परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मानावा लागेल : उदय सामंत

मुंबई : आरोप -प्रत्यारोप करण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून त्यातून मार्ग काढावा लागेल आणि त्या निर्णयाचा आदर सर्वांनाच करावा लागेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षाबाबत परीक्षेची तारीख बदलू शकते; मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्या निकालानंतर सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन परीक्षा घेण्यासंदर्भात भूमिका मांडली. ते म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मी आदर करतो. राज्य सरकारने विद्यार्थी व पालकांची भूमिका ठामपणे न्यायालयात मांडली. अंतिम वर्ष अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसे प्रतिज्ञापत्रातही आम्ही या परिस्थितीत परीक्षा घेऊ शकत नाही, असे कळवले होते. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेचा निर्णय घेण्याबाबत ऐच्छिक मुभा द्यावी, असे सरकारने न्यायालयाला सांगितले होते. तसा शासन निर्णयही काढण्यात आला होता. परीक्षा रद्द करण्याचे सरकारने म्हटले नव्हते; पण करोनाची परिस्थिती लक्षात घेऊन पदवी देण्याचा निर्णय होता. ज्या विद्यार्थ्यांना ग्रेडसाठी परीक्षा द्यायची आहे. त्यांच्यासाठी घेतली जाणार होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घेण्याचा निर्णय दिला आहे. महाराष्ट्र सरकारने कोणतेही संकट नसताना हा निर्णय घेतलेला नव्हता, तर विद्यार्थी, पालक आणि सगळीच वस्तुस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला होता. आपत्ती व्यवस्थापनाने तो अंतिम केला होता; पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर करून भविष्यात परीक्षा कशा घ्यायची, या संदर्भात चर्चा करणार आहोत.


यूजीसीकडून वेळ मागून घेऊन नंतर निर्णय घ्यावे लागतील. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे मार्ग काढावा लागणार असून, कुलगुरूंशी चर्चा करून परीक्षा घेण्यासंदर्भात पुढील निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांपासून ते कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन कशा पद्धतीने परीक्षा घेता येतील, यासंबंधी योजना तयार करण्यात येणार आहे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply