उपेक्षित भारतरत्ने

लता मंगेशकर यांच्यासारख्या भारतरत्नाच्या निधनानंतर त्यांच्या उचित स्मारकाची घोषणा होणे स्वाभाविक होते. तसे ते झालेही आहे. मुंबई विद्यापीठाच्या आवारात आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. त्याशिवाय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाप्रमाणेच त्यांचे स्मारक दादरच्या शिवाजी उद्यानातही उभारले जावे, अशी एक मागणी पुढे आली आहे. अर्थात त्यावर वादविवादही सुरू झाले आहेत. पण ती बाबही स्वाभाविक म्हणण्याएवढे आपले विचारस्वातंत्र्य प्रगल्भ झाले आहे.

लता मंगेशकर यांच्या स्मारकाची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी केली. त्यांच्या खात्याच्या अखत्यारीत असलेल्या विद्यापीठाच्या परिसरात हे स्मारक होणार असल्यामुळे त्यांनी त्याबाबतची घोषणा केली आहे. ती पूर्ण व्हावी ही अपेक्षा आहेच, पण ती करतानाच कोकणातल्या यापूर्वीच्या भारतरत्नांची स्मारकाच्या बाबतीत झालेली उपेक्षाही लक्षात घेतली गेली पाहिजे. महर्षी धोंडो केशव कर्वे (१९५८), पांडुरंग वामन काणे (१९६३) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१९९०) अशा तीन भारतरत्नांकरिता रत्नागिरी जिल्हा ओळखला जातो. पण दुर्दैवाने या तिन्ही भारतरत्नांची रत्नागिरी जिल्ह्यात उपेक्षा सुरू आहे. भारतीय संविधानाचे निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला राष्ट्रपती प्रथमच भेट देत आहेत. त्यानिमित्ताने त्या गावाची आणि परिसराची डागडुजी, दुरुस्ती केली जात आहे. पण खुद्द आंबेडकरांचे स्मारक अनेकवार घोषणा होऊनही उद्धरले गेलेले नाही. महर्षी कर्वे आणि पां. वा. काणे या इतर दोन भारतरत्नांच्या नावांची तर साधी चर्चाही होत नाही. महनीय व्यक्ती, त्यातही भारतरत्न म्हणून गौरविल्या गेलेल्यांची स्मारके व्हायलाच हवीत, पण अलीकडे तर काही भारतरत्ने घोषणेच्या बाबतीतही दुर्लक्षित राहिली आहेत. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होताना ही उपेक्षा ठळकपणे जाणवते.

भारतरत्नांबरोबरच भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या कोकणातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांचीही मोठी उपेक्षा झाली आहे. बॅ. अ. र. अंतुले मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी राज्यात २०६ हुतात्म्यांची स्मारके उभारण्याची घोषणा केली. त्यांच्या कारकिर्दीत त्यातील अनेक स्मारके पूर्णही झाली. पण आता मात्र त्यांची उपेक्षा सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भास्कर कर्णिक या एकमेव हुतात्म्याच्या स्मारकाचा अपवाद वगळता अन्य सर्व स्मारके कुणाच्या लक्षातही येत नाहीत, अशा अवस्थेत आहेत. त्यांच्याविषयी आजच्या पिढीला आणि पुढच्या पिढीला माहिती होण्यासाठी अनेक उपाय योजले गेले पाहिजेत. पण पुतळे उभारणे आणि स्तंभ उभे करणे यापलीकडे स्मारकांची आपली कल्पना जात नाही. अनेक ठिकाणी तर तेवढेही होत नाही. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत साडेतीनशेपेक्षा अधिक स्वातंत्र्यसैनिक होऊन गेले. त्यातले मोजके स्वातंत्र्यसैनिक वगळले तर इतरांची संपूर्ण नावेसुद्धा प्रशासनाकडे उपलब्ध नाहीत. त्यासाठी काही करावे असे आपण आपल्या शासनाला, शासनकर्त्यांना सुचत नाही. घोषणा मात्र भारी भारी होतात. त्यामुळे भारावून जायला होते. पण हे भारावलेपण क्षणिक असते. हुतात्मा आणि स्वातंत्र्यसैनिक आपली भविष्यात स्मारके होतील, यासाठी लढले नव्हते. त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासाठी त्यांची आठवण आज आपण काही करणे आणि पुढच्या पिढीसाठी या आठवणींचा ठेवा जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. अर्थातच शासनाने त्यासाठी ठोस काही केले पाहिजे. घोषणा हवेत विरून जातील. घोषणा करणारे विस्मृतीत जातील, पण ज्यांच्या प्रयत्नांमुळे आपण आज स्वातंत्र्य उपभोगतो आहोत, त्यांच्या आठवणी जपण्यासाठी केलेले ठोस कार्य चिरंतन राहणार आहे.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ११ फेब्रुवारी २०२२)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply