मुंबई : राज्यातील कंटेन्मेंट झोन वगळून हॉटेल, लॉज, अतिथीगृहांना आठ जुलैपासून क्षमतेच्या ३३ टक्के सेवा देण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मिशन बिगिन अगेन अभियानांतर्गत या व्यवसायांना करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या अटी आणि शर्तींसह सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हॉटेल असोसिएशनसमवेत नुकतीच बैठक झाली होती. हे व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले होते. त्यानुसार हे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
नियमांचे पालन आवश्यक
हॉटेलच्या दर्शनी भागात करोना प्रतिबंधात्मक उपाय आणि मार्गदर्शिका याविषयी माहिती देणारे फलक असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच गर्दी टाळण्यासाठी आणि वाहनतळासाठी योग्य व्यवस्था आवश्यक आहे. सामाजिक अंतर राखले जावे, अशी बैठक व्यवस्था करणे बंधनकारक आहे. थर्मल स्क्रीनिंग (शरीराचे तापमान मोजणे) करण्याबरोबरच स्वागत कक्षाला संरक्षक काच असणे आवश्यक आहे. सर्वांसाठी सहज निर्जंतुकीकरण द्रव्य (सॅनिटायझर) उपलब्ध करणे आवश्यक आहे. हॉटेल कर्मचाऱ्यांसह अतिथींना मास्क, हातमोजे इत्यादी साहित्य उपलब्ध करणे आवश्यक आहे. पैशाच्या देवाणघेवाणीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला पाहिजे. लिफ्टमधील संख्याही नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. याबरोबरच वातानुकुलित यंत्रणेचे तापमान २४ ते ३० अंश सेल्सिअस आणि आर्द्रता ४० ते ७० टक्के असावी.
हॉटेलमध्ये केवळ लक्षणे नसलेल्या अतिथींनाच प्रवेश देण्यात यावा. तसेच, त्यांनी मास्क वापरणे आवश्यक आहे. आरोग्य सेतू ॲप त्यांच्या मोबाइलमध्ये असणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी आपले प्रवास तपशील, आरोग्यविषयक माहिती आणि ओळखपत्र देणे आवश्यक आहे. हॉटेलच्या खोल्या स्वच्छ निर्जंतुकीकरण केलेल्या असणे आवश्यक आहे. प्रत्येक अतिथी गेल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा होणे आवश्यक आहे. एखादा अतिथी आजारी किंवा लक्षणाचा दिसल्यास त्याचे विलगीकरण करणे आवश्यक आहे.
याबाबतचे आदेश सहा जुलै २०२० रोजी मुख्य सचिव संजयकुमार यांनी निर्गमित केले आहेत.
……