नवी दिल्ली : देशभरात असलेली सुमारे १९४ दीपगृहे ही पर्यटकांना आकर्षून घेणारी केंद्रे म्हणून विकसित करण्याबद्दल आज (सात जुलै) केंद्रीय नौवहन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मनसुख मांडवीय यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. दीपगृहांचा परिसर विकसित करण्याविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली. दीपगृहांचा समृद्ध इतिहास जाणून घेण्याची संधी पर्यटकांना यामुळे मिळू शकणार आहे, असे मांडवीय या वेळी म्हणाले. अशा प्रकारची पर्यटन संधी विकसित झाल्यास कोकणासारख्या किनारी भागांतील पर्यटनवाढीला चालना मिळणार आहे.
देशातील दीपगृहे पर्यटनस्थळे म्हणून विकसित करण्यासाठी अधिकारी वर्गाने सविस्तर कृती आराखडा या वेळी सादर केला. जी दीपगृहे १०० वर्षांहून अधिक जुनी आहेत, अशा दीपगृहांच्या इतिहासाची माहिती देणारे संग्रहालय त्यांच्या परिसरामध्ये तयार करण्याचा सल्ला मांडवीय यांनी दिला. तसेच दीपगृहाचे काम कसे चालते, त्यामध्ये वापरण्यात येणारी उपकरणे यांची माहिती पर्यटकांना देण्यावर भर दिला जावा, असेही सांगितले.
दीपगृह परिसर विकास आराखड्यामध्ये संग्रहालय, मत्स्यालय, तसेच मुलांसाठी खेळण्याची सुविधा आणि बागबगीचा यांचा समावेश असावा, तसेच जलाशय तयार करण्यात यावा, अशा सूचना मांडवीय यांनी केल्या.
या बैठकीत मनसुख मांडवीय यांनी गुजरातमधील गोपनाथ, द्वारका आणि वेरावल या ठिकाणच्या दीपगृह परिसरामध्ये पर्यटन उपक्रम राबविण्यासाठी सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. दीपगृह विकास प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण करण्याचे निर्देशही मांडवीय यांनी दिले. या बैठकीला जहाजबांधणी मंत्रालयाचे सचिव, दीपगृह महासंचालक, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
……