राप्त केली होती. ‘दैनिक केसरी’चे संपादक आणि महाव्यवस्थापक म्हणून ते दीर्घ काळ कार्यरत होते. मराठी वृत्तपत्रांच्या समस्यांवर आधारित पीएचडी प्रबंध त्यांनी सादर केला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात १९९६पासून ते विविध पदांवर कार्यरत होते. दैनिक केसरी, सह्याद्री यांसारख्या वृत्तपत्रांमध्ये संपादक म्हणून त्यांचे योगदान आहे. पीएचडीच्या १३ विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले होते. वृत्तपत्रांशी संबंधित अनेक संस्था-संघटनांमध्ये ते सदस्य होते. गव्हर्निंग कौन्सिल असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचेही ते काही काळ सदस्य होते. केसरी-मराठा ट्रस्ट, टिळक स्मारक ट्रस्ट, श्री शिवाजी मंदिर ट्रस्ट, अनाथ हिंदू महिला आश्रम, वक्तृत्वोत्तेजक सभा, वैदिक संशोधन मंडळ, वेद शास्त्रोत्तक सभा, महिला पुनर्वसन केंद्र, लोकमान्य पुण्यतिथी मंडळ, देवगंधर्व भास्करबुवा बखले ट्रस्ट अशा अनेक संस्थांचे अध्यक्ष आणि विश्वस्त म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
खेळ आणि कला क्षेत्रातही डॉ. दिपक टिळक यांचे योगदान होते. जुडो फेडरेशन ऑफ इंडियाचे माजी उपाध्यक्ष होते. जुडोमध्ये आठव्या डॅनचा रेड अँड व्हाइट बेल्ट त्यांना मिळाला होता. जुडो आणि कराटेवर आधारित त्यांची पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. ‘इंदुकिरण’, ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – मेकर ऑफ मॉडर्न इंडिया’, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ यांसारखी अनेक पुस्तके त्यांनी मराठी आणि इंग्रजीत लिहिली. डॉ. दीपक टिळक यांना त्यांच्या कार्यासाठी पुरुषोत्तम पुरस्कार, सुशील सोशल फोरम पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले होते.
जपानी भाषेच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. दीपक टिळक यांना २०२१मध्ये जपानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून गौरवण्यात आले होते. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार ट्रस्टचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

