रत्नागिरी : येथील सुप्रसिद्ध उज्ज्वला कॉमर्स क्लासेसचे संस्थापक व रत्नागिरी शहरातील बहुसंख्य सीएंचे मार्गदर्शक, विद्यार्थीप्रिय शिक्षक बाळकृष्ण जयराम हळबे (वय ८८) यांचे आज (२० जुलै) पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी उज्ज्वला, मुलगा श्रीरंग व तीन कन्या असा परिवार आहे. बाळकृष्ण हळबे सरांना शिकवण्याची प्रचंड आवड होती. म्हणून त्यांनी १९८० साली दुबईतून नोकरी सोडून वयाच्या ४२ व्या वर्षी क्लासेस सुरू केले. सुरुवातीला त्यांनी वेंगुर्ला, राजापूर आणि रत्नागिरीच्या टिळक आळीत कॉमर्सचे क्लास चालवले. नंतर मात्र रत्नागिरीत ते स्थायिक झाले.
हळबे सरांचा भरपूर शिष्यवर्ग आहे. अकाउंटन्सी या विषयावर त्यांचे प्रभुत्व होते. जवळपास २० हजारांहून अधिक विद्यार्थी हळबे सरांकडे शिकले आहेत. त्यांनी पैशांअभावी कोणाचे शिक्षण अडवले नाही. विद्यार्थिप्रिय शिक्षक, मितभाषी व्यक्ती अशी त्यांची ख्याती होती. रत्नागिरी अनुषंगाने कोकणातील बहुसंख्य वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचे ते गुरू होते. रत्नागिरीत त्यांनी २८ वर्षे क्लासेस घेतले. वयोमानानुसार निवृत्ती घेऊन त्यांनी उज्ज्वला क्लासेसची धुरा त्यांचे शिष्य पुरुषोत्तम पाध्ये यांच्याकडे दिली. श्री. पाध्ये यांनी उज्ज्वला क्लासेसच्या वतीने हळबे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

