महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या दुसऱ्या सभेला प्रतिसाद

रत्नागिरी : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेने आयोजित केलेल्या दुसऱ्या साहित्य सभेला साहित्य रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

येथील पटवर्धन हायस्कूलच्या ठाकूर सभागृहात ही सभा पार पडली. सभेची सुरवात रत्नागिरीतील प्रथितयश हार्मोनियम वादक निरंजन गोडबोले यांचे हार्मोनियम वादनाने झाली. त्यांना निखिल रानडे यांनी उत्तम तबलासाथ केली. त्यानंतर रत्नागिरीतील लेखक दीपक नागवेकर यांनी त्यांच्या सोनतळ या ललित लेख संग्रहातील दोन लेखांचे वाचन केले. रसिकांनी त्यांना मनापासून दाद दिली. सभेच्या शेवटी ओंकार मुळ्ये यांनी वपुंचे लेखन या विषयी त्यांच्या निवडक कथांचा आधार घेत आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले.

रत्नागिरीतील लेखक आणि साहित्यप्रेमी यांना आपले विचार मांडण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे दर महिन्याला साहित्य सभेचे आयोजन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. लेखक, कवी तसेच साहित्यप्रेमींनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सौ. मनाली नाईक (९४२०१५४१२८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शाखेचे अध्यक्ष सुभाष देव यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply