कुडाळ बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे ऑनलाइन उद्घाटन

कुडाळ : प्रत्येक गाव, वाड्या, वस्त्या यांना शहराशी जोडणाऱ्या, सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचे मुख्य साधन असलेल्या, प्रामाणिक सेवा देणाऱ्या परिवहन महामंडळाच्या एसटी बस सेवेला अधिक सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी आज केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे १ कोटी ७० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नव्या बसस्थानकाचे ऑनलाइन पद्धतीने त्यांनी उद्घाटन केले. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी एसटीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन महामंडळाच्या मुंबई प्रदेश कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर, सिंधुदुर्गच्या निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे ऑनलाइन जोडले गेले होते. प्रत्यक्ष उद्घाटन कार्यक्रमात आमदार वैभव नाईक, कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली. गटविकास अधिकारी मोहन भोई, जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह सावंत, सिंधुदुर्ग एसटी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ, कुडाळचे आगार व्यवस्थापक सुजित डोंगरे आदी उपस्थित होते.

कुडाळ बसस्थानक १९७१ पासून कार्यरत आहे. जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानकांपैकी एक असे हे बसस्थानक असून बरीच वर्षे या स्थानकामध्ये प्रवाशांसाठी अद्ययावत इमारत असावी, अशी मागणी होती. आज ती पूर्ण करण्यात यश आले आहे, असे सांगून श्री. परब म्हणाले की, कुडाळच्या बसस्थानकातील उर्वरित कामेही लवकरच पूर्ण करण्यात येतील. करोनाच्या महामारीमुळे कुडाळ स्थानकाचे उद्घाटन झाले नव्हते. ते आज झाले. त्यामुळे प्रवाशांची अधिक चांगली सोय झाली, यांचा मला आनंद आहे.

आमदार वैभव नाईक यावेळी म्हणाले, कुडाळ शहरात अद्ययावत बसस्थानक असणे ही अत्यंत गरज होती. सुमारे एक कोटी ४० लाख रुपये खर्च करून हे बसस्थानक उभारण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांची अत्यंत चांगली सोय झाली आहे. कुडाळच्या सौंदर्यातही भर पडली आहे. स्थानकासमोरील रस्ता करण्यासाठी २० लाखांची तरतूद करण्यात आली असून ते कामही लवकरच पूर्ण होईल. कुडाळमधील विविध विकासकामांसाठी भरीव निधीची तरतूदही करण्यात येईल, असे ते म्हणाले.

प्रकाश रसाळ, नगराध्यक्ष ओंकार तेली, अमित सावंत यांची समयोचित भाषणे झाली. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी कुडाळ शहरातील नगरसेवक, पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच, एसटी महामंडळातील अधिकारी-कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply