रत्नागिरी : मुलांचे, मोठ्या माणसांचे किंवा अगदी पाळीव प्राण्यांचेही वाढदिवस उत्सवी पद्धतीने साजरे केले जातात, यात काही नवीन नाही; पण रत्नागिरी तालुक्यातल्या धामणसे गावात बुधवारी (१६ जुलै) ग्रामस्थ आणि विद्यार्थी अशा सुमारे दोनशे जणांनी एकत्र येऊन एक अनोखा वाढदिवस उत्साहात साजरा केला. उत्सवमूर्ती होतं कदंबाचं झाड. या एका वेगळ्याच उपक्रमाची सर्वत्र चर्चा आहे. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी आहे.)
आईच्या नावे एक झाड लावण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ‘मन की बात’मधून केलं होतं. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रत्नागिरीतल्या धामणसे गावातल्या श्री रत्नेश्वर ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांनी आपल्या वाढदिवसाच्या औचित्याने ग्रंथालयाच्या आवारात कदंबाचं रोप लावलं होतं. आज (१६ जुलै २०२५) त्या झाडाचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री रत्नेश्वर ग्रंथालयाचं सुवर्णमहोत्सवी वर्ष सध्या सुरू असून, त्यासाठी मोफत जागा देणाऱ्यांच्या आईचं म्हणजेच दिवंगत शकुंतला शंकर कानडे यांचं नाव उत्सवमूर्ती कदंबरोपाला देण्यात आलं. त्या रोपाला विद्यार्थ्यांनी पुष्पहार घातले आणि कलिंगड कापून आनंद साजरा केला. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)
‘आपण आई-वडिलांची सेवा करतो, त्याप्रमाणे आपण लावलेल्या झाडाची निगा राखणंही गरजेचं आहे, या विचाराने आम्ही ग्रामस्थांनी मिळून या झाडाचा वाढदिवस साजरा केला,’ अशी भावना कुळकर्णी यांनी व्यक्त केली. त्यांनी गेल्या वर्षी आपल्या आईच्या नावे विद्यार्थी आणि ग्रामस्थांना ५०० रोपांचं मोफत वाटप केलं होतं. गावाच्या विकासात योगदान असलेल्या दिवंगत व्यक्तींच्या नावे यंदाही ६०० रोपं वाटण्यात आली.

आज सकाळी ग्रंथालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. धामणसे गावाच्या विकासासाठी योगदान दिलेल्या २० दिवंगतांच्या नावाने रोपांचं वाटप करून वेगळेपणा जपण्यात आला. शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थ, ग्रंथालयाचे संचालक असे सुमारे २०० जण या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांनी या वेळी सांगितलं, की ‘संस्थेला ५० वर्षं पूर्ण होत आहेत. एका पेटीत पुस्तकं ठेवून हे ग्रंथालय सुरू झालं. पूर्वीच्या लोकांनी ग्रंथालय चालवलं. त्यामुळेच मला काम करण्याची संधी मिळाली. आपल्याला काम करायचं असेल तर आपली रेष मोठी करावी लागते. विद्यार्थ्यांनी वाचन करावं. वाचल्याशिवाय आपण प्रगती करू शकत नाही. यंदा ग्रंथालयातर्फे समाजोपयोगी उपक्रमांची मालिका राबवण्यात येणार आहे. त्याचं नियोजन करण्यात येत आहे.’
आज प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना काजू, बेल, चिंच, आवळा, सोनचाफा, पेरू, खैर, साग व कडुनिंब या प्रकारच्या चांगल्या दर्जाच्या ६०० रोपांचं मोफत वाटप करण्यात आलं. या वेळी विद्यार्थ्यांनी ‘झाडे लावा, झाडे जगवा, निसर्ग जपूया, आनंदी होऊया, उन्हातान्हात हवी असेल सावली तर वृक्ष लावा पावलोपावली’ अशा विविध घोषणा दिल्या. तसंच फलकांद्वारे जागृती केली. झाड मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.
सरपंच अमर रहाटे यांनी सांगितलं, की ‘संस्थेने कसे जागरूकपणे कार्यक्रम करावेत, हे अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांनी नावीन्यपूर्ण उपक्रमातून दाखवलं. त्यातून हे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरं केलं जात आहे. आज उमेश कुळकर्णींचाही वाढदिवस आहे, याचं औचित्यही साधलं गेलं आहे. अशा पद्धतीचे कार्यक्रम केले पाहिजेत. अनेक जण स्वतःचा वाढदिवस केक कापून साजरा करतात. तसा झाडाचासुद्धा वाढदिवस साजरा केला ही बाब कौतुकास्पद आहे.’
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विलास पांचाळ यांनी केलं. प्रास्ताविक चिटणीस मुकुंद गणेश तथा बाळासाहेब जोशी यांनी केले. कार्यक्रमाला अध्यक्ष उमेश कुळकर्णी, सरपंच अमर रहाटे, रत्नागिरी जिल्हा कृषी, औद्योगिक संघ संचालक व ग्रामपंचायत सदस्य सौ. ऋतुजा उमेश कुळकर्णी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष दीपक जाधव, ग्रंथालयाचे उपाध्यक्ष विलास पांचाळ, चिटणीस मुकुंद जोशी, सदस्य प्रशांत रहाटे, अनंत जाधव, विश्वास धनावडे, सौ. स्मिता कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य दीपक रेवाळे, ग्रंथपाल केशव कुळकर्णी, लिपिक अविनाश लोगडे, नंदादीप नेत्रालयाचे विपणन अधिकारी हृषीकेश मयेकर, सेल्फलेस सर्व्हिंग सोसायटीच्या संचालिका कोनिका दत्त, मानसशास्त्रज्ञ गौरी चाफेकर आदी उपस्थित होते. तसंच आंबा व्यापारी बंड्या हर्षे, अनंत गोताड, मारुती लोगडे, माध्यमिक विद्यालयाचे श्री. सुतार, श्री. गायकवाड, अंगणवाडी सेविका व मदतनीस, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ढापरे व अन्य शिक्षकही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

