बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे कर्तव्यनिष्ठा, कार्यगौरव पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : येथील बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे सन २०२०-२१ चे कर्तव्यनिष्ठा आणि कार्यगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यात ३ तालुक्यातील ५ जणांचा समावेश आहे.

कर्तव्यनिष्ठा पुरस्कारासाठी कासारकोळवण (तालुका संगमेश्वर) येथील सुभाष मांगले आणि विश्वास मांगले यांची निवड करण्यात आली आहे. मांगले कुटुंब गेल्या ३ पिढ्या आपल्या खासगी जागेत स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला आणि प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी ध्वजवंदनाचा कार्यक्रम करतात. हा एकमेव खासगी ध्वजवंदनाचा कार्यक्रम असून त्याला सरपंच, लोकप्रतिनिधी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित राहतात.

कार्यगौरव पुरस्कारप्राप्त व्यक्तींमध्ये धामणसे (ता. रत्नागिरी) येथील कारागीर अशोक एकनाथ पांचाळ, फिनोलेक्स फाटा (ता. रत्नागिरी) येथील ७० वर्षीय व्यावसायिक श्रीमती शैला सिद्धेश्वर लिमये आणि
चिंदर बाजार (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील कारागीर सुरेश तोडकर यांचा समावेश आहे. अशोक पांचाळ अपंग असून अपंगत्वावर मात करून ते लाकडी पालखी बनवितात. श्रीमती शैला लिमये गेली २६ वर्षे बटाटेवडे, मिसळ, भजी इत्यादी खाद्यपदार्थ बनवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्या ७० वर्षे वयाच्या आहेत. सुरेश तोडकर चिंदर बाजार ते आचरा, देवगड यादरम्यान पायी फिरून दिवाबत्ती दुरुस्त करून देतात. तसेच काचेच्या बाटल्या कापून त्याच्या अल्पखर्चिक दिवट्या बनवतात.

या सर्व पुरस्कार विजेत्यांना त्यांच्या निवासस्थानी पुरस्कार प्रदान करण्यात येतील किंवा रजिस्टर्ड पोस्टाने पोहोचवले जातील, असे ट्रस्टच्या वतीने विश्वस्त यशराज बोडस यांनी कळविले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply