रत्नागिरीत प्लाझ्मा उपचार केंद्र सुरू; जिल्हा रुग्णालयात असे केंद्र झालेला पहिला जिल्हा

रत्नागिरी : करोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचे अस्त्र असलेल्या प्लाझ्मा थेरपीचे केंद्र आता रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरू झाले आहे. प्लाझ्मा थेरपीसाठीच्या अफेरेसिस युनिटचा ऑनलाइन उद्घाटन सोहळा १८ ऑक्टोबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. जिल्हा रुग्णालयात अशी व्यवस्था उपलब्ध झालेला रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.

या कार्यक्रमाला मुंबईतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री ॲड. अनिल परब, जालन्यातून सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, रत्नागिरीतून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबतच खासदार विनायक राऊत दिल्ली येथून सहभागी झाले. तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम यांचीही उपस्थिती होती. (हे केंद्र कसे आहे, याचे दर्शन घडवणारी चित्रफीत बातमीच्या शेवटी दिली आहे.)

या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘करोनाविरुद्धचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्क हीच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करून द्या. करोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही, यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी ‘मा कसम’ सर्वांनी घ्यावी.’

‘लाटांचा सामना कसा करायचा ते कोकणाला शिकवण्याची गरज नाही; पण करोनाबाबत दुसरी लाट न येऊ देणे ही प्राथमिकता आहे. करोनामुक्त झालेली एक व्यक्ती एका महिन्यात दोन वेळा प्लाझ्मा दान करून चार जणांचा जीव वाचवू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात मृत्युदरदेखील कमी होईल,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत रत्नागिरीत झालेले काम कौतुकास्पद आहे,’ असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘याच पद्धतीने आगामी काळात जाणीव- जागृती करून करोनाचा घसरता आकडा आणखी कमी करा. युरोपप्रमाणे पुन्हा लॉकडाउन करायचे की मास्क, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता करायची, याबाबत प्रत्येकाची जागृती करा.’
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या उपचार केंद्राबाबत माहिती दिली. उद्घाटनानंतर याबाबतची चित्रफीत दाखविण्यात आली.

युनिटचा इतर आजारांमध्येही उपयोग
‘प्लाझ्मा अफेरेसिस युनिटचा उपयोग मलेरिया, डेंग्यू, तसेच इतरही अनेक आजारांत होणार आहे. यासाठी लागणारी यंत्रे एक ते दोन लाख रुपयांत येतील. ती खरेदी करून यातून कायमस्वरूपी उपचार व्यवस्था उपलब्ध करून द्यावी,’ असे आरोग्यमंत्री टोपे या वेळी म्हणाले. रत्नागिरीत घराघरापर्यंत पोहोचून आरोग्ययंत्रणा व जिल्हा प्रशासनाने उत्तम कामगिरी केली, याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदनही या वेळी केले.

‘जिल्ह्याला आरटीपीसीआर प्रयोगशाळेची आवश्यकता आहे असे सांगितल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी तत्काळ मान्यता दिली. त्यांच्याच संकल्पनेतून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरू झाली. यामुळे रत्नागिरीत करोनाची वाढ रोखण्यात यश आले याबद्दल मी त्यांचे आभार मानतो,’ असे परिवहन तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब म्हणाले. त्यांनी जिल्हा प्रशासनाचेही याबद्दल अभिनंदन केले.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी या मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये करोना नियंत्रणात आणता आला. रत्नागिरीत गेल्या २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. हेदेखील त्यामुळेच शक्य झाले,’ असे खासदार विनायक राऊत म्हणाले.

‘रोज ३५ ते ४० रुग्ण पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रत्नागिरी तालुक्यासह माझ्या मतदारसंघात आता आकडा शून्यावर आला. यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम व जिल्हा प्रशासन यांचे यश आहे,’ असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले. या प्लाझ्मा उपचार सुविधेतून मृत्युदरदेखील लवकरच एक टक्क्याच्या खाली नेऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर आदींची उपस्थिती होती. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमाची तयारी करीत असतानाच करोना पॉझिटिव्ह झालेल्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले रुग्णालयातून कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री म्हणाले, ‘फुले-शाहूंनी घडविलेल्या या महाराष्ट्रात आजच्या करोनाविरुद्धच्या लढ्यातही फुलेंचा सहभाग आहे.’

‘रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यासाठी सर्व अटींची पूर्तता करा. रायगड आणि सिंधुदुर्गात दिले आहे, तसेच ते तुम्हालाही देऊ,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply