नागरिकांनी घराबाहेर पडताना स्वयंशिस्त पाळावी : दापोली दौऱ्यात आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

दापोली : ‘करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन नागरिकांनी करणे आवश्यक आहे. लॉकडाउनच्या काळात गेले अनेक दिवस नागरिक घरामध्ये होते. परंतु घराबाहेर पडताना स्वयंशिस्त पाळावी,’ असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री राजेश टोपे यांनी केले. आज (२० नोव्हेंबर) दापोली उपजिल्हा रुग्णालयास त्यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी आमदार योगेश कदम, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, माजी आमदार संजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी टोपे म्हणाले, ‘दररोज जनतेशी अधिक प्रमाणात संपर्क असणाऱ्या ठिकाणी काम करणाऱ्या नागरिकांनी आवर्जून करोना टेस्ट करून घ्यावी. मास्कचा वापर करून सोशल डिस्टन्सिंग पाळावे, जेणेकरून करोनापासून स्वत:चा बचाव होईल व इतरांनाही धोका पोहोचणार नाही.’

टोपे म्हणाले, ‘राज्यातील रुग्णालयांचा दर्जावाढ करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत दापोली उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूती तसेच इतर सुविधा मोफत करण्यात येतील. सद्यस्थितीत जिल्ह्यातील नादुरुस्त रुग्णवाहिका निर्लेखित करण्यात आल्या असून, जिल्ह्यात नवीन रुग्णवाहिका लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील.’

‘शासकीय आरोग्य रुग्णालयातील रिक्त जागांचा प्रश्न सोडविण्यासाठी चक्राकार पद्धतीने कर्मचारी व डॉक्टर यांची नियुक्ती करताना कोकणाला प्राधान्य द्यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे,’ अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी या वेळी दिली.

‘जिल्ह्यात पाच तालुक्यांच्या केंद्रस्थानी खेड तालुक्यातील कळंबणी येथे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ब्लड बँक सुरू करण्यात येईल. तसेच दापोलीला समुद्रकिनारी होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मोबाइल ॲम्बुलन्स आवश्यक असल्याने ती उपलब्ध करून देण्यात येईल,’ असे आश्वासनही टोपे यांनी दिले.

या वेळी संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply