महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी नागपूरच्या धरमपेठ एज्युकेशन सोसायटीने नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरने रणमर्द नाटक सादर केले.
महत्त्वाकांक्षी नटाच्या अस्तित्वाची आणि कलेसाठी स्वतःला पणाला लावणाऱ्या कलाकाराची कथा ‘रणमर्द’ नाटकात सांगण्यात आली आहे.
पडदा उघडताच विश्वास मीराचे कार्यकारी निर्माता म्हणून चांगल्या पगाराची नोकरी मिळाल्याबद्दल अभिनंदन करतो. त्यावर ती आता आपण लग्न करू शकतो, असे विश्वासला सांगते. मात्र विश्वास मला पूर्ण वेळ नाटक करायचे आहे आणि त्यात स्थिरस्थावर झाल्याशिवाय आपण लग्न करायचे नाही, असे सांगतो. ती दोघे दिल्लीच्या ड्रामा स्कूलचे विद्यार्थी असतात.
रंगभूषक साने आणि नाट्यनिर्माते मानकामे विश्वासला भेटायला येतात. त्यांना ‘रणमर्द’ हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणायचे असते आणि त्यातील अभिनेते गुरुनाथ करत असलेली भूमिका विश्वासने करावी, तसेच मीराने निर्मितीचे काम पाहावे, असे ते सुचवितात. संहिता वाचून विश्वास कळवितो असे सांगतो व ते जातात.
विश्वास मीराला नाटक करावे काय याबद्दल विचारतो. त्यावर ती म्हणते, “‘गुरुनाथ’ यांनी त्या नाटकप्रसंगी आत्महत्या केली असल्याने ते शापित नाटक आहे असं बोललं जातं. गुरुनाथ यांनी अजरामर करून ठेवलेल्या भूमिकेशी तुझी तुलना होईल. सबब हे नाटक करू नये.” मग ती वाचनालयात जायला निघते.
विश्वासला बरेच दिवस नाटक मिळालेले नसते. त्यामुळे ही संधी सोडायची नाही, ‘गुरुनाथ’ करीत असलेली भूमिका आपण करायची असे तो ठरवतो. मीराचा विरोध असूनही, आपण मी ही भूमिका तंत्रीय अभिनयाच्या साहाय्याने कशी करणार, हे तो तिला पटवून देतो.
गुरुनाथ यांची पत्नी मीराला भेटायला येते. “विश्वासला ही भूमिका करण्यापासून परावृत्त कर, त्या भूमिकेत गुरुनाथ शिरले होते व रणमर्दचं आयुष्य जगत होते. त्या भूमिकेने गुरुनाथला गिळंकृत केलं. मी जिथे उभी होते तिथे तू उभी आहेस. काळजी घे”, असे सांगून जाते.
रणमर्दचा शुभारंभाचा प्रयोग होतो. नाटकाला प्रतिसाद कमी मिळतो. याबद्दल समीक्षक दामले साने यांना सांगतात, “गुरुनाथचा वारसा चालविणं सोपे नाही, त्यांची उणीव जाणवली, नाटक नव्याने आलंय, मात्र जिवंत झालेलं नाही.” आज शुभारंभाचा प्रयोग आहे अजून बदल होईल, असे साने सांगतात. प्रेक्षकांकडूनही विश्वासच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त होते.
टीकेमुळे विश्वास अस्वस्थ होतो, तो गुरुनाथ यांच्या शैलीनुसार अभिनय करायचा असे ठरवितो. विश्वासची बदललेली अभिनय शैली त्याच्या सहकलाकारांनाही जाणवते, तो रणमर्दासारखा वागतोय, झपाटला जातोय, भूमिका जगतोय, चुकले तर रागावतोय, असे सहकलाकार रंगभूषक सानेंना सांगतात, विश्वासचे रागावणे तुमच्या भल्यासाठी आहे, असे साने त्यांना समजावतात.
ज्या ठिकाणी गुरुनाथ यांचे प्रयोग करताना निधन झाले, त्याच ठिकाणी ‘रणमर्द’चा प्रयोग ठरतो. मीरा विश्वासला म्हणते, “तू ठरवल्याप्रमाणे काम कर. मागे काय घडलं याचा विचार करू नको. मी तुझ्या सोबत आहे.”
अभिनेते गुरुनाथ भूमिकेत शिरले की कोणाशी बोलतही नसत, ‘त्या’ दिवशी ‘रणमर्द’ मधील शेवटचे स्वगत सुरू झाले, संवादानुसार त्यांनी खरोखरच खंजीर छातीत खुपसला, खोल जखम झाली, त्यात त्यांचे निधन झाले, ही गोष्ट सानेंकडून मीराला कळल्याने ती अस्वस्थ होती. इतिहासाची पुनरावृत्ती घडू नये म्हणून तिचा प्रयत्न असतो. शेवटच्या स्वगत प्रसंगी विश्वाससोबत असणाऱ्या सहकलाकाला ती त्याला सांभाळा असे सांगते. तसेच “अपयशी ठरला तरी चालेल पण विश्वासचा जीव वाचला पाहिजे”, हे ठरवते. नाटकाच्या शेवटच्या प्रसंगातील विश्वासचे स्वगत सुरू होते संवादाप्रमाणे विश्वास छातीत खंजीर खुपसून घेणार त्याक्षणी रंगमंचावरील लाइट जातो, विश्वासचा जीव वाचतो.
मीराला गुरुनाथ प्रकटल्याचा भास होतो. ते मीराला म्हणतात, “तू शेवटच्या क्षणी, विश्वासचं भूमिकेतील संमोहन तोडलंस म्हणून तो वाचला,” मीरा म्हणते, “तुमच्या ‘त्या’ शेवटच्या प्रयोगाला मी हजर होते. कलाकाराने भूमिका प्रत्यक्ष जगायची नसते, ती आभासी, रंगमंचापुरती भूमिका असते, तुम्ही तसं करू शकला नाहीत, हा तुमचा पराभव होता.” गुरुनाथ ते मान्य करतात. “तुझ्या कृतीने माझ्या मुक्तीचा मार्ग मोकळा झाला. ‘माणूस जगला तर कला जिवंत राहील’.” असे सांगून ते अंतर्धान पावतात.
बदलत्या नेपथ्यातून ‘रणमर्द’ नाटकाची कथेची गूढता वाढविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. पूर्ण ब्लॅकआऊट न करता मंद प्रकाशात गरजेनुसार नेपथ्य बदल केले गेले आहेत, ते नावीन्य आणतात. यासाठी प्रकाशयोजनेचाही आधार घेतलेला आहे.
तालीम सुरू होताना विश्वास तंत्रीय अभिनयाचा वापर करून भूमिकेपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतो, मात्र प्रेक्षकांच्या अपेक्षा व अपयशाची भीती त्याला गुरुनाथ यांच्या जीवघेण्या शैलीकडे खेचून नेते. मीराच्या प्रेमाची साद आणि वास्तवाची जाणीव विश्वासला या जीवघेण्या संमोहनातून बाहेर काढते, अशी काहीशी गूढ व थरारक अनुभव ही नाट्यकृती देते.
श्रेयनामावली
नाटक – रणमर्द
संस्था – धरमपेठ एज्युकेशन सोसायटीचे नटराज आर्ट अँड कल्चर सेंटर, नागपूर
मूळ लेखक – रत्नाकर मतकरी
रंगावृत्ती – निखिल टोंगळे, हर्षद सालपे (साह्य – समीर हेजीब, श्वेता पतकी, मयूरी टोंगळे)
दिग्दर्शन – निखिल टोंगळे
संगीत – आभास पेंढारी
प्रकाशयोजना – प्रणव कोरे
रंगभूषा – श्रद्धा रोकडे
वेशभूषा – मयूरी टोंगळे
नेपथ्य – समीर हेजीब
पात्रपरिचय
विश्वास – निखिल टोंगळे
मीरा – श्वेता पतकी
रंगभूषक (प्रभाकर साने) – समीर हेजीब
नटी (राणी) – नारायणी उपाध्याय
मिसेस गुरुनाथ – मयूरी टोंगळे
प्रोड्यूसर मानकमे आणि रणजित बहादूर – कौस्तुभ गाडगे
समीक्षक – शेखर मंगलमूर्ती
इराबाई – दीपा पतकी
शूरसेन – ओंकार काळे
गुरुनाथ अकूल हेजीब
(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)




कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

