मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण
रत्नागिरी : रत्नागिरीतील २०० खाटांचे महिला रुग्णालय आणि ओणी (ता. राजापूर) येथील ३० खाटांचे रुग्णालय अशा दोन रुग्णालयांचे ऑनलाइन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.
करोनाचा मुकाबला सक्षमपणे करण्यासाठी नवी कोविड केंद्रे उभारून खाटा आणि रुग्णसुविधेसाठी रुग्णवाहिका आदी सुविधांसोबत सर्वाधिक लक्ष ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर द्यावे आणि शक्य त्या ठिकाणी ऑक्सिजन निर्मितीला प्रारंभ करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
रत्नागिरी शहरातील महिला रुग्णालयातील करोना रुग्णालयाच्या २०० खाटांचा दुसरा टप्पा आणि राजापूर तालुक्यातील ओणी येथील ३० खाटांच्या करोना कोविड रुग्णालयाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी केले. अगदी आठ दिवसांपूर्वी नैसर्गिक आपत्तीचे यशस्वी व्यवस्थापन करून आता जिल्ह्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. याबाबत त्यांनी सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले. जिल्हा परिषदेतर्फे खास महिला आणि बालकांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार ही निश्चित चांगली बाब आहे. सोबतच आपण ऑक्सिजनची उपलब्धता जरूर ठेवा, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता १२०० टन आणि मागणी १७०० टन अशी स्थिती दुसऱ्या लाटेत निर्माण झाली. त्यामुळे इतर ठिकाणांवरून ऑक्सिजन आणावा लागला. अशी स्थिती यापुढे येऊ नये, याची खबरदारी घ्या. करोनाचा मुकाबला करताना अधिक सक्षम होण्याची आवश्यकता आहे. म्युकर मायकोसीस हा कोविडमधील औषधांमुळे होणारा आजार आहे. यासाठी त्याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. याकरिताच माझा डॉक्टर ही संकल्पना महत्त्वाची आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई-गोवा महामार्गावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असावे अशी मागणी खासदार विनायक राऊत आणइ आमदार राजन साळवी यांनी केली. यासाठी जागाही उपलब्ध असल्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर असा प्रस्ताव आपण आणावा, याबाबत जरूर सकारात्मक भूमिका ठेवून रुग्णालय होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात रुग्णालये तसेच कोविड केअर सेंटर आणि मोठ्या प्रमाणावर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यास जिल्हा पूर्णपणे तयार आहे, असे, पालकमंत्री अनिल परब यांनी सांगितले.
तिसऱ्या लाटेत बालकांना धोका अधिक आहे. याचा विचार करुन बालकांसाठी ५० खाटांचे स्वस्तिक रुग्णालय त्या व्यवस्थापनाने उपलब्ध करून दिले आहे. तेथे सर्व खाटांना ऑक्सिजन सुविधा तसेच व्हेंटिलेटर सुविधेसह स्वतंत्र अतिदक्षता कक्ष असेल. हे रुग्णालय येत्या ८ दिवसांत आम्ही सुरू करीत आहोत, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यात घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली असून येणाऱ्या काळात २००० पेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावात साधारण एक हजार खाटा संस्थात्मक विलगीकरणासाठी तयार होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. जिल्ह्यातील आरोग्य स्थितीचा आढावा त्यांनी आरंभी सादर केला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे, उपजिल्हाधिकारी राजश्री मोरे आदी उपस्थित होते.
आज लोकार्पण झालेला महिला रुग्णालयाचा टप्पा २ एकूण २०० खाटांचा आहे. या सर्वच खाटा ऑक्सिजन सुविधेसह आहेत. कोविडची पहिली लाट आली त्यावेळी रुग्णालयातील १०० खाटांचा पहिला टप्पा समर्पित कोविड रुग्णालय म्हणून गेल्या वर्षापासून कार्यरत आहे. या लोकार्पणानंतर संपूर्ण रुग्णालयाची क्षमता आता ३०० खाटांची झाली आहे. इमारतीत एकूण ३ मजले असून तळमजल्यावर ५५, पहिल्या मजल्यावर ६३ आणि दुसऱ्या मजल्यावर दोन कक्ष प्रत्येकी ४१ अशा ८२ खाटा आहेत. वैद्यकीय उपचार सुविधेच्या अनुषंगाने येथे व्हेंटिलेटरसह अतिदक्षता कक्ष पहिल्या मजल्यावर असून तेथे २२ खाटा आहेत. तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक बाधा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यासाठी वेगळा अतिदक्षता कक्ष येथे निर्माण करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण ८८८६.०८ चौरस मीटर बांधकाम झाले आहे. त्यासाठी ८ कोटी २६ लाख २३ हजार ८९२ रुपये खर्च आला आहे. रुग्णसेवेत अत्यावश्यक बाब असलेल्या ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी इमारतीलगत स्वतंत्र उभारणी करण्यात येत आहे. तेथे मध्यवर्ती ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थादेखील या सोबत करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समिती निधीतून एक कोटी ६९ लाख रुपये उपलब्ध झाले आहेत. या प्रकल्पाची क्षमता १७० जम्बो सिलिंडर प्रतिदिन असणार आहे. याव्यतिरिक्त २० किलोलिटर साठवण क्षमता असणारा लिक्विड ऑक्सीजन टॅंक असेल.
ओणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालगत असलेल्या परिचारिका प्रशिक्षण केंद्रात ३० खाटांचे समर्पित कोविड रुग्णालय झाले आहे. तेथे व्हेंटिलेटरसह ५ खाटांचा अद्ययावत अतिदक्षता कक्ष आहे. ओणी येथील हे रुग्णालय आमदार राजन साळवी यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून ८९ लाख रुपये देऊन सुरू केले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेली दोन्ही रुग्णालयांमधील सुविधांबाबतची चित्रफित यावेळी दाखविण्यात आली.

