मालवण : येथील बॅ. नाथ पै सेवांगण आणि साहित्य अकादमीच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ साहित्यिक कै. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने जयवंत दळवी : व्यक्ती आणि साहित्य या विषयावरील चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण सभागृहात येत्या १७ ऑगस्ट रोजी हे दिवसभराचे चर्चासत्र होणार आहे. चर्चासत्राचे उद्घाटन सकाळी १० वाजता होईल. साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव आणि बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्क्ष देवदत्त परुळेकर प्रास्ताविक करतील. सुप्रसिद्ध साहित्यिक प्रवीण बांदेकर यांचे बीजभाषण होईल. यावेळी जयवंत दळवी यांचे सुपुत्र गिरीश दळवी उपस्थित राहणार आहेत. साहित्य अकादमीच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होईल.
चर्चासत्रातील पहिले सत्र सकाळी पावणेबारा ते दुपारी दीड या वेळेत कवी महेश केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. जयवंत दळवींचे व्यक्तित्व आणि साहित्यनिष्ठा या विषयी ते बोलतील. शरयू आसोलकर जयवंत दळवींच्या साहित्यातील कोकण या विषयावर निबंध वाचन करतील. जयवंत दळवींच्या कादंबऱ्यांविषयी संजय कळमकर, तर कथासाहित्याविषयी गोविंद काजरेकर बोलतील.
दुसरे सत्र प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी अडीच ते सायंकाळी ४ या वेळेत होईल. जयवंत दळवींच्या नाटकांविषयी प्रेमानंद गज्वी सांगतील. जयवंत दळवींचे हास्य लेखन याविषयी वामन पंडित, तर जयवंत दळवींचे चित्रपटातील योगदान याविषयी श्रीकांत बोजेवार बोलतील.
चर्चासत्रानिमित्ताने साहित्य अकादमीच्या पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. रसिकांच्या लाडक्या साहित्यिकाच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी अगत्याने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
जयवंत दळवी यांची निवडक साहित्यसंपदा
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media



