
शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील ११वा लेख आहे वैजयंती विद्याधर करंदीकर यांचा… भू (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील जि. प. प्राथमिक आदर्श शाळा क्र. १मधील सुरेश मधुसूदन हर्डीकर यांच्याबद्दलचा…
………
सुजाण नागरिक म्हणून आपल्या जडणघडणीत आपल्या पालकांनंतर महत्त्वाची भूमिका बजावतात ते आपले शिक्षक. आई-वडिलांच्या छायाछत्रात वाढलेल्या आपणाला पालक विश्वासाने शाळेत पोहोचवतात. वयाच्या सहा ते १६ कालावधीत आपली शाळा हे दुसरे घरच होऊन जाते आणि आपले शिक्षक हे आपल्या पालकांसमान होतात.
मला आठवतं, मी सहा वर्षांची असताना विजयादशमीला बाबांनी मला पाटी-दप्तर आणून दिलं. पाटीवर सरस्वती काढून तिची पूजा केली आणि दुसऱ्या दिवशी बाबांचं बोट धरून मी शाळेत गेले. शाळेचं नाव होतं – ‘पूर्ण प्राथमिक शाळा क्र. १, भू.’ माझं गाव लहान असल्यामुळे जवळपास सर्वच शिक्षक परिचयाचे होते, तरीही आपण घरापासून दूर आलो आहोत ही भावना कुठे तरी होतीच. आम्हाला असणाऱ्या प्रेमळ शिक्षकांपैकी हर्डीकर गुरुजींचं शिकवणं मला वैशिष्ट्यपूर्ण वाटलं.
कोणत्याही विद्यार्थ्याचे फाजील लाड त्यांनी केले नाहीत. परंतु, प्रत्येक विद्यार्थी आपलेच पाल्य आहे, या भावनेने त्यांनी संस्कार केले. गुरुजींची शिस्त कडक असली, तरी त्यामुळे शाळा चुकवावी असं कधीच वाटलं नाही.


हर्डीकर गुरुजी मला चौथीला असताना शिकवायला होते. मराठीच्या कविता त्या अर्थासह गाऊन शिकवत. पुस्तकामधील प्रत्येक गणित ते फळ्यावर सोडवून पक्कं करून घेत. इतिहास-भूगोलसारखे गहन विषयसुद्धा त्यांनी रम्यपणे शिकवले. केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे, तर गुरुजी हेच एक आदर्श व्यक्तिमत्त्व होते. सामाजिक बांधिलकी त्यांनी त्यांच्या कृतींमधून शिकवली. त्यासाठी आम्हाला पुस्तकी विषयांची कधीच आवश्यकता भासली नाही. मी पदवी प्राप्त केल्यावर गावात प्रथम अभिनंदन गुरुजींनीच केलं. माझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यात त्यांनी दिलेली शिकवण मला उपयोगी ठरली.
माझ्या लग्ना वेळी गुरुजी समोर येताच मी त्यांना नमस्कार केला. एवढ्या वर्षांनंतरही गुरुजी समोर आल्यावर विद्यार्थिनीला नमस्कार करावासा वाटेल, असा आदर गुरुजींनी निर्माण केला, हे त्यांचं मोठं वैशिष्ट्य आहे, असं मला वाटतं. हर्डीकर गुरुजींना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो हीच इच्छा…!
- वैजयंती विद्याधर करंदीकर
(लेखिका)
पत्ता : चैतन्य, आचरे रस्ता, मसुरकर किनई, कणकवली, जि. सिंधुदुर्ग
मोबाइल : ८६९८९ ८०८४६
…..
(पुढचा लेख शिवराज सावंत यांचा)
(या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

