रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत आज (३० मार्च) करोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढतेच आहे. आज रत्नागिरीत ९४, तर सिंधुदुर्गात ३५ नव्या रुग्णांची नोंद झाली. रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. आज नवे ९४ रुग्ण आढळले, तर ६० रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाचा मृत्यू झाला.
रत्नागिरी जिल्ह्यातील स्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी २९, खेड आणि लांजा प्रत्येकी २, गुहागर ५, चिपळूण २८, संगमेश्वर ११(एकूण ७७). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ५, दापोली ३, खेड आणि मंडणगड प्रत्येकी १, चिपळूण ४, संगमेश्वर २ (एकूण १७). (दोन्ही मिळून ६९). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार ९४२ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ४५५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत ९९ हजार ४२४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४०२ आहे. त्यातील सर्वाधिक ९५ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून २३५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ६० जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या दहा हजार ७५ झाली आहे. करोनामुक्तीचा दर आज आणखी घटला असून तो ९२.०७ टक्के झाला आहे.
आज चिपळूणच्या शासकीय रुग्णालयात ६७ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या ३७६ झाली असून मृत्युदर ३.४३ टक्के झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती
सिंधुदुर्गात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. आज (३० मार्च) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार ३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ७ हजार ३८ एवढी झाली आहे. आज ३० जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६ हजार ४७३ झाली आहे. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची वाढू लागली असून ती ३७२ वर पोहोचली आहे. करोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १८२ असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.
Follow Kokan Media on Social Media



