रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. १४) एकाच दिवशी सात करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या १७५ झाली आहे. सिंधुदुर्गात एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या ४५ झाली आहे. रत्नागिरीत ८१, तर सिंधुदुर्गात ४७ नवे रुग्ण आज आढळले.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज ज्या सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली, त्यामध्ये चिपळूणमधील दोन, तर रत्नागिरी तालुक्यातील एका महिलेचा समावेश असून, इतर पुरुष रुग्ण आहेत. त्यांचा तपशील असा – पुरुष रुग्ण वय ५०, चिपळूण, महिला रुग्ण वय ५३, चिपळूण, पुरुष रुग्ण वय ४८, चिपळूण, स्त्री रुग्ण वय ६०, चिपळूण, पुरुष रुग्ण वय ८५, रत्नागिरी, स्त्री रुग्ण वय ७३, रत्नागिरी, पुरुष रुग्ण वय ७०, लांजा.
आज १५२ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामध्ये दापोलीच्या बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील सर्वाधिक ६१ जणांचा समावेश आहे.
आज नवे ८१ रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात आढळले. त्यापैकी खेडमधील १, गुहागरचे ५, चिपळूणचे २, रत्नागिरीतील १०, तर लांज्यातील २ असे २० रुग्ण रॅपीड अँटिजेन चाचणीतील आहेत. आरटीपीसीआर चाचणीत बाधित आढळलेल्या ६१ रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – खेड ११, गुहागर २, चिपळूण ८, रत्नागिरी २७, लांजा १, राजापूर ९.
गृह विलगीकरणामध्ये ४२० रुग्ण आहेत, तर मुंबईसह अन्य भागातून आल्यामुळे ४६५१ जण गृह विलगीकरणात आहेत.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१४ सप्टेंबर) आणखी ४७ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता २४६९ झाली आहे. आतापर्यंत १४४४ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप ५०१ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ४५ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ८३२३ व्यक्ती गृह आणि शासकीय संस्थात्मक विलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणात १२ हजार ५१३ व्यक्ती आहेत.
