करोनाकाळातील कर्जाच्या व्याजावर पंचवीस हजारापर्यंतची व्याजमाफी

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने करोनाच्या काळातही नियमित कर्जफेड करणाऱ्या ग्राहकांना पंचवीस हजार रुपयांपर्यंतची व्याजमाफी दिली आहे. व्याजात १ महिन्याची सवलत देणारी महाराष्ट्रातील पतसंस्थांमधील स्वामी स्वरूपानंद ही एकमेव पतसंस्था असावी, असे श्री. पटवर्धन यांनी आवर्जून सांगितले.

ते म्हणाले की, स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने आर्थिक शिस्तीला महत्त्व दिले. वक्तशीरपणा जपला. आपल्या उपलब्ध निधीचा सर्वोत्तम विनियोग केला. योग्य नियंत्रण ठेवले. वसुलीचे धोरण यंत्रणा नेटकी राबवली. त्यामुळे स्वरूपानंद पतसंस्था सातत्याने नफा मिळवत राहिली. नफ्यातून स्वनिधी वाढवण्याचे धोरण आम्ही राबवले. त्यामुळे संस्थेची आर्थिक ताकद वृद्धिंगत झाली. मात्र या सगळ्या प्रवासात सभासद ग्राहकांचे योगदान लाख मोलाचे असते, याचा विसर कधीही पडला नाही. करोनामुळे व्यवसाय, उद्योग, व्यापार, शेती सर्वच आघाड्यांवर व्यवहार ठप्प होते. नुकसान मोठे होते. त्यामुळे कर्जदारांना अडचणी येत होत्या. मात्र पतसंस्थेने कोणतीही कडक उपाययोजना टाळत कर्जदारांना मुदत देत हळूहळू वसुली चालू केली आणि मार्चअखेरीपर्यंत ९९.२४ टक्क्यांच्या आसपास वसुली झाली. मात्र ज्या कर्जदारांनी या कठीण कालखंडात नियमित परतफेड केली, अशा कर्जदारांना व्याजात सवलत देण्यासाठी पतसंस्थेने आपल्या नफ्यातून ७५ लाखाचा निधी वर्ग करून वेगळा निधी निर्माण केला. त्या निधीतून एप्रिल २०२० चे कर्जाचे व्याज संस्थेने कर्जदाराला परत करण्यास सुरुवात केली. एप्रिल २०२० महिन्यात पूर्ण लॉकडाउन होता. ज्या कर्जदारांनी कर्ज खाते पूर्ण केले त्यांना, त्या महिन्याचे अधिकतम २५००० रुपयांपर्यंतचे व्याज संस्थेने परत केले. ज्यांची कर्जखाती नियमित सुरू आहेत, त्यांच्या कर्ज खात्यावर ती रक्कम जमा करण्यात येणार आहे. संस्थेच्या २५०० कर्जदारांना या व्याज सवलतीचा लाभ मिळणार आहे. कर्ज सहायता निधीसाठी ७५ लाख रुपयांची तरतूद करून कर्जदारांना व्याज सवलत दिली आहे. सोनेतारण कर्जदारांनाही सुरुवातीलाच अर्धा टक्का व्याज दर कमी करून देण्यात आले. सोनेतारण कर्जदारांची संख्या २० हजारांच्या पुढे असेल, अशी माहिती श्री. पटवर्धन यांनी दिली.

ज्या कर्जदारांनी करोनाच्या संकटात परिस्थिती खूप कठीण असूनही कर्ज परतफेडीची आपली जबाबदारी पूर्ण केली, त्यांना धन्यवाद देतानाच त्यांच्या या कर्तव्यपूर्तीमुळे संस्थेबाबतच्या आपुलकीच्या धोरणामुळे पतसंस्थेला या करोनाच्या कालखंडातही चांगला व्यवसाय करता आला. कर्जदारांना या कठीण कालखंडात स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेकडून मदत म्हणून १ महिन्याचे २५००० रुपयांच्या मर्यादेपर्यंतचे व्याज माफ करण्याचा निर्णय घेऊन तो कार्यान्वित करण्यात आला, असे श्री. पटवर्धन यांनी सांगितले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply