रत्नागिरीच्या चित्पावन ब्राह्मण संघाचा श्रावण कीर्तन सप्ताह यंदा सात ठिकाणी

रत्नागिरी : गेली १३ वर्षे रत्नागिरीमध्ये श्रावण कीर्तन सप्ताहाचे आयोजन अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळातर्फे केले जात आहे. दर वर्षी मंडळाच्या सभागृहात होणारा कीर्तन सप्ताह यंदा वेगळ्या पद्धतीने साजरा होणार आहे. मंडळाच्या सभागृहात शुक्रवारी, २५ जुलै रोजी या सप्ताहाचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर पुढचे सलग सहा दिवस देवरूख, चिपळूण, राजापूर, पावस, गुहागर आणि लांजा या गावी कीर्तने होणार आहेत.
सप्ताहाची सुरुवात श्रावण शुद्ध प्रतिपदा म्हणजेच शुक्रवारी, २५ जुलैला सायंकाळी पाच वाजता ल. वि. केळकर विद्यार्थी वसतिगृहाच्या भगवान परशुराम सभागृहात होणार आहे. गोवा येथील युवा कीर्तनकार ह. भ. प. डॉ. सौ. उर्वी बर्वे यांच्या कीर्तनाने कीर्तन सप्ताहाचा शुभारंभ होणार आहे. उर्वी बर्वे या बीएएमएस पदवीप्राप्त असून गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकात त्यांनी कीर्तने सादर केली आहेत. त्यांना ऑर्गनसाथ श्रीधर पाटणकर व तबलासाथ स्वरूप नेने करतील.

२६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता अभिरुची देवरूख व श्री गणेश वेद पाठशाळा, देवरूख या संस्थांच्या सहकार्याने श्री गणेश वेदपाठशाळेच्या कात्रे-चांदोरकर सभागृहात ह. भ. प. सौ. नम्रता व्यास-निमकर यांचे कीर्तन होणार आहे. त्यांचे कीर्तनाचे शिक्षण नारद मंदिर येथे झाले असून, त्यांनी कीर्तनशास्त्रात बीए व एसएनडीटी विद्यापीठातून संगीतात एमए केले आहे. त्यांना ऑर्गनसाथ आशिष प्रभुदेसाई व तबलासाथ अभिजित भालेकर करतील. रविवारी, २७ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता चिपळूण ब्राह्मण सहायक संघाच्या सहकार्याने ब्राह्मण सहायक संघाच्या बेडेकर सभागृहात ह. भ. प. सौ. नम्रता व्यास-निमकर (पुणे) यांचे कीर्तन होणार आहे. त्यांना ऑर्गनसाथ वरद केळकर आणि तबलासाथ प्रथमेश देवधर करतील.

सोमवारी, २८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता राजापुरातील कीर्तनप्रेमी ग्रुप व संभाजी पेठ मित्रमंडळाच्या सहकार्याने श्री विठ्ठल मंदिरात ह. भ. प. प्रशांत धोंड यांचे कीर्तन होणार आहे. श्री. धोंड हे माणगावच्या (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक असून, ते संगीत विशारद, कीर्तनकार, गायक, अभिनेते आहेत. त्यांना ऑर्गनसाथ आकाश लेले आणि तबलासाथ आर्यन कुशे करतील.

मंगळवारी, २९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता आबा चिपळूणकर आणि मंडळी यांच्या सहकार्याने पावसच्या श्रीराम मंदिरात ह. भ. प. सौ. नीला कुलकर्णी यांचे कीर्तन होणार आहे. त्यांनी रिझर्व्ह बॅंकेत अनेक वर्षे नोकरी केली. कीर्तनाचे प्रशिक्षण घेतले व आता विविध ठिकाणी कीर्तने करत आहेत. त्यांना ऑर्गनसाथ आकाश लेले आणि तबलासाथ वरद जोशी करतील.

बुधवारी, ३० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता गुहागरच्या श्री व्याडेश्वर देवस्थानच्या सहकार्यातून देवस्थान सभागृहात ह. भ. प. मंदार गोखले यांचे कीर्तन होणार आहे. मंदार गोखले यांनी कीर्तनाचे शिक्षण घेतले असून, १४ वर्षे सेवाभावाने कार्यरत आहेत. तालभूषण कीर्तनमधुकर या मानाच्या पदव्या त्यांना प्राप्त आहेत. त्यांना ऑर्गनसाथ चिन्मय सावरकर आणि तबलासाथ प्रकाश तांबे करणार आहेत. गुरुवारी, ३१ जुलैला सायंकाळी ६ वाजता लांजा येथील ब्राह्मण सहायक सेवा मंडळाच्या सहकार्याने माउली सभागृहात ह. भ. प. मंदार गोखले यांचे कीर्तन होईल. त्यांना ऑर्गनसाथ जगन्नाथ बेर्डे आणि तबलासाथ प्रदीप सरदेसाई करतील.

या सर्व ठिकाणच्या कीर्तनप्रेमी श्रोत्यांनी श्रावण कीर्तन सप्ताहातील कीर्तनांना उपस्थित राहून श्रवणभक्ती करावी, असे आवाहन अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळ आणि सर्व ठिकाणच्या सहयोगी संस्थांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply