‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात ६८६ पथके

रत्नागिरी : राज्याच्या आरोग्य विभागाने करोनाच्या नियंत्रणासाठी आजपासून सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जिल्ह्यात ६८६ पथके तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज (१५ सप्टेंबर) ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, ही मोहीम १५ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबर आणि १४ ते २४ ऑक्टोबर अशा दोन टप्प्यांत राबविली जाणार आहे. त्याकरिता गावस्तरावर प्रत्येकी तीन सदस्यांची पथके नेमण्यात आली आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागाचा एक कर्मचारी आणि दोन स्वयंसेवक असतील. स्थानिक लोकप्रतिनिधीच्या सल्ल्याने त्या दोघांची निवड केली जाईल. किमान दहावी उत्तीर्ण असलेली एक महिला आणि एक पुरुष यांचा पथकात समावेश असेल. प्रत्येक पथकाने दररोज ५० घरांना भेट द्यायची आहे. हे कामकाज सकाळी आठ वाजता सुरू होईल. प्रत्येक घरातील प्रत्येकाची माहिती संकलित केली जाईल. ताप, सर्दी-खोकल्याची तपासणी केली जाईल. करोनाची लक्षणे आढळली, तर त्या व्यक्तीला जवळच्या फीव्हर क्लिनिकमध्ये पाठविले जाईल. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर फीव्हर क्लिनिक सुरू राहणार आहेत.

जिल्ह्यातील ९ तालुक्यांची एकूण लोकसंख्या १६ लाख असून जिल्ह्यात ५ लाख १५ हजार ७८२ कुटुंबे आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी ६८६ पथकांमध्ये २०५८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून त्याच्या दुप्पट म्हणजे ४११६ स्वयंसेवक हे काम करतील. प्रत्येक पथकामागे एक शासकीय किंवा खासगी डॉक्टरची निवड करण्यात आली आहे. स्थानिक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, पत्रकार, एनजीओ, खासगी डॉक्टर या सर्वांच्या सहभागातून ही मोहीम राबविली जाईल. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, खासगी डॉक्टर, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आशा, अंगणवाडी सेविका आदींना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबतचे प्रशिक्षण दिले आङे. गावपातळीवर समिती बनवून पथके तयार केली आहते. त्यांना मास्क, सॅनिटायझर, टीशर्ट देण्यात आले आहेत. बॅनर्स, चित्ररथाचे नियोजन करण्यात येणार आहे. चांगले काम करणाऱ्या पथांना बक्षिसे दिली जाणार आहेत. चांगले काम करणाऱ्या गावालाही जिल्हा स्तरावर ५० हजार, ३० हजार आणि २० हजार रुपायांची बक्षिसे दिली जाणार आहेत. मोहिमेत काम करणाऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यंत्रणा सज्ज ठेवली आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सध्या जिल्ह्यात करोनाचा समूहसंसर्ग सुरू झाला असल्याचे सांगून श्री. मिश्रा म्हणाले की, या मोहिमेनंतर जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढणार आहे. संभाव्य वाढ लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आङे. आयसीयूची गरज असलेल्या रुग्णांमध्ये ३ टक्के वाढ गृहीत धरण्यात आली आहे.  इतर ठिकाणांबरोबरच रत्नागिरीतील ३ खासगी रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत  ३७८०, तर १० ऑक्टोबरपर्यंत ९०७२ रुग्ण सापडतील, असा अंदाज आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड म्हणाल्या की, करोनाची साखळी थांबविणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. अनेक संभाव्य रुग्ण आरोग्य यंत्रणेपर्यंत पोहोचत नाहीत. अनेकदा ते उशिरा येतात. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही मोहीम आहे. या मोहिमेमुळे लोकांमध्ये आजाराबाबत असलेले गैरसमज दूर होतील. त्यांना माहिती मिळेल. प्रत्येकाची टेस्ट करून घेणे, आवश्यक वाटल्यास त्यांना दाखल करून घेणे ही प्रक्रिया सुरू राहील. आरोग्य पथकाच्या घरी येणाऱ्या सदस्यांना लोकांनी सहकार्य करावे. स्वयंसेवकांना योग्य माहिती द्यावी. तसे झाले तर आपण करोनाला मात करू शकतो, अशी अपेक्षा जाखड यांनी व्यक्त केली.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply