रत्नागिरी : पावस येथील स्वामी स्वरूपानंद जयंती उत्सवानिमित्त येत्या रविवारी, दि. १४ डिसेंबर रोजी रत्नागिरी ते पावस पदयात्रा काढण्यात येणार आहे. पदयात्रेचे हे तेविसावे वर्ष आहे.
रविवारी सकाळी साडेचार वाजता रत्नागिरीत जयस्तंभ येथून पदयात्रेला प्रारंभ होईल. स्वामींच्या ॐ राम कृष्ण हरि या गजराचे नामस्मरण करीत ज्ञानदेवांचा हरिपाठ गात पावसला पदयात्रा जाणार आहे.
चालण्याने आरोग्याची चाचणी घेता येते. आपला धीर, संयम किती आहे हे तपासून बघता येते. ही चालण्याची स्पर्धा नव्हे, पण आपले आरोग्य किती मजबूत आहे, श्वास किती खोलवर घेता येतो हे अजमावल्यामुळे आपल्या जगण्याला एक नवी उभारी येते. स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे नामच अखेरच्या श्वासापर्यंत तुम्हाला साथ देईल. नामात सर्व काही आहे.
सकाळचे धुके, राजिवड्याच्या समुद्राची गाज, गुलाबी थंडी, पहाटेचे कुंद वातावरण, समधुर संगीताच्या तालावरचा हरिपाठ गाणारी वारकरी मंडळी क्षणभराचा दोन वेळचा विसावा असे पदयात्रेचे स्वरूप आहे. पाहिली छोटीशी विश्रांती कोहिनूर हॉटेलसमोर घेण्यात येईल. त्यानंतर साधारणपणे सव्वासहा वाजता फणसोप हायस्कूल येथे दुसरी विश्रांती घेण्यात येईल. त्यानंतर रनपार फाटा येथे तिसरी विश्रांती होईल. पावस येथे साधारणपणे ९वाजेपर्यंत पोहोचता येईल. त्यानंतर मंदिरासमोर फेर धरून नाचणे, अभंग सांगणे, नंतर शीण घालवण्यासाठी अल्पोपाहार, नंतर ट्रक किंवा तत्सम वाहनाने रत्नागिरीचा परतीचा प्रवास होईल.
सर्वांचा शक्यतो पांढरा पोषाख असावा, पुरुषांसाठी पांढरी टोपी आवश्यक असून आवश्यक असल्यास पाण्याची बाटली आणावी. शक्यतो सर्वांनी नेहमीच्या वापरातले साधे चालण्यासाठीचे बूट, चप्पल घालावेत. येताना सोबत आपले नाव, पत्ता व फोन नंबर एका छोट्या कागदावर लिहून ते संयोजकांकडे द्यावे. अधिक माहितीसाठी राजन पटवर्धन (९८६०३६६९९१) आणि अनंत आगाशे (७०८३१६२९७५) यांच्याशी संपर्क साधावा.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

