सावंतवाडी : जगभरात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटनाच्या दृष्टीने मार्केटिंग करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची संपूर्ण माहिती असणारी, भारतातील सर्व आणि जगभरातील इतर अशा एकूण पन्नास भाषांमध्ये तयार केलेल्या www.sindhudurg-parytan.com या वेबसाइटचे माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांच्या हस्ते ८ जून रोजी सकाळी ११ वाजता लोकार्पण होत आहे. फेसबुक लाइव्हवरून हा कार्यक्रम होईल.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी ही माहिती दिली. अशी वेबसाइट तयार करणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला जिल्हा आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची सर्व भाषांत वेबसाइट असावी ही संकल्पना महासंघाचे कार्याध्यक्ष सतीश पाटणकर यांची असून त्याला महासंघाचे सोशल मीडिया प्रमुख किशोर दाभोळकर यांनी मूर्त स्वरूप दिले आहे. वेबसाइटवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यातील पर्यटनस्थळे, गावागावांतील मंदिरे, चर्च, बीचेस, गड-किल्ले, कृषी पर्यटन, लोककला, मालवणी पदार्थ, संस्कृती, जिल्ह्याचा संपूर्ण इतिहास, जिल्ह्याची निर्मिती, आध्यात्मिक, साहस, अॅग्रो, बीच टुरिझम याबरोबरच सिंधुदुर्गचा नकाशा आणि इतर सर्व पायाभूत सुविधांची माहिती मिळणार आहे. महासंघाने आतापर्यंत राज्यातील आणि राज्याबाहेरील सुमारे बारा टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीशी संपर्क साधला आहे.
राज्याबाहेरील असलेल्या या एजन्सींना त्यांच्या भाषेत सिंधुदुर्ग जिल्ह्याची माहिती मिळाल्यास काही महिन्यांनंतर पर्यटकांचा लोंढा सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वळेल, असा विश्वास व्यक्त करून मोंडकर यांनी याद्वारे आधीच मेटाकुटीला आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टूर अँड ट्रॅव्हल्स तसेच छोटे उद्योजक आणि सर्व व्यापाऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
