Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

त्यांनी विकास नाकारला आहे का?

Advertisements

रत्नागिरीसह जिल्हा आणि राज्यभरातही नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी २ डिसेंबर रोजी निवडणूक झाली. अनेक ठिकाणी उत्स्फूर्तपणे मतदान झाले. काही मतदारसंघांमधील याचिकांमुळे तेथील मतदान होऊ शकलेले नाही. योग्य त्या प्रक्रियेनंतर २० डिसेंबरला तेथे मतदान होणार आहे त्यासह २ डिसेंबरला झालेल्या निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे. तोपर्यंत निवडणूक लढविणारे सर्वच उमेदवार धाकधूक बाळगून आहेत. निकालानंतर ती संपुष्टात येणार आहे आणि विजयी झालेले उमेदवार आपापल्या पदांची शपथ घेऊन कामाला लागणार आहेत. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या उमेदवारांचा अपवाद वगळता बाकी सर्व उमेदवार निवडणूक विसरून जाणार आहेत. कारण त्यांनी केवळ हौस म्हणून त्यामध्ये भाग घेतलेला असतो.
निवडणूक यंत्रणा, प्रशासन, राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि उमेदवार यांच्या दृष्टीने निवडणूक एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. पण ही सारी प्रक्रिया सर्वसामान्य मतदारांच्या एका मतासाठी राबविली जात असते. त्यांना मतदारराजा म्हटले जाते, पण ते नावापुरतेच असते. त्यांनी दिलेला संदेश कोणीच लक्षात घेत नाही. नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याचा विचार करायला हवा. अगदी किरकोळ निवडणूकसुद्धा अलीकडे प्रतिष्ठेची असल्याचे सांगितले जाते. खुद्द रत्नागिरी शहरातील निवडणूकही तशीच होती. मात्र रत्नागिरी शहरातील ४५ टक्के मतदारांनी निवडणुकीबाबत उदासीनता दाखविली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर तुलनेने ग्रामीण भाग असलेल्या गुहागर नगरपंचायतीमध्ये सर्वाधिक ७५ टक्के मतदान झाले. इतर नगरपालिका आणि नगर पंचायतीमध्येही ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही विक्रमी मतदान झाले. तेथे तीन नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी ६८ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. म्हणजे तेथील मतदार उत्सुक, जागृत आणि समाधानी असल्याचे दिसते. सर्व बाबतीत रत्नागिरी जिल्हा पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगितले जात असताना जिल्ह्यात झालेली मतदानाची टक्केवारी तसे दर्शवत नाही. रत्नागिरी या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या नगरपालिकेच्या क्षेत्रात राहणाऱ्या सर्वाधिक मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली, ही बाब गांभीर्याने घेतली जायला हवी. शहरासाठी आणि पर्यायाने तालुक्यासाठी तसेच परिसरासाठी भरपूर विकास झाल्याचे सांगितले गेले. विकासाची यापूर्वी दिलेली आश्वासने, प्रत्यक्षात झालेला विकास आणि भविष्याचे चित्र याकडे ज्यांच्यासाठी हे चित्र निर्माण केले गेले, ते मतदार कशा दृष्टीने पाहतात, हे लक्षात घ्यायला हवे. प्रचंड प्रमाणात विकास झाल्याचे सांगितले जात असेल तर त्याकडे ४५ टक्के नागरिकांनी दुर्लक्ष केले आहे.
विकासाची प्रचंड आश्वासने देणाऱ्या पक्षाच्या आणि उमेदवारांच्या विरोधात पडलेल्या मतांची टक्केवारी निकाल जाहीर झाल्यानंतर लक्षात येणार आहे, पण मतदान न करणारे आणि विरोधात मतदान करणारे यांची टक्केवारी निम्म्यापेक्षा अधिक होते. याचाच अर्थ त्यांना विकास पटलेला नाही. आश्वासने खरी वाटत नाहीत. असाच होतो. जिल्ह्याच्या ठिकाणची निवडणूक पालकमंत्र्यांनी प्रतिष्ठेची केली असेल तर त्यांना नाकारणाऱ्या मतदारांनी ती प्रतिष्ठा धोक्यात आणली आहे. निवडणुकीपुरते राजकारण असे केवळ म्हणणाऱ्यांना सर्वसामान्य मतदारांनी नाराजीच्या रूपाने दिलेल्या या सूचक इशाऱ्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. ज्यांनी मतदान केले नाही त्यांनी एक तर विकास नाकारला आहे किंवा त्यांच्यापर्यंत विकास पोहोचलेला नाही. विकासाची कल्पना पोहोचलेली नाही. मतदान किती आवश्यक आहे, याची याचे महत्त्व त्यांना पटवून देण्यामध्ये राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि प्रशासनसुद्धा अपयशी ठरले आहे. खऱ्या अर्थाने लोकांच्या मतांचा मागवा घेण्यात आलेले हे अपयश जेवढ्या लवकर धुऊन काढता येईल तेवढे, ते अधिक उपयुक्त ठरणार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version