विकसित भारत हवा; पण शारीरिक आणि भावनिक आरोग्यसंपन्नतेसह : डॉ. उपेंद्र किंजवडेकर

रत्नागिरी : ‘गेल्या काही वर्षांत साखर, मीठ आणि मैदा या तीन पदार्थांच्या आहारातील वाढलेल्या प्रमाणामुळे भारतात तरुण पिढीत अनेक असंसर्गजन्य विकारांचे प्रमाण भयावहरीत्या वाढलेले आहे. २०४७ साली भारत विकसित देश व्हायला हवा, असे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे; मात्र केवळ तांत्रिक किंवा आर्थिकदृष्ट्या नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यसंपन्नतेसह देश विकसित होणे गरजेचे आहे. अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड अर्थात अतिरेकी प्रक्रिया केलेले पदार्थ न खाणे, लहान मुलांना त्यांपासून कटाक्षाने दूर ठेवणे, मुलांच्या कामगिरीची अन्य मुलांशी तुलना न करणे, त्यांना भरपूर खेळायला देणे, स्क्रीन टाइम कमी करणे अशा अनेक गोष्टी त्यासाठी आवश्यक आहेत,’ असे प्रतिपादन भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजवडेकर यांनी केले. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘स्वास्थ्य : नवी पिढी, नवी आव्हाने’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी)

कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात १४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. या वेळी व्यासपीठावर अध्यक्ष माधव हिर्लेकर व उपाध्यक्ष मानस देसाई यांच्यासह कार्यकारिणी सदस्य अॅड. सौ. प्रिया लोवलेकर, सौ. प्रतिभा प्रभुदेसाई, सौ. सुयोगा जठार, मिलिंद आठल्ये, दिलीप ढवळे, उमेश आंबर्डेकर, विवेक पुरोहित उपस्थित होते. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

डॉ. किंजवडेकर म्हणाले, ‘कोविड हा संसर्गजन्य आजार होता; मात्र मधुमेह, ताणतणाव, आत्महत्या, मोबाइलचे व्यसन, स्थूलपणा, कर्करोग असे असंसर्गजन्य विकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पूर्वी मधुमेह, कर्करोग व हृदयविकार हे विकार पन्नाशी-साठीच्या पुढील वयोगटात दिसायचे. आज ते तिशीतही दिसू लागले आहेत. अति प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे आहारातील वाढते प्रमाण हे त्याचे प्रमुख कारण आहे. साधारणतः १९७४ सालापर्यंत जगभरात सर्वत्र आजारांचे प्रमाण तसे कमी होते. त्यानंतर मात्र कंपन्यांनी आक्रमक मार्केटिंग करून खाद्यपदार्थ बाजारात आणले. त्यांच्या विक्रीसाठी मोठे प्रयत्न केले. लोकांना सवय लावली आणि त्यातून अनेक प्रकारचे आजार वाढले. कारण माणसाच्या आधीच्या कित्येक पिढ्यांना असे काही पदार्थ माहितीच नव्हते. त्यामुळे ते पचवायचे कसे, याचे ज्ञान शरीराला नाही. त्यातूनच विविध विकारांचा जन्म होतो. साखर, मीठ व मैदा हे शत्रूच आहेत. त्यामुळे ते अत्यल्प खावेत. अति रासायनिक प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ खाऊच नयेत. कोणत्याही दुकानात, टपरीवर असे पॅकबंद खाद्यपदार्थ सहज विक्रीस उपलब्ध असतात. परंतु ते मुलांसाठी घातक आहेत. त्यामुळे पोट साफ होत नाही. जिभेवर नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे. जिभेवरून जो पदार्थ लगेच पोटात जातो, तो शरीराला धोकादायक असतो. म्हणूनच घास ३२ वेळा चावून खाण्याची पद्धत पूर्वीपासून आहे. आहारात किमान ४० टक्के भाज्या आणि फळे असावीत. ते शरीरासाठी चांगले ठरते.’

‘मुलांना निदान त्यांच्या वयाची पहिली दोन वर्षे तरी मोबाइल/स्क्रीन दाखवू नका, असे सांगूनही पालक ऐकत नाहीत. आता कुटुंबात दोन-तीनच सदस्य असल्याने मुलांना आत्या, मावशी, काका, आजी, आजोबा हे नातेवाईक माहिती नसतात. त्यामुळे त्यांच्याशी भावनिक गुंतवणूक होत नाही. नव्याने पिढीला वाचवायचे असल्यास मुलांना मागितल्याक्षणी लगेच कोणतीच गोष्ट देऊ नका. नाही म्हणायला शिका. त्यांना त्यांच्या भावना ओळखायला शिकवा. आयक्यू (बुद्ध्यंक) महत्त्वाचा आहेच; पण इमोशनल कोशंट (ईक्यू) म्हणजेच भावनिक बुद्ध्यंकही अत्यंत महत्त्वाचा आहे,’ असेही डॉ. किंजवडेकर यांनी सांगितले.

या वेळी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी डॉ. किंजवडेकर यांचा सन्मान केला. प्रास्ताविकामध्ये श्री. हिर्लेकर म्हणाले, ‘समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांना संघातर्फे पुरस्कार देतो. महिला, तरुण मंडळींना प्रोत्साहन देणे, त्यांचे कौतुक करणे व त्यांचे काम समाजासमोर यावे असे याचे उद्देश आहेत. डिसेंबरच्या दुसऱ्या रविवारी हा कार्यक्रम आयोजित करतो. नवी पिढी अधिक प्रमाणात या कार्यक्रमाला यायला हवी.’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी केले आणि उपाध्यक्ष मानस देसाई यांनी आभारप्रदर्शन केले. स्वरदा लोवलेकर हिने सुरेल आवाजात संपूर्ण वंदे मातरम् गीत सादर केले.

पुरस्कारविजेते आणि त्यांचे मनोगत
राणी लक्ष्मीबाई पुरस्कार – वैष्णवी फुटक, धन्वंतरी पुरस्कार – डॉ. गजानन केतकर, आदर्श पौरोहित्य पुरस्कार – वेदमूर्ती आहिताग्नी अनिरुद्ध ठाकूर, आचार्य नारळकर पुरस्कार – प्रज्ञेश देवस्थळी, आदर्श कीर्तनकार पुरस्कार – ह. भ. प. पुरुषोत्तम काजरेकर, उद्योजक पुरस्कार – प्रशांत आचार्य व हृषीकेश सरपोतदार, उद्योगिनी पुरस्कार – सौ. कांचन चांदोरकर व कृषीसंजीवन पुरस्कार – अतुल पळसुले-देसाई.
पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे आभार मानले. वेदमूर्ती ठाकूर म्हणाले, ‘प्रत्येकाने आपले कर्तव्य निःस्वार्थी बुद्धीने आणि प्रामाणिकपणे पार पाडावे.’ ह. भ. प. काजरेकर यांनी सांगितले, ‘कीर्तनाने लोकांना उद्धरावे, वरच्या पायरीवर न्यावे. असे काम गुरुजींच्या कृपेने मी करत आलोय.’ प्रज्ञेश देवस्थळी यांनी हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ. किंजवडेकर यांच्या हस्ते मिळणे हा सुंदर, दुर्लभ योगायोग असल्याचे सांगितले. प्रज्ञेश देवस्थळी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या वसतिगृहाचे विद्यार्थी होते. प्रशांत आचार्य आणि हृषीकेश सरपोतदार हे दोघेही वसतिगृहाचे विद्यार्थी आणि एकाच खोलीत राहत होते. आचार्य यांनी कऱ्हाडे ब्राह्मण संघाची वास्तू प्रेरणादायी असल्याचे सांगून, अजून मोठा पल्ला गाठायचा आहे, असे सांगितले. सरपोतदार यांनी संघाचे वसतिगृह म्हणजे एक विद्यापीठच असल्याची भावना व्यक्त केली आणि येथील सात वर्षांच्या वास्तव्यात जे शिकता आले, त्याचा व्यावसायिक जीवनात मोठा उपयोग झाल्याचे सांगितले. लोकांच्या आरोग्याचा विचार करूनच जोशी फूड्स उद्योगात खाद्यपदार्थ बनवले जातात, असे सौ. कांचन चांदोरकर यांनी सांगितले. प्रिझर्व्हेटिव्ह घालत नसल्याने आपल्या उद्योगाने पदार्थांच्या निर्यातीचा पर्याय नाकारला असल्याचेही त्यांनी नमूद केले. महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी सांगितले. अतुल पळसुले-देसाई यांनी खेड्यात राहून शेती करण्याचा पर्याय आवडीने निवडल्याचे सांगतानाच पत्नी मुंबईतील असूनही तिने दिलेली साथ आणि सर्व कुटुंबीयांचे भक्कम पाठबळ असल्यामुळे यश मिळाल्याचे सांगितले. डॉ. गजानन केतकर यांनी हा आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस असल्याची भावना व्यक्त केली. वैष्णवी फुटक ही खो-खो स्पर्धेला गेलेली असल्यामुळे तिच्या वतीने तिची आई आणि धाकट्या बहिणीने पुरस्कार स्वीकारला.

पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा अल्प परिचय
राणी लक्ष्मीबाई पुरस्कार – वैष्णवी सुशील फुटक (मु. पो. टिके फुटकवाडी रत्नागिरी) :
ही विद्यार्थिनी रा. भा. शिर्के प्रशालेत इयत्ता नववीत शिकत असून, ती राष्ट्रीय खो-खोपटू आहे. १४ वर्षांखालील शालेय स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देण्यात तिचे योगदान आहे. तसेच १४ वर्षांखालील कुमारी गट राज्यस्तरीय स्पर्धा, धाराशिव येथे १८ वर्षांखालील राज्यस्तरीय स्पर्धा, अहिल्यानगर येथे १९ वर्षांखालील राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा तिने गाजवल्या आहेत. डेरवण आणि अस्मिता, खेलो इंडिया आदी स्पर्धांमध्ये तिने चमकदार कामगिरी केली आहे. भाई नेरूरकर चषक स्पर्धेतही ती चमकली आहे. क्रीडा शिक्षक विनोद मयेकर व प्रशिक्षक पंकज चवंडे यांचे मार्गदर्शन तिला लाभले आहे. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

धन्वंतरी पुरस्कार – डॉ. गजानन केशव केतकर (साखरपा) : यांनी कोल्हापूर व मुंबईच्या पोदार मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतले. १९७५मध्ये साखरप्यात त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. खेडेगावात अनेक असुविधांचा सामना करत सेवायज्ञ म्हणून रुग्णसेवा करत आहेत.

आदर्श पौरोहित्य पुरस्कार – वेदमूर्ती आहिताग्नी अनिरुद्ध अनंत ठाकूर (नाटे) : हे १९७२पासून रा. स्व. संघाचे स्वयंसेवक आहेत. आणीबाणीच्या वेळेस ४ महिने त्यांनी रत्नागिरीच्या कारागृहात तुरुंगवास भोगला. १९९९पासून त्यांनी आध्यात्मिक वाटचाल सुरू केली. मार्च १९९०मध्ये बार्शी (सोलापूर) येथे ३८५ दिवस गवामयन संवत्सर सत्रामध्ये पत्नीसह सहभाग घेतला. एक वर्ष चालणाऱ्या यज्ञामध्ये गाईच्या तुपाच्या, पुरोडाशाच्या व सोमवल्लीच्या रसाच्या आहुती दिल्या. यज्ञसत्र संपल्यावर पुन्हा अग्नी घेऊन नाटे गावी परतले. जून २००१पासून आजगायत सकाळ-संध्याकाळी अग्निहोत्री होम सुरू आहे. हे व्रत स्वीकारताना सर्व कडक नियम ते पाळत आहेत. त्यांच्यासारखे अग्निहोत्री महाराष्ट्रात केवळ १३ व भारतात १५० आहेत.

आचार्य नारळकर पुरस्कार – प्रज्ञेश प्रभाकर देवस्थळी (आडिवरे) : टीव्हीवरचे शहरी झगमगटाचे जीवन सोडून आपल्या गावासाठी काहीतरी करावे या भावनेने ते गावात आले. नवेदर-आडिवरे येथील श्री महाकाली इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय माध्यमिक विभागात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते उत्तम सूत्रसंचालक व मुलाखतकार आहेत. हुशार व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता सहकार्य आणि वैद्यकीय उपचारांसाठी मदत ते करतात. “कर्तव्य प्रतिष्ठान” या ट्रस्टमार्फत २०१७पासून त्यांचे सामाजिक काम सुरू आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेताना देवस्थळी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या वसतिगृहाचे विद्यार्थी होते. यापूर्वी त्यांना राज्य नाट्य पुरुष अभिनय पुरस्कार , पित्रे फाउंडेशन साधन व्यक्ती पुरस्कार मिळाले आहेत. रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावर उद्घोषक, ई-टीव्ही मराठीवर वृत्तनिवेदक, पुरुषोत्तम करंडक पुणे नाट्य परीक्षक, आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा परीक्षक म्हणून त्यांनी कामगिरी केली आहे.

आदर्श कीर्तनकार पुरस्कार – ह. भ. प. पुरुषोत्तम विष्णू काजरेकर (जांभवडे, ता. कुडाळ) : कोणत्याही संस्थेत वा गुरूकडे त्यांनी कीर्तन शिक्षण घेतले नाही. परंतु घरामध्ये दर शनिवारी भजन- कीर्तनाच्या वह्यांमधून व मामांकडून माहिती घेऊन कीर्तने केली. चुलत भावंडांची कीर्तने ऐकून, मिळालेल्या मार्गदर्शनावरून ते कीर्तने करत आहेत. परमार्थ साधनालयात पौष महिन्याच्या उत्सवात गेली ३५ वर्षे ते कीर्तने करत असून, रामनवमी, हनुमान जन्मोत्सव, नवरात्रौत्सव, दत्तजयंती उत्सवामध्ये सलग पंधरा-वीस वर्षे कीर्तने करत आहेत.

उद्योजक पुरस्कार – प्रशांत गौतम आचार्य (आबलोली, गुहागर) व हृषीकेश विनायक सरपोतदार (आंजणारी, लांजा) : हे दोघेही कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या वसतिगृहातील सहकारी. सर्व शिक्षण आणि एक वर्ष नोकरी एकाच ठिकाणी करून एक सप्टेंबर २०१२ रोजी आर्यक सोल्युशन्स सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीची स्थापना त्यांनी केली. छोट्या दुकानदारांना सॉफ्टवेअर सेवा देण्यापासून आज आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स, मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांनाही ते सेवा देत आहेत. जगभरातील दहापेक्षा जास्त देशांमधील ग्राहक आर्यक सोल्युशन्सच्या सेवांचा लाभ घेत आहेत. दररोज शंभरपेक्षा जास्त देशांमधील युझर्स आर्यकने डेव्हलप केलेली सॉफ्टवेअर्स वापरतात.

कृषीसंजीवन पुरस्कार – अतुल अनंत पळसुलेदेसाई (व्हेळ, लांजा) : यांचे पौरोहित्याचे शिक्षण झाले आहे. घरचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने व्हेळ येथे त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नवीन प्रयोग करण्याचे ठरवले. मोठ्या भावाच्या मदतीने ते कलिंगड, काकडी, भाजीपाला शेती करत आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे शेती व्यवसाय वाढवला आहे.

उद्योगिनी पुरस्कार – सौ. कांचन समीर चांदोरकर (लांजा) : बीएस्सी अ‍ॅग्रीकल्चर झालेल्या सौ. कांचन चांदोरकर या २०१८पासून जोशी फूड्सच्या संचालिका म्हणून काम पाहत आहेत. विविध खाद्यपदार्थ, नमकीन पदार्थ बनवण्याची त्यांची फॅक्टरी असून ४५ महिला आणि पुरुषांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. महिला सक्षमीकरणासाठी त्या काम करीत आहेत. त्या आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिकरीत्या स्वावलंबी होण्याकरिता प्रयत्न करत आहेत. पर्यावरण संस्था, जनकल्याण समिती, स्वावलंबी भारत अभियानातही त्या सामाजिक कार्य करत आहेत.

प्रमुख पाहुण्यांचा परिचय :
प्रमुख पाहुणे डॉ. उपेंद्र शंकर किंजवडेकर हे १९९१पासून कमलेश मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल येथे कन्सल्टिंग पेडिअ‍ॅट्रिशियन म्हणून कार्यरत आहेत. ते इंडियन अकॅडमी ऑफ पेडिअ‍ॅट्रिक्सचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष असून, आंतरराष्ट्रीय पेडिअ‍ॅट्रिक असोसिएशनच्या कमिटीचे सदस्य, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सदस्य म्हणून काम करत आहेत. त्यांची अनेक पुस्तके, शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रासह विविध राज्यांत अनेक व्याख्याने दिली आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर अबूधाबीमध्ये समन्वयक, पॅनेलिस्ट, सिंगापूर, शेंगेन येथे सत्र समन्वयक, तसेच यूएईमध्ये व्याख्याते म्हणूनही त्यांनी भूमिका बजावल्या आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply