करोना योद्धे खरोखरीच गांभीर्याने युद्ध करतात का?

जगभर कहर माजवणाऱ्या करोनाच्या बाबतीत सारेजण हवालदिल झाले आहेत. शासन-प्रशासन आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी करोनाविरुद्धची लढाई अत्यंत जोखमीने लढवत आहेत. या आरोग्य यंत्रणेवर सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे. रुग्णालयातील व्यवस्था, रुग्णांचे औषधोपचार, कर्मचाऱ्यांची कमतरता या आणि अशा अनेक बाबतीत सर्वसामान्य जनता नाराजी असली तरी करोना योद्धे म्हणून काम करणारे डॉक्टर, नर्सेस आणि इतर कर्मचारी रुग्णांसाठी आवर्जून आणि मनापासून काम करत आहेत, यावर सर्वसामान्य लोकांचा विश्वास आहे. काही घटना मात्र या विश्वासाबाबत संशय व्यक्त करण्यासारख्या घडतात.

मठ (ता. लांजा) लांजा येथील एक तरुण दाम्पत्य खानू (ता. रत्नागिरी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात संशयित करोनाबाधित म्हणून स्वतःहून गेले तीन दिवसांपूर्वीची ही घटना आहे. रुग्णालयात त्या दोघांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यापैकी एक जण पॉझिटिव्ह निघाला. पण दोघांची प्रकृती तशी स्थिर असल्यामुळे त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. हे दांपत्य राहत असलेले गाव लांजा तालुक्यातील जावडे म्हणजे सुमारे तीस किलोमीटर अंतरावरील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत येते. खानू गाव अवघ्या तीन किलोमीटरवर आहे. म्हणूनच त्या दाम्पत्याने खानू येथे जाण्याचा निर्णय घेतला होता. तेथील डॉक्टरांनी दिलेला सल्ला मानून दोघेही घरी पोहोचले. हे दोघे माझे जवळचे नातलग असल्यामुळे मी त्यांची चौकशी केली तेव्हा आरोग्य यंत्रणेबाबतचा अविश्वास निर्माण झाला.‌ स्वतःहून ही दोघे संशयित करोनाबाधित प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्यानंतर त्यांना तेथे दाखल करून घेतले नाहीच, शिवाय योग्य त्या आरोग्य संस्थेकडे जायलाही सांगितले गेले नाही. साधी तापाची, सर्दी-पडशाची गोळीही त्यांना देण्यात आली नाही. आता यापुढील औषधोपचार जावडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर करतील, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे ती दोघे आपल्या घरी निघून गेली. वास्तविक रुग्णालयापर्यंत आलेल्या आणि त्यातही करोनासारख्या सांसर्गिक आजाराची लक्षणे वाटल्यामुळे स्वतःहून दाखल होणाऱ्या रुग्णावर तातडीने उपचार करणे आवश्यक होते. मात्र औषधेही दिली नाहीत आणि दूरवरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडून पुढील कार्यवाही होईल, असे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली. हे एकदम चुकीचे वाटले.

याबाबत रत्नागिरी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांना मी दोन वेळा फोन केला. तो त्यांनी उचलला नाही. म्हणून त्यांना परिस्थितीची माहिती देणारा व्हॉट्स अॅपचा मेसेज केला. पण त्यालाही त्यांनी उत्तर दिले नाही. अखेर तासभराने तोच मेसेज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांना पाठविला. त्यांनी अवघ्या पाच मिनिटांत त्याची दखल घेतली. आणि खानू प्राथमिक आरोग्य केंद्राला योग्य ती माहिती देण्याबाबत सूचना करणार असल्याचे सांगितले.

त्यानंतर २४ तासांनी जावडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी या दोघांच्या घरी आले आणि त्यांनी देवधे येथील कोविड केअर सेंटरकडे जायचा सल्ला दिला, पण त्यांनीही कोणतीही गोळी औषधे दिली नाहीत. यातून आरोग्य व्यवस्थेविषयीचे अनेक प्रश्न निर्माण होतात. डॉक्टर्स, परिचारिका आणि सर्वच आरोग्य कर्मचारी रुग्णसेवेसाठी झटत आहेत, यात शंका नाही. पण अशी एखादी घटना समोर येते, तेव्हा त्याबाबत संशय वाटतो. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घेतली, तरी करोनाची जिल्ह्याची धुरा सांभाळणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना मात्र त्याचे गांभीर्य वाटले नाही. त्यांनी फोनची दखल घेतली नाहीच, पण मेसेजचीही दखल घेतली नाही. तब्बल चोवीस तास उपचारांविना करोनाचे दोघे संशयित रुग्ण घरी राहिले. त्यांनी करोनाविषयक योग्य ती काळजी घेतली. सोशल डिस्टंन्सिंगचे पालन केले. स्वच्छता राखली. सॅनिटायझरचा योग्य वापर केला. कारण त्यांना त्याचे गांभीर्य माहीत होते. पण त्याबाबतची काळजी घेतली गेली नसती, तर कदाचित वेगळेच चित्र निर्माण झाले असते. दोघांचीही प्रकृती तशी स्थिर होती म्हणून ठीक आहे. पण ती गंभीर असती तर २४ तासांनंतरही त्यांना उपचार मिळाले नसते तर काय स्थिती झाली असती?

असेच वेगवेगळ्या ठिकाणी होते का, ही अनास्था आहे का, तसा काही प्रोटोकॉल आहे का, याची माहिती मिळू शकली नाही. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मात्र रुग्णावर त्वरित उपचार झाले पाहिजेत, या मताशी सहमती दर्शवली. जिल्हा आरोग्य अधिकारी माझ्याशी आणि संबंधित रुग्णाशी थेट संपर्क साधतील, असेही त्यांनी सांगितले पण अजून तरी त्यांच्याकडून माझ्याशी संपर्क साधला गेला नाही.

अर्थातच हे उदाहरण म्हणजे हा एखादा अपवाद असू शकतो, याची मला पूर्ण कल्पना आहे. कारण खरोखरीच अनेक नर्सेस, डॉक्टर्स आपल्या घरीही न जाता किंवा घरी गेल्यानंतर कुटुंबापासून पुरेसे शारीरिक अंतर राखूनच वावरत आहेत. तान्ह्या बाळांनाही जवळ घेत नाहीत. कुटुंबापासून खूप दूर राहून त्यांना आपले कर्तव्य बजावावे लागत आहे, यात शंका नाही. पण असा एखादा प्रसंग घडला की संशय निर्माण होतो आणि प्रश्न निर्माण होतो की आरोग्य विभागात काम करणारे शासकीय कर्मचारी म्हणजेच शासकीय करोनायोद्धे खरोखरीच युद्ध करत आहेत का? काही कामचुकार योद्धेही आहेत? असतील, तर मात्र ती गंभीर बाब आहे. करोनाचा प्रसार व्हायला हेच योद्धे कारणीभूत ठरणार आहेत. वेळीच त्याची दखल प्रशासनाने घ्यायला हवी.

  • प्रमोद कोनकर
  • (9422382621)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply