देवरूख : रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरूखनजीकच्या पांगरी-घोडवली-चांदिवणे या ग्रुप ग्रामपंचायतीचे १९७१ मध्ये विभाजन झाले आणि स्वतंत्र पांगरी ग्रामपंचायत स्थापन झाली. या वर्षी या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली. या पन्नास वर्षांत एकदाही निवडणूक न झालेली ग्रामपंचायत अशी या ग्रामपंचायतीची ख्याती आहे. गुरुवारी (३० डिसेंबर २०२१) या ग्रामपंचायतीचा सुवर्णमहोत्सव साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने विविध सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
एकोपा असलेले तंटामुक्त गाव म्हणून पांगरी प्रसिद्ध आहे. यामुळेच गेल्या पन्नास वर्षांत ग्रामपंचायत सदस्य निवडीकरिता निवडणूक घेण्याची गरजच भासली नाही. गावात साहजिक अनेक पक्षांचे कार्यकर्ते आहेत; मात्र ग्रामपंचायत सदस्य निवडीकरिता एका पक्षाने सदस्य उभा केल्यास दुसरा पक्ष आपला उमेदवार मागे घेतो, अशी या गावाची परंपरा आहे. सर्वांच्या सहमतीने सदस्यांची निवड होते. ग्रामपंचायतीचा कारभार गुण्यागोविंदाने चालतो, हे गावाचे वैशिष्ट्य आहे.
गुरुवारी होणाऱ्या सुवर्णमहोत्सवानिमित्त विविध विकासकामांची उद्घाटने होणार असून, लायन्स क्लब नेत्र रुग्णालयातर्फे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी टपाल कार्यलयामार्फत आधार कॅम्प होणार आहे. गावातील शाळांतील विद्यार्थी, तसेच विविध कलाकार ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.
या कार्यक्रमाला खासदार विनायक राऊत, उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, सभापती जयसिंग माने, उपसभापती परशुराम वेल्ये, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर, तहसीलदार सुहास थोरात, पोलिस निरीक्षक बाळकृष्ण जाधव, पंचायत समिती सदस्य सौ. स्मिता बाईत, पोलिस पाटील सौ. श्वेता कांबळे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींचे सरपंच उपस्थित राहणार आहेत.
कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच सुनील म्हादे, उपसरपंच सौ. अनन्या मुळ्ये आणि ग्रामविकास समितीतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता गावातील, तसेच कामानिमित्त विविध ठिकाणी असलेल्या नागरिकांचे साह्य लाभत आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड