अनाथ मुलांच्या मदतीसाठी शिक्षकांकडून भौमासुर वध नाट्यप्रयोग

सिंधुदुर्गनगरी : करोनामुळे मातृ-पितृ छत्र हरपलेल्या बालकांसाठी वेंगुर्ल्यातील शिक्षकांनी भौमासुर वध या दशावतारी नाटकाचा प्रयोग आयोजित केला आहे. पारंपरिक कलेच्या संवर्धनाबरोबरच आधुनिक काळातील समस्येला तोंड देण्याचा हा वेंगुर्ल्यातील शिक्षकांचा प्रयोग वाखाणण्यासारखा आणि अनुकरणीय आहे.

करोना या जागतिक महामारीमध्ये अनेकांना आपले प्राण गमावावे लागले. अनेक मुले अनाथ झाली. अशाच करोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत करण्याच्या उद्देशाने वेंगु्र्ले तालुक्यातील शिक्षक सरसावले आहेत. या शिक्षकांनी स्थापन केलेल्या कला मंचच्या वतीने ३० डिसेंबर २०२१ रोजी भौमासुर वध अर्थात नरक चतुर्दशी महिमा या दशावतारी नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे. करोना महामारीने अनाथ झालेल्या मुलांसाठी आर्थिक मदत करावी, या हेतूने हा प्रयोग होणार आहे. या नाटकाच्या प्रयोगातून जमा होणारा निधी अनाथ मुलांना वितरित करण्यात येणार आहे.

निधीच्या वितरणाचा सोहळा शनिवार, ८ जानेवारी २०२२ रोजी सकाळी साडेअकरा वाजता वेंगुर्ले येथील साई मंगल कार्यालयात होणार आहे.

करोनाची झळ जगातल्या प्रत्येक देशाला बसली आहे. या महामारीच्या काळात अनेक ठिकाणी करोना रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांपासून दूर राहण्याचे प्रकार घडताना आपण पाहिले आहेत. या महामारीच्या काळात अनाथ झालेल्या बालकांविषयी तर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यावर शासनाने उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या बालकांचे हक्क राखणे आणि प्रश्न सोडवण्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे. या करोना महामारीच्या काळात माणूस एकमेकांपासून लांब पळत असल्याचे दिसत असतानाच वेंगुर्ले येथील शिक्षकांनी उभारलेला हा उपक्रम स्तुत्य म्हणावा लागेल. करोनामुळे अनाथ झालेल्या या बालकांच्या मदतीला अशा प्रकारे जिल्ह्यातील सर्वांनी पुढे येऊन या शिक्षकांचा आदर्श सर्वांनीच घेतला, तर ही समस्या काही प्रमाणात सोडविली जाऊ शकेल.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply