बँकेतील एफडी मोडून सिंधुदुर्गपुत्राकडून करोनाबाधितांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

तळेरे (निकेत पावसकर) : राज्यासह देशभरामध्ये सध्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दगावत आहेत. अशा प्रसंगी रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत आणि त्यांना ऑक्सिजन वेळेत मिळावा, यासाठी सध्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर संजीवनी ठरत आहेत. या महागड्या उपकरणांची उपलब्धता मर्यादित असल्याने अनेकांना ती खरेदी करणे शक्य होत नाही. अशा स्थितीत तळेरे (ता. कणकवली) येथील एका तरुणाने बँकेतील एफडी मोडून मुंबईतील रुग्णांना कॉन्सन्ट्रेटर पुरविले.

भांडुप (मुंबई) येथील माऊली फाउंडेशन नावाच्या संस्थेने हे समाजकार्य चालविले आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व्हॅनच्या साह्याने संस्थेतील सदस्य ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांपर्यंत ही उपकरणे पोहोचविण्याचे काम सध्या करत आहेत.

सध्या कोविड सेंटरवर मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यात अनेक रुग्ण ऑक्सिजनअभावी दगावल्याची उदाहरणेदेखील आहेत. अशा परिस्थितीत रुग्णापर्यंत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पोहोचविले तर कितीतरी मदत होऊ शकते. शिवाय या रुग्णांना रुग्णालयाऐवजी होम आयसोलेशनमध्ये राहून उपचार करणेही शक्य होते. ज्या रुग्णांना रुग्णालयात उपचार घेण्याची नितांत गरज असते, त्यांना रुग्णालयातही उपचार घेता येतात. मात्र ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहेत. या उपकरणांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने ते खरेदी करणे सर्वांनाच शक्य नसते. त्यामुळे अनेक स्वयंसेवी संस्था ही उपकरणे खरेदी करून ती गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

भांडुपची अशीच एक संस्था सध्या गरजू रुग्णांपर्यंत मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पोहोचवत आहे. यासाठी संस्थेने एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व्हॅन बनविली आहे. त्यामधून या उपकरणासाठी संस्थेकडे संपर्क साधणाऱ्या रुग्णांच्या घरापर्यंत तसेच रुग्ण दाखल असलेल्या रुग्णालयापर्यंत ही संस्था या मशीन्स पुरविते. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळत आहे. तळेरे गावचे सुपुत्र आणि स्ट्रक्चरल इंजिनिअर विशाल कडणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. त्यांनी स्वतःच बँकेतील एफडी मोडून संस्थेकरिता या उपकरणांची खरेदी केली आहे. सध्या १२ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर रुग्णांच्या सेवेत आहेत. रुग्ण बरा झाल्यानंतर हे उपकरण पुन्हा करायचे करून दुसऱ्या गरजू रुग्णाला ते पोहोचविले जाते. चोवीस तास या संस्थेकडून या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला आहे, असे अध्यक्ष गिरीश सावंत यांनी सांगितले.

जास्तीत जास्त ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देऊन घरच्या घरीच रुग्णांवर करणे शक्य होते. त्यामुळे रुग्णालयांवरील ताणदेखील कमी होत आहे. अगदी नितांत गरज असलेल्या रुग्णाला रुग्णालयांमध्ये जागा उपलब्ध होत आहेत. या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply