रत्नागिरीत ५५, तर सिंधुदुर्गात २७ नवे करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (पाच ऑक्टोबर) करोनाचे नवे ५५ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ७७२४ झाली आहे. सिंधुदुर्गात आज नवे २७ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ४०६० झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – गुहागर १, रत्नागिरी १६, लांजा ६, कामथे ४, देवरुख ८ (एकूण ३५). रॅपिड अँटिजेन टेस्ट – दापोली २, कामथे ६, रत्नागिरी १२ (एकूण २०) (दोन्ही मिळून ५५)

आज ४० रुग्णांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत ६६४० जणांनी करोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ८५.९६ टक्के झाला आहे. सध्या ६८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत ४० हजार ३२४ जणांच्या चाचण्या झाल्या आहेत.

आज करोनाच्या चार रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या २७७ झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.५८ टक्के राहिला आहे.

आज जिल्ह्यात नोंदवल्या गेलेल्या चार मृत्यूंपैकी एक मृत्यू खासगी रुग्णालयात, तर तीन मृत्यू सरकारी रुग्णालयात झाले आहेत. राजापूरमधील ६५ वर्षांच्या, रत्नागिरीतील ५४ वर्षांच्या आणि लांज्यातील ७९ वर्षांच्या पुरुषाचा मृत्यू आज नोंदवला गेला. तसेच, दापोलीतील ७५ वर्षांच्या एका महिलेचाही आजच्या मृतांमध्ये समावेश आहे.

तालुकानिहाय मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ७६, खेड ४५, गुहागर १०, दापोली ३१, चिपळूण ६७, संगमेश्वर २४, लांजा १०, राजापूर १२, मंडणगड २ (एकूण २७७).

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (५ ऑक्टोबर) आणखी २७ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४०६० झाली आहे. आतापर्यंत ३१३२ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप ६५ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १०३ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ३६२६ व्यक्ती गृह आणि शासकीय संस्थात्मक विलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणात ४६११ व्यक्ती आहेत.

पिंगुळी (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील दायती लोककला संवर्धन अकादमीचे श्री. मसगे यांनी करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करण्याच्या अनुषंगाने चित्रकथीच्या माध्यमातून संदेश देण्यासाठी तयार केलेले चित्र. (पाहा बातमीच्या सुरुवातीचा फोटो.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply