पद्मश्री परशुराम गंगावणे यांचा ‘कोमसाप-मालवण’तर्फे अक्षरगौरव

कुडाळ : यंदा पद्मश्री पुरस्काराने गौरव झालेले पिंगुळी (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील लोककलावंत परशुराम गंगावणे यांची भेट घेऊन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेच्या कार्यकारिणीने नुकताच त्यांचा गौरव केला. गंगावणे यांनी साकारलेल्या कलांगणमध्ये जाऊन २६ डिसेंबर २०२१ रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला. ‘कोमसाप-मालवण’च्या लेखकांनी लिहिलेले ‘सिंधुसाहित्यसरिता’ हे पुस्तक आणि पुष्पगुच्छ ‘कोमसाप-मालवण’चे ज्येष्ठ सदस्य अशोक कांबळी यांच्या हस्ते देऊन त्यांना गौरवण्यात आलं. ‘कोमसाप-मालवण’चे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी या वेळी गंगावणे यांची प्रकट मुलाखत घेतली.

परशुराम गंगावणे यांची प्रकट मुलाखत घेताना सुरेश ठाकूर

‘माझ्या जिल्ह्यातील चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या, नंदीबैल आदी 18 लोककलांना न्याय देण्याचा प्रयत्न मी केला. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांची मराठी वाचकांना ओळख करून देण्यासाठी लिहिलेले ‘सिंधुसाहित्यसरिता’ हे आपले पुस्तक मला निश्चितच आवडेल. आपल्या या अनोख्या अक्षरभेटीने मी भारावून गेलो आहे,’ अशा शब्दांत गंगावणे यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

ठाकर समाजाने मनोरंजनाच्या माध्यमातून अध्यात्म ज्ञानप्रसार कसा केला, याची माहितीही कलांगणमध्ये गंगावणे यांनी उपस्थितांना दिली. पिंगुळीत जतन करण्यात आलेले हे अद्वितीय सांस्कृतिक धन जपण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेनेही आम्हाला सहकार्य करावे आणि हा ठेवा साहित्यातून मांडावा, अशी अपेक्षा गंगावणे यांनी या वेळी व्यक्त केली.

कार्यकारिणी सदस्य मंदार सांबारी, एकनाथ गायकवाड, सदानंद कांबळी, सुगंधा गुरव, दौलत राणे, मनाली फाटक आदी कार्यकारिणी सदस्य या वेळी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply