रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१ ऑक्टोबर) करोनाच्या ४१ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत करोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६३६६ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ८४.८९ टक्के झाला आहे. करोनामुक्तांच्या दरातील वाढीचा चढता आलेख आजही कायम राहिला. सिंधुदुर्गात आतापर्यंत २७४८ जणांनी करोनावर मात केली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (एक ऑक्टोबर) करोनाचे नवे ९१ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ७४९९ झाली आहे.
आज करोनाच्या चार रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. चौघेही शासकीय रुग्णालयात मरण पावले. दोन पुरुष आणि दोन महिलांचा त्यात समावेश असून दोघांचा मृत्यू काल, तर दोघांचा आज झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या २६७ झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.५६ टक्के राहिला आहे. आज नोंद झालेल्या चार मृतांचा तपशील असा – संगमेश्वर वय ५७ महिला, राजापूर वय ५६, पुरुष, गुहागर वय ६०, महिला, दापोली वय ७३, पुरुष.
तालुकानिहाय मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ७३, खेड ४५, गुहागर १०, दापोली २९, चिपळूण ६५, संगमेश्वर २४, लांजा ९, राजापूर १०, मंडणगड २ (एकूण २६७).
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१ ऑक्टोबर) आणखी ५२ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ३८६४ झाली आहे. आतापर्यंत २७४८ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १०१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप १५५ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ९५ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ३६१६ व्यक्ती गृह आणि शासकीय संस्थात्मक विलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणात १३ हजार ५७ व्यक्ती आहेत.


