देवरूख : येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयातर्फे कथालेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
संवेदनशील, सर्जनशील आणि नवोदित लेखकांना लिहिते करण्यासाठी बालमनावर सुसंस्कृत संस्कार करणाऱ्या स्व. शालिनी आणि सहकार क्षेत्रासाठी भरीव योगदान केलेले स्व. सदानंद बेंदरकर या दाम्पत्याच्या स्मरणार्थ श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयातर्फे पाचव्या कथालेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, कथेसाठी विषय निवडण्याचे स्वातंत्र्य स्पर्धकाला आहे. कथा स्वरचित आणि मराठी भाषेतून असावी. किमान २००० आणि कमाल २५०० शब्दांची मर्यादा आहे. कथा कागदाच्या एका बाजूस पुरेसा समास सोडून, सुवाच्य अक्षरात लिहिलेली किंवा टाईप केलेली असावी.
कथा ३१ ऑक्टोबर,२०२५ पर्यंत वाचनालयात ग्रंथपालांकडे कार्यालयीन वेळेत आणून द्यावी अथवा कुरियर/पोस्टाने श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालय, मधली आळी, मोडक गार्डन मागे, मुपो देवरूख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी – ४१५८०४ या पत्त्यावर पाठवावी. कथा वाचनालयाच्या ta6409001@gmail.com या ई-मेलवरही पाठवता येईल. कथा युनिकोडमध्येच टाइप करून पाठवावी. कथेसोबत स्वतंत्र कागदावर स्पर्धकाने स्वतःचे पूर्ण नाव, पत्ता (पिनकोडसह), फोन/मोबाइल नंबर लिहावा. कथेवर स्पर्धकाने कुठेही आपले नाव अथवा ओळख लिहू नये.
स्पर्धेत गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या तीन स्पर्धकांना ग्रंथभेट, रोख रक्कम आणि प्रमाणपत्र दिले जाणार असून उत्तेजनार्थ कथांची निवडही केली जाणार आहे. स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे १००१/-, ७५१/- आणि ५०१/- रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. स्पर्धेचा निकाल १५ डिसेंबर २०२५ च्या दरम्यान जाहीर केला जाणार आहे.
नवोदित लेखकांनी अधिकाधिक प्रमाणात स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. गजानन जोशी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९४२३२९७३५८ या क्रमांकावर संपर्क साधण्याची सूचना आयोजकांनी केली आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

