मालवणी अंतरंगाचा साहित्यिक : आ. ना. पेडणेकर

आ. ना. पेडणेकर (२० फेब्रुवारी १९२८ – ११ ऑगस्ट २००४)

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता या लेखमालेतून २१ साहित्यिकांची ओळख करून देण्यात आली. त्या लेखमालेचे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले. त्यापैकी आ. ना. पेडणेकर यांचा आज (२० फेब्रुवारी) जन्मदिन. त्यांच्याविषयी शिवराज सावंत यांनी लिहिलेला हा लेख
………
आबाजी नारायण पेडणेकर यांचा जन्म २० फेब्रुवारी १९२८ रोजी कोळंब या मालवण शहरानजीकच्या गावात झाला. जिल्हा परिषदेच्या कोळंब येथील शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. १९३९मध्ये याच प्राथमिक शाळेतून मिडलस्कूल स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आ. ना. पेडणेकर यांना तत्कालीन अखंड रत्नागिरी जिल्ह्यातून पहिले येण्याचा बहुमान मिळाला. त्यांना मिळालेल्या या शिष्यवृत्तीमुळे त्यांच्या पुढील शिक्षणाला हातभार लागला.

१९४०मध्ये इयत्ता पाचवीमध्ये त्यांनी मालवणच्या टोपीवाला हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. पाचवीत असताना त्यांची ‘काजळ’ ही पहिली कविता पारुजी नारायण मिसाळ यांच्या ‘बालसन्मित्र’मध्ये प्रसिद्ध झाली. त्यांनी या पाक्षिकासाठी बडबडगीते, बालगीते, बालकथा, नाट्यछटा व विविध लेख लिहिले होते. अशा प्रकारे त्यांच्या लेखनाला व्यासपीठ मिळवून देण्याचे काम ‘बालसन्मित्र’कार पा. ना. मिसाळ यांनी केले. (पा. ना. मिसाळ यांच्याविषयी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आ. ना. पेडणेकर यांनी कॉलेज पूर्ण झाल्यावर शिक्षकी पेशात जायचे ठरवून बेळगाव येथून शैक्षणिक पदविका प्राप्त केली. मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमधून इंटर, रुईया महाविद्यालयातून १९५०मध्ये बीए व १९५२मध्ये इंग्रजी विषयात एमए पदवी प्राप्त केली. शिक्षक म्हणून त्यांची सेवा आमच्या मसुरे गावातील पूर्वीचे भरतगड हायस्कूल म्हणजे आत्ताच्या बागवे हायस्कूलमध्ये १९५३मध्ये सुरू झाली. दोन वर्षांनी १९५५मध्ये ते मालवण शहरातील भंडारी हायस्कूलमध्ये सेवेत रुजू झाले. १९६२पर्यंत त्यांनी तिथे ज्ञानदानाचे कार्य केले. १९६३ मध्ये न्यू इंग्लिश स्कूल देवबाग हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. १९६४ ते १९८८पर्यंत ते अलिबागच्या जे. एस. एम. कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. आपल्या अध्यापकीय कार्याचा त्यांनी ठसा उमटवला. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमधून शिकून इंग्रजी विषयावर प्रभुत्व असलेला शिक्षक म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या आ. ना. पेडणेकर यांच्याविषयी मला गर्व वाटतो.

प्रा. आ. ना. पेडणेकर यांनी कविता, कथा, कादंबरी, समीक्षा, बाल साहित्य अशा विविध ललित वाङ्मयप्रकारांमध्ये लेखन केले आहे. त्यांना इंग्रजी वाङ्मय वाचनाचा व्यासंग होता. या व्यासंगामुळे त्यांनी इंग्रजी साहित्यातील कथा-कादंबऱ्या निवडून त्यांचे अनुवाद प्रसिद्ध केले. त्यांचे अनुवाद कौशल्य वाखाणण्याजोगे होते. टॉलस्टॉयच्या वॉर अँड पीस या कादंबरीचा त्यांनी ‘युद्ध आणि शांती’ नावाने मराठीत अनुवाद केला. या स्वैर अनुवाद असलेल्या ग्रंथाला पश्चिम विभागाचे पारितोषिक लाभले होते.

१९६६मध्ये पेडणेकरांनी ‘गीतांची शाळा’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. शालेय परिसरातील विषय घेऊन कुमार वाचकांना लिहिते करण्यासाठी, काव्यनिर्मितीविषयक मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी हा काव्यसंग्रह लिहिला.

१९७६ मध्ये ‘आनां’ची ‘ऐलपैल’ ही पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. या कादंबरीत मालवणच्या सागरी जीवनाची पार्श्वभूमी घेऊन शिरी आणि बायो या नवविवाहित दाम्पत्याचे भावजीवन विलक्षण कलात्मक रीतीने त्यांनी चितारले आहे. मालवणी लोकगीतांचा आणि मालवणी बोलीभाषेचा सुरेख परिचय करून देणारी व सागराची गाज शब्दांत पकडणारी ही कादंबरी आहे.

आमच्या चेडवाक काय काय देशाला ओ काय काय देशाल?
तुमच्या चेडवाक आमच्या गावात दर्याची शेती, माशाची आमटी मागात तितकी मेळात हो मागात तितकी मेळात..
आंब्याची आडी, फणसाची झाडी सोडून येता हा.. आमच्या चेडवाक काय काय देशाल हो काय काय देशाल?
कालवाचे डोळे, खाडीतले मुळे
आमच्या गावात मागात ता ता खाशाल हो मागात ता ता खाशाल.
तांबडी माती, तांबडी कौला सोडून येता हा आमच्या चेडवाक काय काय देशाला हो काय काय देशाल?
झापाची झोपडी, वसरेक होडी
पावलाक पुळन चालशाल तितकी लागात हो चालशाल तितकी लागात.
आमच्या चेडवाक काय काय देशाल हो काय काय देशाल?
लाटांका भिडनारो, माडावर चढणारो दांडगो बापयो तुमच्या चेडवाक पॉटभर मेळात हो पॉटभर मेळात.

नवीनच लग्न होऊन सासरी जायला निघालेल्या विवाहित मुलीला होडीत बसवून सासर-माहेरच्या स्त्रियांमध्ये रंगलेला हा प्रश्नोत्तररूपी सामना आपल्या गावाबद्दल प्रेम व अभिमान दर्शविणारा आहे.

पुढे याच कादंबरीत मच्छीमार रापणकर मंडळींची गलबते समुद्रात लोटताना आणि रापण ओढताना जोर लावण्यासाठी वीरश्री निर्माण करणारी, श्रम निवारण करणारी हमवनी गीते दर्यावर्दी संगीताची आठवण करून देतात.

जुने जहाज पर नवे खलाशी
नवे जहाज पर जुने खलाशी
अच्छा बंदर में लाल बावटा
आमची चालली रोजची झंगटा
झाप्पय झाप्पय, आहिलेस दाहिलेस
मालीलेस ओढून लाग बाबा
जोर काड बाबा
एकदाच लागे रे बाबा

‘आनां’च्या ही ऐलपैल या कादंबरीत संकलित करण्यात आलेली मालवणी बोलीतील लोकगीते मच्छिमार लोकजीवनाचे यथार्थ चित्रण करतात.

१९५६मध्ये काश्मीर प्रश्नावर ‘झेलमचे अश्रू’ आणि राणा प्रतापच्या जीवनावर ‘प्रतिज्ञा प्रताप’ अशी दोन नाटके लिहून त्यांनी मुंबईच्या रंगभूमीवर त्याचे नाट्यप्रयोग केले.

‘आनां’च्या साहित्य संपदेमध्ये मच्छिमारांच्या जीवनावर आधारित ‘शेलूक’ कथासंग्रहाला महाराष्ट्र राज्याचे पारितोषिक लाभले होते. कोकणातील माणसे, त्यांचे स्वभावविशेष, त्यांचे परस्परसंबंध, त्यांची भाषा, त्यांची संस्कृती, कोकणच्या निसर्गसौंदर्याचे तरल आणि नाट्यपूर्ण चित्रण त्यांनी ‘शेलूक’मधून समर्थपणे रंगविले.

‘आनां’च्या जीवनात पत्नी शरयू यांचे आगमन उशिरा म्हणजे त्यांच्या वयाच्या बेचाळिसाव्या वर्षी झाले. पत्नी शरयू यांची त्यांना चांगली साथ लाभली. दोघेही साहित्यिक असल्यामुळे त्यांचे जीवन सुखकर झाले.

आ. ना. पेडणेकर यांनी अनेक कथा लिहिल्या. त्यांचा ‘रेड ग्रीन’ कथासंग्रह वाचनीय आहे. ‘शेलूक’खेरीज ‘ऐलपैल’ व ‘गाणीबिणी’ला शासनाचे पुरस्कार मिळाले होते. आणीबाणीच्या काळात त्यांच्या ‘रेड ग्रीन’ला मिळालेला पुरस्कार त्यांनी नाकारला होता. ते आपल्या मतांशी ठाम असत.

‘आनां’चा लेखनप्रवास अखंड चालु होता. त्यांचा ‘वेडा आंबा’ वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यांची लेखनशैली खूपच उच्च दर्जाची असल्यामुळे त्यांच्या कविता मनाला भिडतात आणि आपल्याशा वाटतात. त्यांची आठवणीत राहणारी आणखी एक कविता म्हणजे

कितीक वर्सा… कितीक वर्सा नाय लागलो मुलखातलो वारो,
कितीक वर्सा नाय घातलंय पांदीतसून कुकारो….

किती समर्थ लेखन…

आ. ना. पेडणेकर जेव्हा बालपणात डोकावतात तेव्हा त्यांच्या मालवणी भाषेला वेगळाच रंग चढतो. ‘माझा काका’मध्ये त्यांनी तोंडात सतत देवाचं नाव असणाऱ्या, परंतु त्याविरुद्ध कृती करणाऱ्या काकाबद्दल खुमासदार लिहिलंय…

माझा काका जेव्हा अवसेला कोंबडा बळी देतो
तेव्हा त्याच्यावर सुरी चालवीत ‘शिव शिव’ पुटपुटतो…

किती बारीक निरीक्षण… आणि मार्मिक लेखन

असा हा आपल्या लेखनाला सातासमुद्रापार नेणारा, अलिबागच्या जे. एस. एम. कॉलेजमधून निवृत्त झालेला मालवणचा सुपुत्र… आपल्या प्रदीर्घ अशा प्राध्यापकीय सेवेतून निवृत्त झाल्यावरही मुंबई विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना ते मराठी शिकवायचे. त्यांची तेजस्वी कारकीर्द आम्हा सर्वांसाठीच प्रेरणादायी होती. अशा या मालवणच्या थोर सुपुत्राची प्राणज्योत वयाच्या ७७व्या वर्षी ११ ऑगस्ट २००४ रोजी मालवली. त्यांच्या जाण्याने श्रीमती शरयू पेडणेकर यांच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली आणि आमच्यासारखे त्यांचे अनेक चाहते त्यांच्या अनेक नवीन कथा, कवितांना अंतरले.

मृत्यूपूर्वी त्यांनी सांगितल्याप्रमाणे मृत्यूनंतर त्यांचे कोणतेही क्रियाकर्म न करता त्यांच्या पत्नी शरयू पेडणेकर यांनी तब्बल एक लाख रुपये मालवणच्या आपल्या भंडारी हायस्कूलला देणगी स्वरूपात दिले. अशा या मालवणी अंतरंगाच्या साहित्यिकास माझा दंडवत.

  • शिवराज विठ्ठल सावंत
    (राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक; जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मालवण दांडी येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत; लेखक)
    पत्ता : मु. पो. मसुरे, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग – ४१६६०८
    मोबाइल : ९४२२९ ६४१७३
    ……

(हा लेख सिंधुसाहित्यसरिता या पुस्तकातील आहे. सुरेश ठाकूर हे या पुस्तकाचे संपादक असून, सत्त्वश्री प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यात नाथ पैंसह सिंधुदुर्गातील एकूण २२ साहित्यिक व्यक्तिमत्त्वांबद्दलचे लेख आहेत. या छापील पुस्तकाची किंमत २०० रुपये आहे. पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. ई-बुक गुगल प्ले बुक्सवर उपलब्ध असून, त्याची किंमत १५० रुपये आहे. ई-बुक खरेदीसाठी https://bit.ly/2IlFV7C या लिंकवर क्लिक करा.)

………
(‘कोमसाप’च्या मालवण शाखेतर्फे राबविल्या गेलेल्या ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

Leave a Reply