माझी शाळा, माझे शिक्षक : लेखांक ९ (मठ येथील खानोलकर हायस्कूलचे जोशी सर)

श्री. जोशी सर

शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील नववा लेख आहे उज्ज्वला धानजी यांचा… मठ (ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) येथील रायसाहेब डॉक्टर रा. धों. खानोलकर हायस्कूलचे रामकृष्ण पांडुरंग जोशी यांच्याबद्दलचा…
………
ज्ञानसागरात उमलणाऱ्या कळ्यांना ज्ञानदानासोबतच संस्काराची समृद्ध शिदोरी देणारे माझे गुरुवर्य जोशी सर. ज्ञानाची भूक पोटातील भूक भागल्यावर ओठावर येते हे जाणून माध्यान्ह आहार म्हणून दुपारच्या डब्यापासून वंचित असलेल्या मुलांना उकड्या तांदळाची दबदबीत पेज मिळण्यासाठी तांदळापासून, भांड्यांपर्यंत देणगी, वर्गणीतून वेगळा उपक्रम राबविणारे माझे मातृ-पितृहृदयी सर. शाळांतून पोषण आहार सुरू होण्याच्या अगोदरचे माध्यान्ह आहाराचे प्रणेते….

आम्हाला प्रत्यक्ष शेती करण्याचे ज्ञान देऊन शेतीच्या मानसन्मानाचे, शेती प्रयोगाच्या संघटन कौशल्याचे प्रणेते! शाळेत संचयनी बचत योजना सुरू करणारे पथदर्शक! श्रावण सोमवारी वेंगुर्ले सागरेश्वर सहलीचा आनंद, निसर्गाविष्कार, शहर ओळख, सागरदर्शन, वाळूतील कबड्डी मॅचेसमधून खिलाडूवृत्ती, काकड्या यातून जीवनानंदाची दिलेली अमृततुल्य शिकवण!
‘सर्व बोटांना काम द्या,’ ह्या सूत्रातून आमच्यासोबत स्वतः अंगमेहनत करून शाळा, ग्राउंडचे केलेले काम! कुशल व्यवस्थापन!

नदीवरील बंधारा, रस्त्याची डागडुजी, स्वयंभू परिसर कार्यातून समाजऋण फेडण्याचा दृष्टिकोन! श्रीगणेश चतुर्थीच्या निमित्ताने पालक भेटीसाठी अगत्याने घरी येऊन कौटुंबिक जिव्हाळ्यालाही लावलेला लळा! अशा उपक्रमशील गुरूंच्या कार्यकर्तृत्वाचा आदरणीय मधुभाई कर्णिक यांनी केलेला सन्मान!

उत्स्फूर्त वक्तृत्वाची प्रेरणा, मुलांच्यातील कलागुण हेरून कीर्तन, नाटिका, संवाद, नाटके बसवून कलागुणांची गुणग्राहकता! त्या काळी संस्कृत भाषेत ‘बीए ऑनर्स’ असलेले माझे गुरुवर्य आजतागायत संस्कृतच्या संवर्धनासाठी अहोरात्र झटणारे दीपस्तंभच!

आज नव्वदीच्या उंबरठ्यावर, पत्नीवियोगानंतरही स्वतः स्वयंपाक करणे, आंबाबागेत रपेट, स्कूटरचा प्रवास, एका गाईचे पितृत्वही. सारे काही एकटे राहून. आजही ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष या नात्याने करीत असलेले कार्य नेत्रदीपक!

‘छेलेबेला…’ पोरवयातील आठवणी ऐंशीव्या वर्षी लिहिणारे रवींद्रनाथ टागोर, साठाव्या वर्षी बंगाली शिकणारे ‘पुलं’ आणि नव्वदीत शिस्तबद्ध, समाजदर्शक कार्य करणारे माझे गुरुदेव! नक्कीच निसर्गही सर्वसामान्यांसाठीचे नियम ह्यांच्यासाठी सैल करत त्यांना चिरतरुण राखतो हे नक्की!

अशा गुरुवर्यांची मी शिष्या, माझी पूर्वजन्मीची पुण्याई! त्रिवार वंदन सर!

 • उज्ज्वला चंद्रशेखर धानजी (उज्ज्वला धोंडू मळेकर)
  (बँक ऑफ महाराष्ट्र, तळेरे शाखा येथे कार्यरत; लेखिका, कवयित्री)
  पत्ता : मु. पो. कलमठ, नाडकर्णीनगर, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग
  मोबाइल : ८३८०९ ३७६८१
  …..
  (पुढचा लेख योगेश मुणगेकर यांचा)
  (या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply