खारवी समाज पतसंस्थेवर संतोष पावरी, सुधीर वासावे बिनविरोध

रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संतोष जनार्दन पावरी, तर उपाध्यक्षपदी सुधीर महादेव वासावे यांची आज बिनविरोध निवड झाली.

अध्यक्ष संतोष पावरी

खारवी समाज पतसंस्थेची पहिली पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. ती निवडणूकही बिनविरोध पार पडली. त्यामध्ये रत्नागिरी तालुका (सर्वसाधारण) – सुधीर महादेव वासावे, कमलाकर धोंडू हेदवकर, वासुदेव भिकाजी वाघे, दिनेश बाबाजी डोर्लेकर, राजापूर तालुका (सर्वसाधारण) – मदन गुणाजी डोर्लेकर, गुहागर तालुका (सर्वसाधारण) – दिनेश काशिनाथ जाक्कर, रमेश केशव जाक्कर, संदीप विश्राम वणकर, कृष्णा पांडुरंग तांडेल, दापोली तालुका (सर्वसाधारण) – वैभव लक्ष्मण पालशेतकर, विशेष मागास प्रवर्ग – संतोष जनार्दन पावरी, महिला राखीव – ध्रुवी किशोर लाकडे, दीप्ती देवेंद्र कोलथरकर यांची निवड झाली.

अध्यासी अधिकारी लेखापरिक्षक श्रेणी-२ दीपक वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आज पतसंस्थेच्या जिल्हा प्रधान कार्यालयात नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष सभा पार पडली. त्यामध्ये अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी लेखापरीक्षक श्रेणी-२ दीपक वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत दोन्ही पदांसाठी एकेकच अर्ज आल्याने अध्यक्ष म्हणून संतोष पावरी, तर उपाध्यक्ष म्हणून सुधीर वासावे निवडून आल्याचे श्री. वाघमारे यांनी जाहीर केले.

उपाध्यक्ष सुधीर वासावे

निवडीनंतर सर्व संचालक मंडळाने जल्लोषपूर्ण नवनिर्वाचित अध्यक्ष-उपाध्यक्षांचा सन्मान केला. संस्थेची वरिष्ठ लिपिक कु. प्रथमा मिरजुळकर हिने कालच जी.डी.सी. आणि ए. परीक्षेत उज्जवल यश संपादन केल्याबद्दल तिचा संस्थेच्या वतीने शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष पावरी म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना झाली. अल्पावधीतच पतसंस्थेने जिल्ह्यात विश्वासार्ह पतसंस्था असे नाव कमावले आहे. स्थापनेनंतरची दोन वर्षे करोनामुळे ग्रासलेली आर्थिक वर्षे होती. दीर्घकालीन लॉकडाउनमुळे व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे अर्थकारणाची गती राखण्याचे आव्हान पतसंस्थेने यशसवीपणे पेलले. आर्थिक शिस्त, विश्वासार्हता, ग्राहक सेवा या गोष्टी जपत पतसंस्थेने आपला आर्थिक व्यवहार वर्धिष्णु केला आहे. गेल्या ३ वर्षांत पतसंस्थेचे ३ हजार ९४४ सभासद झाले असून ५ कोटी ४५ लाखाच्या ठेवी, ४ कोटी २० लाखांची कर्जे, १ कोटी ८१ लाखाची गुंतवणूक, ६ कोटी ८१ लाखांचे खेळते भांडवल, लेखापरीक्षणाचा सलग ३ वर्षे अ वर्ग अशी पतसंस्थेची स्थिती आहे. सभासदांना पहिल्या वर्षांपासूनच लाभांश दिला जातो. तीन वर्षांत सोनेतारण कर्ज मुदतीत कर्ज खाते बंद करून एकही कर्ज खात्याचा लिलाव करावा लागला नाही. संस्थेचा संपूर्ण व्यवहार संगणकीकृत आहे. रत्नागिरी जिल्हा हे पतसंस्थेचे कार्यक्षेत्र आहे. ते वाढविण्याचा आणि पतसंस्थेची स्थिती आणखी मजबूत करण्याचा मानस आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply