मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. नेमेचि साजरा केला जाणारा हा मराठी राजभाषा दिन आणि अभिजात भाषेचा दर्जा देण्याची केली जाणारी मागणी हा विषय फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात दरवर्षी येतो. हा दिवस साजरा करण्यासाठी मुळात भाषेचे संवर्धन अत्यावश्यक आहे. ते करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर कोणताही गाजावाजा न करता प्रयत्न केले जात असतात. रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा आणि राजापूर या दोन तालुक्यांमध्ये गेल्या सात वर्षांपासून हा प्रयत्न सुरू आहे. राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने ग्रामीण साहित्य संमेलन भरवून हे प्रयत्न चालविले आहेत. केवळ मराठी भाषाच नव्हे, तर स्थानिक बोलीभाषा, संस्कृती, उत्तम परंपरा, कालबाह्य होऊ पाहत असलेल्या विविध कला, पारंपरिक लोकनृत्ये इत्यादी संस्कृतीचे संवर्धनही या संस्थेमार्फत केली जात आहे. या प्रयत्नांची दखल शासकीय स्तरावर घेतली गेली नाही, तरी फारसे बिघडणार नाही. कारण ठराव करणे आणि मागणी करणे यापलीकडे शासकीय स्तरावर फारसे काही होत नाही. संवर्धनाचे काम व्यक्ती आणि समाजाशी खऱ्या अर्थाने बांधिलकी असलेल्या संस्थाच करत असतात. राजापूर लांजा नागरिक संघ ही त्यापैकीच एक संस्था आहे. राजापूर आणि लांजा या दोन तालुक्यांप्रमाणेच इतर तालुक्यांमधील व्यक्ती आणि संस्थांनीही या संस्थेच्या प्रयत्नांचे अनुकरण करायला हवे.
अशा तऱ्हेने साहित्य संमेलन भरवून रत्नागिरी जिल्ह्यात राजभाषा दिन साजरा केला जात असतानाच नाटक या अभिजात भाषाप्रकाराचे संवर्धन करायला उत्तेजन देणारी हौशी राज्य नाट्य स्पर्धा सुरू झाली आहे. स्पर्धेला साठ वर्षांची परंपरा आहे. या परंपरेमुळेच मराठी रंगभूमी आणि चित्रपटांना अनेक नामवंत कलाकार मिळाले आहेत. म्हणूनच नाट्य स्पर्धेची परंपरा जपताना त्यात वेगळेपणा आणण्यासाठी आणि दर्जा सुधारण्यासाठी स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी कलाकारांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन सांगितले आहे. ते प्रत्यक्षात यावे, अशी अपेक्षा करतानाच केवळ कलाकारांनाच नव्हे तर नवनाट्य लेखकांसाठीही प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, याची दखल घ्यायला हवी. राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरीत सुरू झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कलाकार आणि संस्थांना कलेच्या सादरीकरणासाठी वाव मिळाला आहे. अगदी ग्रामीण भागातील नाट्यसंस्थाही स्पर्धेत सहभागी होत आहेत. मात्र स्पर्धेत सहभागी होताना नवे लेखक आणि नवे कलाकार यांची वानवा भासू लागली आहे. स्पर्धेकरिता नाटकाची संहिता नवी असली पाहिजे, असा एक नियम आहे आणि तो योग्यच आहे. नवे विषय हाताळले जातील आणि नव्या लेखकांना त्यामुळे चालना मिळेल, अशी त्यामागची कल्पना आहे. मात्र त्यात अडचणी आहेत. राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर सातत्याने अनेक नाटके सादर केलेले आणि पारितोषिके मिळविलेले लांजा तालुक्यातील अमोल रंगयात्री या संस्थेचे अमोल रेडीज यांनी सांगितले की नव्या नाट्यसंहिता तयार होत नाहीत. त्यातही काही लेखन केले तर नाटक सादर करण्यासाठी भूमिका करण्याकरिता ग्रामीण भागात कलावंत मिळत नाहीत. राज्य शासन कलावंतांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम आखणार असेल तर त्यांनी नवलेखकांसाठीही प्रशिक्षण आयोजित करायला हवे. मराठी नाट्य परंपरा समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करताना तसेच मराठी राजभाषा दिन साजरा करताना या गरजांकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २५ फेब्रुवारी २०२२)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

साप्ताहिक कोकण मीडिया – २५ फेब्रुवारी २०२२ चा अंक
मॅग्झटर लिंक : https://bit.ly/3BPkq6e
प्रभानवल्ली-खोरनिनको (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथे १८ ते २० फेब्रुवारी २०२२ या कालावधीत झालेल्या सातव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विशेषांक
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : नवलेखकांसाठीही प्रशिक्षण हवे https://kokanmedia.in/2022/02/25/skmeditorial25feb/
मुखपृष्ठकथा : मुचकुंदीच्या काठावरचा अनुपम्य साहित्यसोहळा : रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिलेला, संमेलनाचा आढावा घेणारा लेख
ग्रामीण साहित्य संमेलनाच्या सप्तपदीतील काही कण : लांजा येथील विजय हटकर यांचा लेख
प्रसाद कुलकर्णींच्या ‘आनंदयात्रे’ने साहित्य संमेलनात ऊर्जा
शहरात न जाता खेडेगावातच राहून संसार थाटणाऱ्या जोडप्यांचा सत्कार
एका माऊलीचा सन्मान : राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी श्रीमती अरुणा गोविंद हटकर यांच्याविषयी लिहिलेला हृद्य लेख
याशिवाय या वैशिष्ट्यपूर्ण संमेलनाचे सचित्र दर्शन
पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी संमेलनात मांडलेले विचार... व्हिडिओ पुढील लिंकवर https://youtu.be/SkccVqTtfIo
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड