रत्नागिरी : काल (५ जुलै) रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार राजापूरमधील एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीलाही करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांत राजापूर शहरातील करोना रुग्णांची संख्या चारवर पोहोचली आहे. आता राजापूर तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ४२ वर गेली असून, राजापूर ग्रामीण रुग्णालयातील एकूण ३५ कर्मचाऱ्यांना आज क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
सुरुवातीचे तीन महिने राजापूर शहर करोनामुक्त होते; मात्र गेल्या शुक्रवारी सायंकाळी साखळकरवाडीतील एक महिला करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने शहरात घबराट पसरली. पाठोपाठ दुसऱ्या दिवशी आणखी एक रुग्ण सापडला. बाजारपेठेतील एका व्यापाऱ्याला करोनाची लागण झाली. या दोन्ही रुग्णांचा मुंबई किंवा बाहेरच्या प्रवासाचा कोणताही इतिहास नसतानाही त्यांना करोनाची बाधा झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्रीच्या अहवालामुळे त्यात आणखी भर पडली आहे.
काल रात्री उशिरा मिळालेल्या अहवालानुसार राजापूर शहरातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा आणि त्याच्या पत्नीचाही करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वैद्यकीय अधिकारीच करोनाबाधित झाल्याने तालुक्याची आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. प्रशासनाने लगेचच राजापूर ग्रामीण रुग्णालयातील ३५ कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन केले असून, त्या सर्वांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे .
आज वाढलेल्या दोघा रुग्णांमुळे राजापूर शहरातील करोनाबाधितांची संख्या गेल्या चार दिवसांत चारवर पोहोचली असून, तालुक्याची रुग्णसंख्या ४२ झाली आहे. दिवसेंदिवस राजापूर शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे.
(रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आजचे अपडेट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
…….