माझी शाळा, माझे शिक्षक : लेखांक १५ (मसुरे भोगलेवाडीच्या जीवन शिक्षण विद्यालयातील मुंडले बाई)

विभा विनायक मुंडले

शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील १५वा लेख आहे गुरुनाथ ताम्हणकर यांचा… मसुरे भोगलेवाडी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जीवन शिक्षण विद्यालयामधील शिक्षिका विभा विनायक मुंडले यांच्याविषयीचा…
………
प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्या शालेय जीवनात शिक्षकरूपी परीसस्पर्श होतो. आपल्या लाडक्या शिक्षकांच्या सान्निध्यात वाढत असताना त्यांच्यातील गुण नकळतपणे आपल्यात संक्रमित होत असतात. आदर्श शिक्षक लाभणे हे त्या शाळेचे व गावाचे भाग्यच असते. मसुरे भोगलेवाडीतील जीवन शिक्षण विद्यालय ही शाळा व त्या शाळेत शिकून गेलेले माझ्यासारखे अनेक विद्यार्थी भाग्यवानच समजले पाहिजेत. त्या वेळी गटशाळा असलेल्या या शाळेत शिकत असताना मुख्याध्यापक श्री. गोविंद बागवे, श्रीमती सुमंगला जोशी, श्री. रामदास साळकर, श्रीमती शालिनी सातार्डेकर, श्रीमती परुळेकर बाई आणि श्रीमती विभा मुंडले या गुरुजनांचे मार्गदर्शन लाभले. प्रत्येकाची शिकविण्याची आदर्श शैली आणि शिस्तीचा आग्रह या संस्कारात आम्ही घडलो. त्यांच्यामुळेच प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम झाला. आजही या शाळेची आदर्श शिक्षक लाभण्याची परंपरा कायम आहे. माजी विद्यार्थ्यांनी नुकताच या शाळेचा शतकमहोत्सव साजरा केला.

कडक शिस्तीबरोबरच मातृहृदयी असणाऱ्या सर्वांच्या लाडक्या बाई म्हणजे विभा विनायक मुंडले बाई! सुंदर हस्ताक्षर, गणित विषयावर प्रभुत्व, शिस्तीचा आग्रह, तरीही प्रेमळ स्वभाव असलेल्या मुंडले बाई सर्वांनाच आवडत होत्या. विद्यार्थ्यांच्या पाठांतरासाठी त्या विशेष आग्रही असत. पाढे पाठांतर, कथा पाठांतर असो किंवा श्लोक पाठांतर असो, अध्यापनासोबतच नियमितपणे यांचा रियाज व्हायचा. या सर्व गोष्टींचे महत्त्व आज कळते. सर्वांगसुंदर व्यायामप्रकार हासुद्धा बाईंचा आवडता विषय. घुंगुरकाठी, लेझीम कवायत त्या सहजसुंदर शिकवायच्या. परसबागेतही मुलांसोबत रमायच्या.

बाईंचे हस्ताक्षरही वळणदार व टपोरे होते. त्यांच्यासारखे आपलेही हस्ताक्षर सुरेख व्हावे, असे प्रत्येकालाच वाटायचे. त्यामुळे कधी वर्गात लिहीत असताना बाईंनी पेन मागितले, तर आम्ही पटकन त्यांना द्यायचो. त्यांच्या हातात आपले पेन गेल्यावर त्या पेनाने आपलेही हस्ताक्षर सुंदर होईल, ही बालसुलभ संकल्पना!

गरीब व होतकरू विद्यार्थ्यांकडे त्या विशेष लक्ष द्यायच्या. आजही त्यांना मदत करतात. त्या वेळच्या चौथी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निमित्ताने प्रथमच मालवण शहरात जाण्याचा योग बाईंमुळेच आला. त्या वेळी आपल्या डब्यातील खाऊ बाईंनी दिला होता. तो आजही आठवतो.

तत्त्वांशी कधीही तडजोड करू नये असा बाईंचा त्या वेळचा करारी स्वभाव आजही तसाच आहे. त्यांचा स्पष्टवक्तेपणा सहज जाणवतो. ज्या वेळी मी शिक्षक म्हणून नोकरीला लागलो, त्यावेळी ‘आपल्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य द्यायचे; इतर गोष्टी आपोआपच मिळतील,’ हा त्यांचा उपदेश कायम स्मरणात आहे.

मध्यंतरी एका मोठ्या अपघातात भाऊंच्या जाण्यामुळे बाईंच्या जीवनात दु:खद प्रसंग आला. त्यातून सावरत आज बाई आपल्या सेवाकाळातील पुण्याईच्या शिदोरीवर स्वस्थ जीवन जगत आहेत. त्यांना दीर्घ व चांगले आयुरारोग्य लाभो हीच सदिच्छा!

– गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर
(प्राथमिक शिक्षक, जि. प. केंद्र शाळा मसुरे नं. १, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग.)
पत्ता : मु. पो. माळगाव बागायत, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग.
मोबाइल : ९४२०७ ३८३७५
ई-मेल : gurutamhankar@gmail.com
…..
(पुढचा लेख श्रद्धा वाळके यांचा)
(या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply