आंबडवे गावाने आत्मनिर्भरतेसाठी देशाला दिशा द्यावी – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

मंडणगड : भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांचे आंबडवे हे जन्मगाव आत्मनिर्भरतेसाठी देशाला दिशा देणारे ठरावे आणि केंद्र सरकारने बाबासाहेबांच्या स्मृती जपणाऱ्या पंचतीर्थ योजनेमध्ये या गावाचाही समावेश करावा. महाराष्ट्राप्रमाणे ७ नोव्हेंबर हा शाळाप्रवेश दिवस देशभर साजरा केला जावा, अशी अपेक्षा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली.

रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे बाबासाहेबांचे मूळ गाव आहे. या गावाला भेट दिल्यानंतर राष्ट्रपती आज बोलत होते. बाबासाहेबांच्या या गावाला भेट देणारे ते पहिले राष्ट्रपती ठरले आहेत. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. त्यानंतर हिंदीतून केलेल्या भाषणात ते म्हणाले की, या गावाला भेट देता आली, बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे पूजन मला करता आले, हे मी माझे भाग्य समजतो. हे तीर्थक्षेत्र आहे. उत्तम निसर्गसौंदर्य लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्याने देशाला अनेक महान व्यक्ती देऊन आपले नाव सार्थक केले आहे. बाबासाहेब आंबेडकर ही त्यातील एक महत्त्वाची व्यक्ती आहे. निसर्गसौंदर्याने समृद्ध असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आंब्याची गोडी जगभरात पोहोचली. तीच गोडी येथील लोकांची आचरणात आहे. त्यांचा बाणाही गोड आहे. संपूर्ण देशात हा गोडवा पोहोचावा, असा संकल्प केला पाहिजे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आंबडवे गावाच्या विकासासाठी जाहीर केलेल्या देणगीचा उल्लेख करून राष्ट्रपती म्हणाले की, राज्यपाल कोश्यारी यांनी चांगली केली आहे. तसा प्रयत्न केला, शासनाने पुढाकार घेतला, तर जिल्ह्याचा गोडवा देशात पोहोचायला वेळ लागणार नाही. हापूस आंबा जसा जगभरात प्रसिद्ध आहे, त्याच पद्धतीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत देशातच नव्हे, तर बाबासाहेबांनी भारतीय संविधान तयार करून जगात नाव मिळविले आहे. आंबडवे गावाला भेट दिल्यानंतर प्रत्येक जण भाऊक होतो. हे मूळ गाव असलेल्या आंबेडकरांनी देशाचे असे संविधान तयार केले, की ज्यात प्रत्येक नागरिकाला त्याला हक्क मिळाला.

श्री. कोविंद म्हणाले, दोन महिन्यांपूर्वी ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन, तर २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन देशात साजरा झाला. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी शाळेत प्रवेश घेतला. त्यांच्या शाळाप्रवेशाचा दिवस महाराष्ट्रात विद्याार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. ते प्रशंसनीय आहे. देशभरात हा दिवस साजरा केला जावा. खासदारांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. मी त्यासाठी मदत करेन. १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते. त्याचप्रमाणे बाबासाहेबांचा करुणा, समातामूलक शिक्षणाबाबतचा दृष्टिकोन संस्मरणीय करण्यासठी ७ नोव्हेंबरचा शिक्षण दिन देशात साजरा करावा. बाबासाहेब शिक्षणाचा प्रचार आणि प्रसाराला महत्त्व देत असत. इदातेंच्या प्रयत्नातून सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांच्या नावे माध्यमिक विद्यालय सुरू करण्यात आले आहे. महिलांचे शिक्षण आणि सक्षमीकरण करणाऱ्या साावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे स्मरण त्यातून झाले. बाबासाहेब महात्मा फुले यांना आदर्श मानत. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाने तोच आदर्श ठेवला आहे. आंबडवे गाव तीर्थयात्रेसमान आहे. आंबेडकरांच्या स्मृती जपण्यासाठी केंद्र सरकारची पंचतीर्थांची कल्पना साकार होत आहे. त्यात आंबडवे गावही जोडले जावे. आंबेडकरांचा जन्म झाला ते महू गाव, दीक्षाभूमी नागपूर, दिल्लीतील महापरिनिर्वाण क्षेत्र आणि मुंबईतील चैत्यभूमी तसेच लंडनमधील आंबेडकर भवन ही पाच तीर्थे विकसित केली जाणार आहेत. त्यापैकी देशातील चारही स्थळांना मी भेट दिली आहे. उत्तम पद्धतीने ही केंद्रे विकसित करणाऱ्या केंद्र सरकारचे अभिनंदन करतो.

पावले ती धन्य होती ध्यासपंथे चालता
सार्थ जीविक होते ध्यासपंथे चालता
गौरवान्वित होते संस्था ध्यासपंथे चालता
उजळते तेज, मायभूचे ध्यासपंथे चालता

या राष्ट्रपतींनी मराठीतील काव्यपंक्ती उद्धृत करून राष्ट्रपती म्हणाले, अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण बाबासाहेबांना सैन्यात असलेले वडील रामजी आणि आजोबा मालोजी सकपाळ यांच्याकडून मिळाली. ब्रिटिश सरकारने सैन्यातील महार रेजिमेंट बंद केल्याने झालेला अन्याय बाबासाहेबांनी न्या. महादेव गोविंद रानडे यांच्यासमोर मांडला. त्यामुळे १९१७ मध्ये महार बटालियन पुन्हा स्थापन झाली. बाबासाहेबांच्या मुंबईतील राजगृह निवासस्थानी मोठे ग्रंथालय होते. लहानपणापासूनच त्यांनी त्यांनी वाचनाची आवड जोपासली. आंबडवे गावातील स्मारकाला आज भेट दिली, तेव्हा सकपाळ परिवारातील सुदाम सकपाळ यांनी एक घटना सांगितली. बाबासाहेब तेव्हा साताऱ्यात शिकत होते. त्यांच्या वडिलांबरोबर तेव्हा येत गावी येत असत. ते नववीत होते, तेव्हा त्यांचा भाऊ आनंद याच्या विवाहासाठी ते सर्व कुटुबीयांबरोबर आले होते. समारंभ आटोपल्यानंतर मुंबईत परत जायचे होते. बाबासाहेब तेव्हा भिवा नावाने ओळखले जात होते. परत जाण्यासाठी सर्वजण भिवा यांना शोधत होते. तेव्हा ते दूरच्या एका मंदिरात पुस्तक वाचत बसले होते. त्यांना बोलावून घेऊन मग कुटुंबीय रवाना झाले. बाबासाहेबांना शिक्षणाच्या बाबतीत इतकी आत्मीयता होती. कारण शिक्षण हेच उन्नतीचे माध्यम आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा त्यांनी दिलेला मूलमंत्र होता. मीही सर्वसमान्यांना भेटतो तेव्हा हेच सांगतो की, तीन वेळचे जेवण जेवत असाल, तर त्यातील एक वेळचे जेवण मुलांच्या शिक्षणासाठी द्यावे.

निसर्ग चक्रीवादळाने आंबडवे गावाची वाताहत झाली होती. त्याचा उल्लेख करून राष्ट्रपती म्हणाले, डिक्की संस्थेचे पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी पुढाकार घेऊन आपद्ग्रस्तांना निव्वळ मदतच केली असे नाही, तर गाव आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न केले. त्याशिवाय खादी ग्रामोद्याग, आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठानेही गावात छोट्या उद्योगांना चालना दिली आहे. त्यामुळे गावात परिवर्तन होईल. गावात बदल होईल. गावातील आत्मनिर्भरतेचा आणि समरसतेचा आदर्श देशातील गावागावांमध्ये पोहोचला, तर आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण होईल.

राष्ट्रीय भटके-विमुक्त आयोगाचे अध्यक्ष भिकूजी इदाते म्हणाले की, आंबडवे गावातील बाबासाहेबांच्या स्मारकाकरिता ग्रंथालय, चांगली पुस्तके, संगणक आणि आवश्यक ते सर्व द्यायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. त्याबद्दल तसेच बाबासाहेबांच्या गावाला राष्ट्रपती म्हणून सर्वप्रथम भेट दिल्याबद्दल रामनाथ कोविंद यांना वंदन करतो.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी आंबेडकरांच्या स्मारकाकरिता ३० लाखाची मदत जाहीर केली. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी दिल्या गेलेल्या देणग्या आणि झालेल्या कामाचा आढावा घेतला.

समारंभाला राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, न्या. बी. आर. गवई, राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार सुनील तटकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आंबडवे दौऱ्याचा संपूर्ण वृत्तांत सोबतच्या व्हिडीओमध्ये

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply