सिंधुदुर्गात करोनामुक्त ६७, नवे बाधित ६६७

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, ३० मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत नवे ६६७ करोनाबाधित आढळले, तर अवघे ६७ रुग्ण करोनामुक्त झाल्याने घरी गेले.

जिल्ह्यात आज एकूण ६६७ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २५ हजार ९३६ झाली आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आज बरे होऊन गेलेल्या ६७ रुग्णांसह जिल्ह्यात आतापर्यंत १९ हजार ८१९ जण करोनामुक्त झाले आहेत.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ९७, दोडामार्ग – ३९, कणकवली – ९२, कुडाळ – १२४, मालवण – १५१, सावंतवाडी – १००, वैभववाडी – १६, वेंगुर्ले – ४३, जिल्ह्याबाहेरील ५.

सध्या जिल्ह्यात ५ हजार ४२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ६६६, दोडामार्ग ३१८, कणकवली ८४०, कुडाळ १२३८, मालवण ९५३, सावंतवाडी ८२३, वैभववाडी २०९, वेंगुर्ले ३६०, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १९. सक्रिय रुग्णांपैकी ३२१ रुग्ण ऑक्सिजनवर तर ५५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात आधीच्या ६ आणि आजच्या ६ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ६७५ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – देवगड ३, दोडामार्ग १, कणकवली ४, मालवण १, सावंतवाडी १, वैभववाडी १, वेंगुर्ले १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या तालुकानिहाय मृत्यूची एकूण संख्या अशी – देवगड ९०, दोडामार्ग – २०, कणकवली – १४३, कुडाळ – ९६, मालवण – १०५, सावंतवाडी – ११३, वैभववाडी – ४७, वेंगुर्ले – ५९, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – २.
…….

तत्पर उपचार.. उत्तम घरची आपुलकी.. जिल्हा रुग्णालयाचे मानावे तेवढे आभार थोडेच..!


जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी माझी अगदी घरच्यासारखी काळजी घेतली. आम्हाला उत्तम जेवण दिले जात होते. वेळेवर औषध देण्यासाठी नर्स तत्पर होत्या, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत मालवण तालुक्यातील वायरी येथील ६१ वर्षीय रुग्णाने.
या रुग्णाला आज, ३० मे रोजी उपचारांनंतर बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले. त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. ही व्यक्ती २० दिवसांपूर्वी करोना पॉझिटिव्ह झाली. त्यानंतर त्यांची एचआरसीटीही करण्यात आली. त्यामध्ये त्यांचा स्कोअर १७ इतका होता. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स आणि स्टाफने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करून घेतले. वीस दिवसांच्या उपचारांनंतर आज त्यांना घरी सोडण्यात आले.

त्यांना घरी नेण्यासाठी आलेला त्यांचा मुलगा म्हणाला, करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्ही खूपच घाबरलो होतो. काय करावे ते सुचत नव्हते. पण रुग्णालयातील स्टाफने चांगले सहकार्य केले. त्यांना रुग्णालयात आणण्यासाठी वाहनाची सोय केली. तातडीने दाखल करून घेतले. या काळात लागेल ते सर्व सहकार्य केले. योग्य उपचार करून त्यांना आज घरी सोडत आहेत. आम्हाला झालेला आनंद आम्ही शब्दांत व्यक्त करू शकत नाही. यावेळी त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळत होते.

या आनंदाश्रूंमधूनच जिल्हा रुग्णालय आणि आरोग्य विभागातील डॉक्टर्स, नर्स तसेच कर्मचारी करत असलेल्या रुग्णसेवेची पोचपावती मिळाली, असेच म्हणावे लागेल.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply