रत्नागिरीत ३१ डिसेंबरला दारू नको, दूध प्या! अभियान

रत्नागिरी : स्वयंसिद्धा समूह आणि मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे उद्या, वर्षअखेरीला ३१ डिसेंबर रोजी दारू नको, दूध प्या अभियान राबवण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने माहेर या रत्नागिरीजवळच्या अनाथाश्रमातील चाळीस विद्यार्थ्यांना रत्नागिरी परिसराची सफर घडवून आणण्यात येणार आहे. स्वयंसिद्धा आणि मातृभूमी प्रतिष्ठानचे या उपक्रमाचे आयोजन केले आहे.


या उपक्रमात ३१ डिसेंबरच्या पार्टीचे पैसे वाचवून माहेरमधील ३५ विद्यार्थ्यांना सकाळी जयविनायक मंदिर, जयगड किल्ला, गणपती पुळे मंदिर, आरे वारे, मस्यालय, भगवती किल्ला, भाट्ये बीचची सफर घडविण्यात येणार आहे. त्यांचे दुपारचे भोजन जयगड येथे होईल. संध्याकाळी बॉम्बे सेलिब्रेशन पॉइंट, रिलायन्स मॉलच्या वतीने दूध आणि हेल्दी स्नॅक्स पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. तेथेच नृत्याविष्कारही घडविला जाणार आहे. स्वयंसिद्धा समूहात रत्नागिरीतील प्रत्येक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला आहेत. त्यांच्यातर्फे हा कार्यक्रम होईल.


या उपक्रमासाठी आंबव (देवरूख) येथील राजेंद्र माने इंजिनिअरिंग कॉलेज चालवत असलेल्या प्रबोधन शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष नेहा माने यांनी बसेसची व्यवस्था केली आहे. कुवारबाव येथील श्री. झापडेकर यांनी दुधासाठी सहकार्य केले आहे. जयगड दर्शनसाठी अनिल दाधिच आणि रेणुका दाधिच यांनी मनोरंजनाची व्यवस्था सामाजिक भावनेतून केली आहे.

मुंबई-पुण्यात गेली काही वर्षे दारू नको, दूध प्या हा उपक्रम राबविला जात आहे. तरुणांना चांगल्या कामासाठी, समाजसेवेसाठी उद्युक्त करण्याकरिता हे उपक्रम राबविले जातात. तरुणांना दारूच्या व्यसनापासून परावृत्त करणे हा त्यातील मुख्य उद्देश आहे. त्यानिमित्ताने राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये तरुणांचा वाढता सहभाग मोठ्या शहरांमध्ये मिळतो. रत्नागिरी जिल्ह्यात तशा स्वरूपाचा उपक्रम प्रथमच राबविला जात आहे.


गुरुवारी, ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या या दूध पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी, मुलांना खाऊची पाकिटे देण्यासाठी किंवा अन्य मदत करण्यासाठी 02352355366 या दूरध्वनीवर किंवा 9422050977 या मोबाइलवर संपर्क साधावा, असे आवाहन स्वयंसिद्धाच्या पूर्वा किणे आणि प्राजक्ता किणे तसेच मातृभूमी प्रतिष्ठानचे प्रवीण किणे यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply