काव्याने तेजाळलेली उल्का! विजय चिंदरकर (सिंधुसाहित्यसरिता – ११)

विजय चिंदरकर (२३ जुलै १९३३ – ११ जुलै १९५९)

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा ११वा लेख… कवी विजय चिंदरकर यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे तेजल ताम्हणकर यांनी…
………
मे १९५८ची मालवणची ती साहित्यिक संध्याकाळ. ४०व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या भव्य व्यासपीठावर मावळतीच्या सूर्यनारायणाचे किरण पडले. त्यामुळे त्या व्यासपीठाने इंद्रधनुष्याचे रंग ल्याले होते असे म्हणतात. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी अनिल अर्थात आत्माराम रावजी देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होते. आणि त्यांच्या बाजूला महाराष्ट्राचा बुलंद आवाज आचार्य प्रल्हाद केशव अत्रे स्थानापन्न झाले होते. बाजूलाच कवी माधव जूलियन, साहित्यिक पु. ल. देशपांडे, मधू मंगेश कर्णिक, आ. ना. पेडणेकर आदी मराठी पंडित स्थानापन्न झाले होते. व्यासपीठासमोर रसिक मालवणवासीयांसमवेत विद्याधर भागवत, श्रीपाद काळे, आरती प्रभू, स. श्री. उपाध्ये, अरविंद म्हापणकर, ह. मो. मराठे, सदा वराडकर, लुई फर्नांडिस आदी उदयोन्मुख साहित्यिक उपस्थित होते. पुस्तकांची एकामागोमाग एक प्रकाशने होत होती. त्या वेळी आरती प्रभू आणि स. श्री. उपाध्ये यांनी उदयोन्मुख कवींचा ‘पल्लवी’ नावाचा कवितासंग्रह अध्यक्ष कवी अनिल यांच्या हस्ते प्रकाशित केला. त्यानंतर कविसंमेलनाला सुरुवात झाली. कोकणच्या मातीतील एकेक तरुण आपली कविता सादर करत होते. एवढ्यात २२ वर्षांचा एक तरुण आपली कविता सादर करण्यासाठी आला. ती कविता होती ‘आईने अन् चिडून जावे…’ या कवितेचे वाचन झाल्यावर व्यासपीठावरील व व्यासपीठासमोरील सारा नूरच पालटून गेला. आचार्य अत्रे तर आपल्या नेहमीच्या स्वरात म्हणाले, ‘अशी मालवणची सोलकढीची भैरवी गेल्या दहा वर्षांत झाली नाही…’ टाळ्यांचा कडकडाट झाला. कारण दुपारच्या जेवणात या सर्वांनी सोलकढीचा आस्वाद घेतला होता; पण आता या तरुण कवीच्या मुखातून तो रसास्वाद घेत असताना या सोलकढीला आगळीच साहित्यिक उंची प्राप्त झाली होती. दुसऱ्या दिवशी त्या सोलकढीच्या भैरवीची जागा आचार्य अत्र्यांच्या ‘मराठा’च्या अग्रलेखाने घेतली आणि मालवणी सोलकढी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली.

सोलकढीची हवी भैरवी
तृप्तीच्या तानेवरती

आपल्या या सोलकढीच्या भैरवीच्या रूपकाने कविसंमेलनाचे रूप पालटणारे ते कवी होते विजय चिंदरकर आणि त्यांची कविता होती ‘आईने अन् चिडून जावे…’ (या कवितेचा व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

कवी विजय चिंदरकर यांचा जन्म २३ जुलै १९३३ रोजी झाला. त्यांचे मूळ गाव काळसे. परंतु वडील शिक्षक असल्याने त्यांचे सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालवणच्या टोपीवाला हायस्कूलमध्ये झाले आणि उर्वरित शिक्षण मुंबई येथे झाले. मालवणच्या पोस्टात काम करणारा मालवणी मातीतील उणेपुरे २५ वर्षांचे आयुष्य लाभलेला हा कवी.

कविता म्हणजे शब्दातील संगीत आणि सुरातील काव्य. कविता असते उत्स्फूर्त झऱ्याप्रमाणे झुळझुळणारी. त्यात प्रत्येक कवीचे जीवनविषयक तत्त्वज्ञान, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यक्त होतो. कवी विजय चिंदरकरांच्या कविता या कलात्मक उंची गाठणाऱ्या असल्याचे जाणवते. ‘काव्यशक्ती ही विजेसारखी असते. तिला स्पर्श करू पाहणाऱ्यांपैकी ९९ जण त्यात होरपळतात,’ ही कविगुरू केशवसुतांची कवितेकडे पाहण्याची दृष्टी विजय चिंदरकरांसारख्या कवीला लौकिकार्थाने स्पर्शून गेली असे वाटते.

कवी चिंदरकर यांनी अनेक दर्जेदार कविता लिहिल्या. त्या काळी दर्जेदार नवसाहित्याला वाहिलेल्या ‘सत्यकथा’ या मासिकात त्या प्रसिद्ध झाल्या. कवितेचा सूर सापडण्याच्या आधीच मालवणचा हा दुर्लक्षित प्रतिभावंत कवी हे जग सोडून गेला. काव्यक्षितिजावर उगवत असतानाच ११ जुलै १९५९ रोजी विजेच्या तारेच्या धक्क्याने २५व्या वर्षी हा कवी हे जग सोडून गेला. जुलै १९६०मध्ये त्याच्या उपलब्ध असलेल्या ३० कवितांचा छोटेखानी कवितासंग्रह विजयचे मार्गदर्शक व ज्येष्ठ साहित्यिक आ. ना. पेडणेकर यांनी त्याच्या निधनानंतर प्रसिद्ध केला. यामध्ये गुरुवर्य ज्ञानेश देऊलकर, मधू वालावलकर, पांडुरंग काकतकर, विद्याधर भागवत आदी साहित्यिक व पत्रकार मित्रांचा समावेश होता. ‘सूर्य फुटेना क्षितिजाला’ या शीर्षकाखाली त्यांचा एक रुपया मूल्य असलेला एकमेव कवितासंग्रह कै. विजय चिंदरकर स्मारक समितीतर्फे प्रसिद्ध करण्यात आला.

चार दिसांच्या नश्वरतेला
रानफुलांनी खिजवून जावे
मातीलाही असतो आत्मा
तृणपर्णाने मनी म्हणावे

कवी विजय चिंदरकर हे जीवनविषयक तत्त्वज्ञान मांडताना रानफुले, माती, ढग, सूर्य, चंद्र इत्यादी निसर्गप्रतिमांचा वापर करताना दिसतात.

‘कधी तरी संपे अशी सारी ओढ जगण्याची’ अशा प्रकारच्या कविता वाचताना कवीच्या मनातील आशा-निराशेचा सतत चालणारा खेळ दिसून येतो. हृदयी प्रचंड दु:ख घेऊन कवी आपले जीवन जगत असावा असे वाटते. कवितांना दु:खाची झालर असलेली दिसून येते.

पुनवेच्या चंद्रालाही
आठवण ग्रहणाची
कळाकळा झिजुनिया
रात्र उरे अंधारात

वरवर रोमँटिक वाटणाऱ्या या कविता वेदनेने ग्रासलेल्या दिसतात. प्रीतीबरोबर भक्ती आणि विरहसुद्धा दिसून येतो. निसर्ग प्रतिमांसोबतच स्त्री प्रतिमाही कवीने रेखाटल्या आहेत. कवितेत भेटणारी स्त्री ही दुरावलेली वाटते. विरहाच्या आठवणीत झुरणारी दिसते.

पानावरती भात हवा पण
हवाच उकडा कठीण तांबडा
सोबतीला अन् हवा भाजुनि
दरवळलेला सुका बांगडा

कोकणला लाभलेला समृद्ध समुद्रकिनारा आणि येथील खाद्यसंस्कृतीवरही कवी चिंदरकर यांनी प्रकाश टाकला आहे. कोकणी माणसांच्या जेवणातील अविभाज्य घटक म्हणजे मासे आणि भात याचे महत्त्वही ‘आईनेही अन् चिडून जावे’ या कवितेत अधोरेखित केले आहे.

खूप दिसांनी भूक शमावी
त्या प्रेमाच्या शब्दावरती
आईने अन् चिडून जावे
माझ्या थोड्या खाण्यासाठी

कवी पोस्टात नोकरीला असल्यामुळे सतत बाहेरगावी जाणे होत होते. खूप दिवसांनी घरी आलेला आपला मुलगा पोटभर जेवला नाही, म्हणून रागावणारी प्रेमळ आई अन् तिची होणारी तगमग त्यांनी आपल्या कवितेमध्ये रेखाटली आहे.
विजय चिंदरकर यांच्या कविता अल्पाक्षरी, आशयघन अशा स्वरूपाच्या आहेत. निसर्गातही भावभावना असून त्यांची रूपे ऋतुचक्राप्रमाणे बदलत जातात, याचे सुंदर चित्रण कवितांमध्ये केलेले आहे. सर्व कविता मुक्तछंदामध्ये लिहिल्या आहेत. कवितांमध्ये न्यूनगंड आहे. सुखाला दु:खाची, आशेला निराशेची किनार आहे. कौटुंबिक जिव्हाळ्याबरोबर तारुण्यातील वसंतकाळही आहे.

कवी विजय चिंदरकर यांच्या शब्दात सांगायचे तर ‘भंगल्या वाड्यापुढे तुळस तरी राहू दे…’ कवी विजय चिंदरकर यांच्या अपघाती निधनानंतर प्रकाशित झालेला ‘सूर्य फुटेना क्षितिजाला’ हा कवितासंग्रह वाचल्यावर ही वैशिष्ट्ये लक्षात येतात. अवघ्या २५ वर्षांचे आयुष्य लाभलेले हे कवी दुर्लक्षित असले तरीही फार आश्वासक वाटतात.

 • सौ. तेजल गुरुनाथ ताम्हणकर (तेजल नारायण मयेकर)
  पत्ता : मु. पो. माळगाव बागायत, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग – ४१६६०६
  मोबाइल : ९४२१६ ४६५१६
  ई-मेल : yashatej@gmail.com
  ………
  सिंधुसाहित्यसरिता या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.या उपक्रमाची संकल्पना ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांची आहे. अधिक माहितीसाठी, सूचनांसाठी, तसेच अभिप्रायासाठी त्यांच्याशी ९४२१२६३६६५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)
  ……
  (‘कोमसाप’च्या मालवण शाखेतर्फे राबविल्या गेलेल्या ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply