‘बालसन्मित्र’कार पा. ना. मिसाळ (सिंधुसाहित्यसरिता – ४)

पा. ना. मिसाळ (१० एप्रिल १८८८ – २७ मे १९५५)

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा चौथा लेख… ‘बालसन्मित्र’कार पा. ना. मिसाळ यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे ऋतुजा केळकर यांनी…
………
कोकणभूमीत अनेक नररत्ने जन्मास आली. त्यांनी केवळ कोकणभूमीच नाही, तर जगाला आपल्या कर्तृत्वाने आकर्षित केले. या नररत्नांपैकी बालवाङ्मयात आपला अमीट ठसा ज्यांनी उमटविला, ते म्हणजे ‘बालसन्मित्र’कार पारूजी नारायण मिसाळ होय. यांच्या बालवाङ्मयातील कर्तबगारीच्या नोंदीशिवाय बालवाङ्मयाचा अद्भुत इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही.

या कोकणभूमीत १० एप्रिल १८८८ रोजी कुंभारमाठ (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) या भागातील लिंगायत जैन-गवळी कुटुंबात पारूजी यांचा जन्म झाला. अत्यंत गरिबीची परिस्थिती असल्याने शाळेत पाठविण्याविषयी अनास्थाच होती; मात्र आई-वडिलांजवळ हट्ट करून पारूजींनी आपले नाव शाळेत घालावयास लावले. शाळेत अभ्यासाबरोबरच वाचनाचा छंद जडला. वर्गातील पहिला नंबर पारूजींनी सोडला नाही. वाचता वाचता शब्दांची माळ गुंफली. कथा, कवने लिहू लागले. १९०५मध्ये व्हर्नाक्युलर फायनलची परीक्षा दिली आणि १९०६मध्ये देऊळवाडा शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले.

‘दिसामाजी काही तरी ते लिहावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावे।।’ ही उक्ती त्यांच्यासाठी सार्थ होती. त्यांनी ‘माझे तान्हुले’ ही कविता लिहिली. पुण्याच्या लोकप्रिय ‘आनंद’ मासिकाच्या पहिल्या पानावर ती १९०७मध्ये प्रसिद्ध झाली. त्याचा आनंद अवर्णनीय होता. या आनंदात त्यांनी कविता, गोष्टी लिहावयास सुरुवात केली. हळूहळू त्यांची लेखणी काव्यरत्नावली, आनंद, खेळगडी इत्यादी नियतकालिकांमधून संचार करू लागली. या छंदातून त्यांनी १९११ साली बादशहा पंचम जॉर्ज यांचे एक छोटे चरित्र लिहून प्रसिद्ध केले.

एक जून १९१३ रोजी बालसन्मित्र पाक्षिकाचा जन्म झाला. त्यांनी ‘बालसन्मित्रमाला’ सुरू केली व मुलांच्या दृष्टीने उपयुक्त अशी पाचशे पुस्तके लिहावयाचा संकल्पही मनात केला. मुलांच्या भावी चारित्र्याची आणि कल्याणाची खरीखुरी त्यांना तळमळ होती. त्यांनी प्रथम ‘अभ्यास’ हे पुस्तक मालेमार्फत प्रसिद्ध केले. हे छोटेखानी पुस्तक दर्जाने खूप मोठे होते. अत्यंत गरीब परिस्थितीतून पुढे लोकोत्तर पदाला पोहोचलेल्या थोर व्यक्तींची निवडक ११ चरित्रे त्यात समाविष्ट आहेत. ते पुस्तक आजही नव्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे.

मिसाळ यांनी आपल्या ‘बालसन्मित्रमाले’तून अशी अनेक प्रकारची नाटके, कथा, कविता, संवाद इत्यादी प्रकारची लहान लहान पुस्तके प्रसिद्ध केली. मालवणचे प्रख्यात ज्योतिषी कै. वसंत लाडोबा म्हापणकर यांचे चरित्र मिसाळांनी लिहून प्रसिद्ध केले होते.

पारूजी मालवण देऊळवाडा शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम सुरू केले. आपल्या ज्ञातिबांधवांच्या व इतर विद्यार्थ्यांसाठी कुंभारमाठला १९०९ साली त्यांनी शाळा सुरू केली होती. त्यात ते शिकवीतही असत; पण त्यांचे बरेच कार्य देऊळवाडा शाळेतच झाले.

‘बालसन्मित्र’ सुरू ठेवणे नंतर जिकिरीचे झाले. सतत वाचन, लेखन यामुळे पारूजींची दृष्टी बिघडली. ट्रेनिंग कॉलेजचे शिक्षणही अपूर्ण राहिले. त्यामुळे नोकरी गमवावी लागली. नोकरी नसल्यामुळे जीवनात आर्थिक चणचण भासू लागली, संसार चालविताना दमछाक होऊ लागली. मिसाळ या सर्वांवर मात करून आपले वाङ्मयनिर्मितीचे कार्य चालविण्यास उभे होते. त्यासाठी त्यांनी काय काय सोसले असेल, ते शब्दात मांडता येणार नाही. मुलांसाठी नवनवीन मासिके निघू लागली. मिसाळमास्तर आजारी पडले. प्रेसची बिलं थकू लागली. कोण्या भल्या गृहस्थाने सरकारदरबारी खटपट केली. सरकारकडून १९५५च्या मेमध्ये आर्थिक मदतीचे प्रकरण मंजूर होऊन त्यांना मानधन द्यावे असे सरकारने ठरविले; मात्र मानधन घेण्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांचे भोग, कष्ट तेथेच राहिले नि शेवटी विपत्तीतच ते गेले. २७ मे १९५५ रोजी मालवण येथे हृदयविकाराने वयाच्या ६७व्या वर्षी या थोर ‘बालसन्मित्र’काराने जगाचा निरोप घेतला.

‘बालसन्मित्र’च्या शाळेतून पुढे आलेले साहित्यिक कमी नाहीत. मराठी सारस्वताला ही नवी पिढी मिसाळ यांनी ‘पाक्षिक बालसन्मित्रा’तून मोठ्या हिकमतीने आणि प्रयत्नपूर्वक प्रदान केली. त्यांनी तयार केलेले लेखक, कवी, चित्रकार वगैरे कलावंत ‘बालसन्मित्र’चे नाव मोठ्या आदराने घेत असत. ‘आम्हाला बालसन्मित्रनेच लिहावयास आणि वाचावयास शिकविले,’ असे अभिमानाने सांगण्यास विसरत नाहीत, हीच खरी मिसाळ यांच्या कर्तबगारीची प्रतिभा होय.

मालवणला मधू वालावलकर अणि त्यांचे सहकारी यांनी तेथील बॅ. नाथ पै सेवांगणच्या इमारतीमध्ये मिसाळ मास्तरांच्या नावाने ‘बालसन्मित्र’ नावाचे एक दालन बालकांसाठी बांधून घेतले. मालवणमध्ये ही त्यांची पार्थिव स्मृती. बॅ. नाथ पै सेवांगणच्या साने गुरुजी वाचन मंदिरामध्ये त्यांचे चरित्र वाचावयास मिळेल आणि या थोर बालसन्मित्राची अजून ओळख करून घेऊन नवसाहित्यकारांना त्यांचे कार्य पुढे न्यायची ऊर्जा मिळेल. पारूजी नारायण मिसाळ यांनी आपले सर्वस्व समर्पण करून जो बालवाङ्मयाचा पर्वकाळ निर्माण केला आहे, तो नव्या पिढीने पाहिला पाहिजे असे वाटते. त्यासाठीच हा छोटा प्रयत्न.
सौ. ऋतुजा राजेंद्र केळकर
(ग्रंथपाल, बॅ. नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर, मालवण)
पत्ता : २३२३ क, राजशिल्प, धुरीवाडा, मालवण, जि. सिंधुदुर्ग
मोबाइल : ९४२०४२३७९०
…..
सिंधुसाहित्यसरिता या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.या उपक्रमाची संकल्पना ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांची आहे. अधिक माहितीसाठी, सूचनांसाठी, तसेच अभिप्रायासाठी त्यांच्याशी ९४२१२६३६६५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)
……
(‘कोमसाप’च्या मालवण शाखेतर्फे राबविल्या गेलेल्या ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

  1. नेमकी शब्दयोजना व समर्पक मांडणी: केळकर मँडम

Leave a Reply