देवरूख महाविद्यालयात भारतीय स्थलसेना दिवस साजरा

देवरूख : भारतीय स्थलसेना दिनाच्या औचित्याने देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्धी विभाग आणि ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शनपर व्याख्यान पार पडले.

तत्कालीन लेफ्टनंट जनरल के. एम. करिअप्पा यांनी भारतीय ब्रिटिश कमांडर इन चीफ जनरल सर रॉय फ्रान्सिस बुचर यांच्याकडून १५ जानेवारी,१९४९ रोजी भारतीय सेना दलाची सूत्रे हाती घेतली होती. या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक क्षणाची आठवण म्हणून १५ जानेवारी हा दिवस ‘भारतीय स्थलसेना दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या पवित्र दिनी भारतीय सीमांच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवान सुपुत्रांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली जाते. देवरूख महाविद्यालयात त्यानिमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर म्हणाले, भारतात सन १७७६ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने भारतीय लष्कराची स्थापना केली. भारतीय लष्कर हे सध्याचे जगातील चौथ्या क्रमांकाचे लष्कर असून भारतीय लष्कराने देश आणि देशाबाहेरील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अनेकवेळा सर्वोत्तम कामगिरी केली आहे. जगातील सर्वांत उंच ठिकाण असलेल्या सियाचीन ग्लेशियर यासारख्या उंच रणभूमीवर भारतीय लष्कर तैनात असते. सन १९८२ मध्ये भारतीय लष्कराने जगातील सर्वांत उंच बेली पूल निर्माण केला, जगात केवळ तीन देशातच घोडदळ आहे, त्यामध्ये भारताचा समावेश आहे. १८,००० फूट उंचीवर दोन महिने चाललेले कारगिल युद्ध हे तर जगासाठी उत्तम राष्ट्रनिष्ठा आणि कर्तृत्वाचा भारतीय सेनेने जगापुढे ठेवलेला आदर्श आहे.

प्रा. सानिका भालेकर, प्रा. भाग्यश्री तांदळे, प्रा. सीमा शेट्ये आणि प्रा. धनंजय दळवी यांनी भारतीय स्थलसेनेचा इतिहास आणि आजपर्यंतची कामगिरी, भारतीय स्थलसेनेची संरक्षण सज्जता, शस्त्रास्त्र निर्मितीमधील प्रगती, भारतीय स्थलसेनेतील विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विविध करिअरविषयक संधी, स्थलसेनेतील विविध पदे व त्यांचे कार्य आणि जबाबदाऱ्या, सेनादलाची प्रशिक्षण केंद्र आणि भारतीय लष्कराने सैन्यदलाच्या दिवशी आपला नवा कॉम्बेट युनिफॉर्म म्हणजेच ऑपरेशनदरम्यान घालण्याच्या जो गणवेश प्रदर्शित केला यासंबंधीच्या माहिती दिली.

ग्रंथालय विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी भारतीय सेनेविषयीची माहिती, त्याचबरोबर प्रेरणादायी लघुपट, माहितीपट उपलब्ध करून दिले. यामध्ये भारतीय संरक्षण दलाची शस्त्रास्त्र सज्जता, करिअरविषयक माहिती, सेनादलाच्या प्रशिक्षण संस्था यासंबंधीची उपयुक्त माहिती होती. विद्यार्थ्यांच्या व्हॉहाट्सअॅप ग्रुपवर यासंबंधीच्या माहितीचे व्हिडीओ पाठवण्यात आले.

संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कुमार भोसले, शिरीष फाटक, वेदा प्रभूदेसाई, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक एम. आर. लुंगसे, कार्यालयीन अधीक्षिक मीता भागवत, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply