सिंधुदुर्गात नवे ५९२ करोनाबाधित, केवळ ८८ रुग्ण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, ७ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ५९२, तर एकूण ३० हजार ८०५ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आज केवळ ८८ जण करोनामुक्त झाले. त्यापैकी घोटगे (ता. कुडाळ) येथील ५८ वर्षांच्या करोनामुक्त रुग्णाने जिल्हा रुग्णालयात घरच्यासारखी काळजी घेतल्याचे सांगितले.

सध्या जिल्ह्यात ६ हजार ६९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज १८ जणांच्या दुबार तपासणीसह ५९२ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ९७, दोडामार्ग – ३८, कणकवली – ६१, कुडाळ – ११७, मालवण – ११९, सावंतवाडी – ८३, वैभववाडी – १६, वेंगुर्ले – ४०, जिल्ह्याबाहेरील ३.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १०२८, दोडामार्ग ३०२, कणकवली १०४४, कुडाळ १२६५, मालवण १२९०, सावंतवाडी ९१७, वैभववाडी २६७, वेंगुर्ले ५५६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २५. सक्रिय रुग्णांपैकी ३६७ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात आधीच्या ९ आणि आजच्या ३ अशा १२ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ७६९ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – देवगड २, दोडामार्ग १, कणकवली २, कुडाळ ४, मालवण २, वैभववाडी १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड १०५, दोडामार्ग – २४, कणकवली – १५७, कुडाळ – ११८, मालवण – १२७, सावंतवाडी – १२२, वैभववाडी – ५२, वेंगुर्ले – ६२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – २.

………
दिलासादायक वृत्त

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सनी माझी घरच्यासारखी काळजी घेतली

रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सनी घेतलेली घरच्यांसारखी काळजी, वेळेवर मिळालेला योग्य औषधोपचार यामुळेच आज मी करोनामुक्त झाल्याची भावना व्यक्त केली आहे, घोटगे (ता. कुडाळ) येथील ५८ वर्षीय करोनामुक्त रुग्णाने.

पोलीस दलातील निवृत्त झालेले घोटगे येथील ५८ वर्षीय रुग्ण करोना झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांना इतर कोणत्याही व्याधी नव्हत्या. पण करोनाने गाठले. करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले होते. पण ऑक्सिजन पातळी ८० पर्यंत खाली आली आणि त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. एचआरसीटी स्कोअर २० होता. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. योग्य व वेळेवर उपचार झाल्यामुळे ते आज करोनामुक्त झाले आहेत.

रुग्णालयात दाखल असतानाचा आपला अनुभव सांगताना ते म्हणाले, दाखल होताना करोनातून बरा होतो का नाही, ही काळजी लागली होती. सात दिवस आयसीयूमध्ये काढले. पण जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्स यांनी अगदी घरच्यासारखी माझी काळजी घेतली. दोन वेळा डॉक्टर येऊन स्वतः तपासत होते. दिवसातून दोन वेळा काढा दिला जात होता. वेळेवर आणि चांगले जेवण दिले जात होते. डॉक्टर्स आणि नर्सने केलेल्या उपचारांमुळेच आज मी करोनामुक्त झालो आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply