कोकण विकासाचे नवे प्रदूषणविरहित स्वप्न

कोकणाच्या आणि प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाविषयीचे एक नवे धोरण राज्य शासनातर्फे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. रत्नागिरी जिल्हा म्हणजे राज्यातील पहिला इनोव्हेशन डिस्ट्रिक्ट म्हणजेच नवप्रवर्तन जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आला आहे. कोकणात पर्यावरणपूरक कारखानदारी उभारण्याबाबत या नियोजित प्रकल्पात विचार करण्यात येणार आहे. जगभरातील वैज्ञानिक आणि संशोधक त्यावर काम करतील. उद्योगांना मार्गदर्शन मिळणारी संशोधन केंद्रे स्थापन केली जातील. आंतरराष्ट्रीय संशोधन विद्यापीठ आणि शाळा सुरू केली जाणार आहे. लक्षावधी तरुणांना या नव्या आराखड्यानुसार रोजगार मिळणार आहे. नव्या औद्योगिक धोरणामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा नक्की विकास होईल, असे चित्र निर्माण करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला आहे. तसाच रत्नागिरी जिल्हा फलोद्यान जिल्हा मानला जातो. फळप्रक्रिया उद्योगांना या जिल्ह्यात भरपूर भवितव्य आहे, असे वेगवेगळ्या व्यासपीठावर नेहमीच सांगितले जाते. त्यासाठी हजार-दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली असती तरी विकासाला भरपूर चालना मिळाली असती, पण हा खूपच कोता विचार झाला. कारण स्थानिक तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ आणि उद्योजकांनी फक्त फलोद्यान आणि त्यावरची प्रक्रिया या विषयावर वर्षानुवर्षे काहीच केले नाही. त्यामुळे यापुढे जे काही करायचे ते भव्य आणि दिव्य असले पाहिजे, या विचाराने पावले उचलली जात आहेत. स्थानिक आणि कृषी उद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्न करायला हवे आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगत आहेत. त्याच वेळी विदेशातील तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, उद्योजक कोकणाकडे आकर्षित करायला प्राधान्य देण्याचे धोरण आखण्यात आले आहे. स्थानिक फळे आणि शेतीच्या उत्पादनांवरची प्रक्रिया करण्याचे स्थानिक लोकांचे आजवरचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. त्यामुळेच विदेशातील तज्ज्ञांना पाचारण करण्यात येणार आहे. तेच प्रदूषणविरहित कारखान्यांच्या आधारातून कोकणाचा विकास साधणार आहेत. कोकणात जेथे जागा मिळेल तेथे उद्योग उभारले जाणार आहेत. ऑटोमोबाइलसारख्या प्रदूषणविरहित उद्योगांची उभारणी होणार असल्यामुळे गावागावांमधील तरुणांना रोजगार मिळेल. त्यामुळे आतापर्यंतच्या कोकणातील आतबट्ट्याची शेती आणि इतर उद्योगांकडे पाहण्याचे काहीही कारण नाही. पर्यटनाला उद्योगाचा दर्जा देण्याची संकल्पना घेऊन कामकाज केले जाणार आहे. कोकणातील नैसर्गिक संपत्तीचा पर्यटनदृष्ट्या वापर झाला नसेल, त्याचा वापर करतानाच रोजगार उपलब्ध करून देण्याचा विचार केला जाईल. त्याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग या पर्यटन जिल्ह्यात ताज समूह शंभर सव्वाशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असलेल्या शंभर-सव्वाशे खोल्या पर्यटकांना उपलब्ध करून देणाऱ्या पंचतारांकित हॉटेलच्या उभारणीचा तीन वर्षांचा समयबद्ध कार्यक्रमही निश्चित करण्यात आला आहे. त्याबाबतच्या सामंजस्य करारावर सह्याही झाल्या आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर परिसर येत्या तीन वर्षांत पर्यटनदृष्ट्या निश्चितच अत्यंत विकसित होणार आहे, अशी खात्री त्या भागातील रहिवाशांनी बाळगायला हरकत नाही.

प्रत्यक्षात काही करता आले नाही तरी चालेल, पण किमान स्वप्ने तरी मोठी बघावीत, असे मोठमोठ्या उद्योजकांनी सांगून ठेवले आहे. त्या दिशेने पडलेले कोकणच्या विकासाच्या नव्या स्वप्नाचे हे एक नवे पाऊल राज्य शासनाने उचलले आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लाडका गणेशोत्सव कसाबसा साजरा करणाऱ्या कोकणवासीयांना त्या नवप्रवर्तन औद्योगिक जिल्ह्याचा आराखडा येईपर्यंतचे चार-पाच महिने त्या स्वप्नात घालवावे लागतील. तेवढी त्यांची तयारी नक्कीच आहे. त्यापुढच्या काळात एक तर ते स्वप्न विसरले जाईल किंवा ते मनाशी सतत बाळगून पुढचा काळही आनंदात घालविता येऊ शकेल.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २८ ऑगस्ट २०२०)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा २८ऑगस्टचा अंक मोफत डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

स्थानिक उपलब्ध साधनांच्या साह्याने कमी खर्चात टिकाऊ पाणीसाठवण टाक्यांच्या निर्मितीचे उल्हास परांजपे यांचे तंत्र. त्यांची पुस्तके ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी लिंक्स
‘चला पाणी साठवू या… अर्थात फेरोसिमेंटची किमया’ : shorturl.at/mrsM2
नैसर्गिक धागे-सिमेंट तंत्रज्ञानाने चला पाणी साठवू या!’ : shorturl.at/dFR37
Follow Kokan Media on Social Media

One comment

Leave a Reply