चिपळूण : प्रथितयश प्रकाशिका कै. सौ. अंजली रवींद्र घाटपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साहित्यविश्वात मानाचा समजला जाणारा ‘स्नेहांजली पुरस्कार’ यावर्षी चिपळूण येथील संपादक, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश देशपांडे यांना देण्यात येणार आहे.
दरवर्षी ‘स्नेहल प्रकाशन’तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. सन २०२५ हे पुरस्काराचे २३वे वर्ष आहे. स्नेहांजली पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलूरकर असून या समितीमध्ये डॉ. मुकुंद दातार, प्र. के. घाणेकर, आशुतोष बापट, अभय भावे आणि रवींद्र घाटपांडे यांचा समावेश आहे. समितीने एकमताने श्री. देशपांडे यांची निवड केली आहे.
श्री. देशपांडे चिपळूण येथील सुप्रसिद्ध साहित्यिक असून गेल्या ४० वर्षांपासून साहित्य व सामाजिक क्षेत्रात तन-मन-धनाने त्यांचे योगदान आहे. त्यांनी चिपळूण येथे साहित्य संमेलन आणि नाट्य संमेलन यशस्वीपणे आयोजित केले आहे. त्यांनी अथक परिश्रमाने प्राचीन वस्तूंचे म्युझियम उभारले आहे.
संपादक, लेखक आणि कवी म्हणूनही देशपांडे यांचे उल्लेखनीय कार्य आहे. सध्या ते कोकण रत्ने या ग्रंथावर काम करत आहेत, तर त्यांच्यावर त्वदीयाय कार्याय हा गौरवग्रंथ प्रकाशित झाला आहे. श्री. देशपांडे उत्तम व्याख्याते असून त्यांनी विविध विषयांवर अनेक व्याख्याने दिलेली आहेत. एका अर्थाने चिपळूणच्या ‘सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक’ म्हणून त्यांची ओळख आहे. ते साहित्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्यदेखील आहेत.
‘स्नेहांजली पुरस्कार’आतापर्यंत शेषराव मोरे, डॉ. वि. रा. करन्दीकर, डॉ. भीमराव गस्ती, डॉ. गो. बं. देगलूरकर, गिरीश प्रभुणे, डॉ. सदानंद मोरे, श्याम भुर्के इत्यादींना मिळाला आहे.
यावर्षीचा स्नेहांजली पुरस्कार सोहळा सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता पुण्यात एस. एम. जोशी सभागृहात होणार आहे. या समारंभाचे अध्यक्षत्व मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर करणार आहेत. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भा. ज. पा.चे नेते माधव भांडारी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात आशुतोष बापट लिखित ‘साद मंदिरांची ओळख संस्कृतीची’ आणि श्रीमती वसुधा परांजपे लिखित ‘स्वराज्याच्या सौदामिनी’ या दोन पुस्तकांचेही प्रकाशन होणार आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

