रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्याने २४ ऑगस्ट रोजी थांबलेली जनआशीर्वाद यात्रा येत्या २७ ऑगस्टपासून रत्नागिरीतून पुन्हा सुरू होणार आहे. जनआशीर्वाद यात्रेचे संयोजक प्रमोद जठार यांनी आज (२५ ऑगस्ट) सायंकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजप कार्यालयात सायंकाळी उशिरा ही पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, शहराध्यक्ष सचिन करमरकर आदी उपस्थित होते. श्री. जठार यांनी सांगितले की, श्री. राणे यांची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा येत्या शुक्रवारपासून रत्नागिरीतून सुरू होईल. त्यादिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत श्री. राणे रत्नागिरीत यात्रा करतील. त्यानंतर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ दिवस यात्रा करतील. त्यानंतर यात्रेची सांगता होईल.
श्री. जठार म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक होऊ नये, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक कालच लावली. परंतु दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात स्वतः अनिल परब पडल्याचे जनतेने व्हायरल झालेल्या व्हिडीओतून पाहिले. याची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली असून तो व्हिडीओ आणि शिवसेनेच्या शाखाप्रमुखाप्रमाणे वागणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षकांची सीबीआय चौकशी करण्याची भाजपने मागणी केली आहे.

